मलयानिळ शीतळु पालवी
70.
मलयानिळ शीतळु पालवी नये गाळू ।
सुमनाचा परिमळु गुंफिता नये ॥१॥
तैसा जाणा सर्वेश्वरु म्हणो नये साना थोरु ।
याच्या स्वरुपाचा निर्धारु कवण जाणे ॥२॥
मोतियाचे पाणी भरता नये वो रांजणी ।
गगनासी गवसणी घालिता नये ॥३॥
कापुराचे कांडण काढिता नये आड कण ।
साखरेचे गोडपण ।पाखडता नये ॥४॥
डोळियांतील बाहुली करु नये वो वेगळी ।
सखी म्हणुनि साउली धरिता नये ॥५॥
विठ्ठलरखुमाईचे भांडणी कोण करी बुझवणी ।
निवृत्तिचे चरणी शरण ज्ञानदेवो ॥६॥
