येई हो कान्हाई मी दळ
106.
येई हो कान्हाई मी दळीन एकली । एकली दळिता शिणले हात लावी वहिली ॥धृ॥
वैराग्य जाते मांडुनि विवेक खुंटा थापटोनी । अनुहत दळण मांडुनी त्रिगुण वैरणी घातले ॥१॥
स्थूळ सूक्ष्म दळियेले देहकारणासहित । महाकारण दळियेले औट मात्रेसहित ॥२॥
दशा दोन्ही दळिल्या व्दैत अव्दैतासहित । दाही व्यापक दळियेले अहंसोहंसहित ॥३॥
एकवीस स्वर्ग दळियेले चवदा भुवनांसहित । सप्त पाताळे दळियेली सप्त सागरांसहित ॥४॥
बारा सोळा दळियेल्या सत्रवीसहित । चंद्र सूर्य दळियेले तारांगणांसहित ॥५॥
नक्षत्र वैरण घालुनी नवग्रहासहित । तेहतीस कोटी देव दळियेले ब्रम्हाविष्णुसहित ॥६॥
ज्ञान अज्ञान दळियेले विज्ञानासहित । मीतूंपण दळियेले जन्ममरणा सहित ॥७॥
ऐसे दळण दळियेले दोनी तळ्यासहित । एका जनार्दनी कांही नाही उरले व्दैत ॥८॥
