खादलेंच खावे वाटे ।
2792.
खादलेंच खावे वाटे । भेटले भेटे आवडी ॥१॥
वीट नाही पांडुरंगी । वाटे अंगी आर्त ते ॥धृपद॥
हृदयांची हाव पुरे । परि हे उरे चिंतन ॥२॥
तुका म्हणे पोट भरे । परि ते उरे भूक पुढे ॥३॥
अर्थ :
आवडीचे पदार्थ खाल्ले की पुन्हा खावेसे वाटते तसे आवडीचे मनुष्य सखे भेटले की ते पुन्हा भेटावेसे वाटते. त्याप्रमाणे पाडूरंगाचा कधीही वीट येत नाही उलट अंत:करणामध्ये त्याची आवड वाढतच जाते. पाडूरंगाची भेट झाली की सर्व इच्छा पूर्ण होतात परंतू त्याचे चिंतन करण्याची इच्छा ह्दयामध्ये मागे उरतच असते. तुकाराम महाराज म्हणतात, पोट भरले तरी पुढे भूक शिल्लकच राहाते त्याप्रमाणे पाडूरंगाचे कितीही चिंतन केले तरी पुढे चिंतन करावेसेच वाटते.
