त्रिभंगी देहुडा ठाण
185.
त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये । कल्पद्रुमातळी वेणु वाजवित आहे ॥१॥
गोविंदु वो माये गोपाळु वो । सबाह्य अभ्यंतरी अवघा परमनंदु वो ॥धृ॥
सांवळे सगुण सकळा जिवांचे जीवन । घनानंद मूर्ति पाहता हारपले मन ॥२॥
शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ । बाप रखुमादेविवरु विठ्ठलु सकळ ॥३॥
