वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ६४. ऐल राजाची कथा

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088294 · अभंग क्र. ६४

64.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय चौसष्टावा ॥
ऐल राजाची कथा

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

ऐसी शक्रारिहत्यांची कथा । अति आश्चर्य अपूर्वता ।
ऐकोनिया समस्ता । झाला बोलता श्रीराम ॥१॥
होवोनि आनंदभरित । बोलावयाचा उपक्रम करित ।
पूर्वी कर्दम प्रजापतीचा सुत । ऐलनामें प्रसिद्ध ॥२॥
तेणे भुजबळेंकरुन । पृथ्वीचें नृप जिंतोन ।
स्वधर्मे राज्य करी जाण । प्रजापाळण पुत्रापरी ॥३॥
आंगवण सुरेशाहुनि आगळी । उदारते न तुळती कर्ण बळी ।
दैत्य दानवे भेणे पाताळीं । लंघोनि गेली तळातळा ॥४॥
नाना गंधर्व असुर । भेणे पूजिती नृपेश्वर ।
रायाचा पराक्रम देखोनि थोर । चरणा शरण अरी येती ॥५॥
तो कोणे एकेकाळीं पारधीलागून । ससैन अटवी प्रवेशोन ।
मृगां मारोनि लक्षावधि जाण । आणी श्वापदें नेणो किती ॥६॥
जिकडे जाय सेनासैन्य । तिकडे होय रणकंदन ।
पारधी खेळतां उमारमण । त्या स्थळाप्रति आले ॥७॥
तया वनाचे प्रदेशी । कर्पूरगौर पार्वतीसीं ।
विचरता देखोनि राजसैन्यासी । शाप महेशें दिधला ॥८॥
या वनाचे ठायी जाण । पार्वतीमहेशावेगळेंकरुन ।
वनी विचरती प्राणी भूतगण । पुरुष स्त्रीदेहीं पै होती ॥९॥
ऐसा शाप त्या वनासी । होता कर्दमपुत्र सैन्येंसी ।
स्त्रीरुप झाला पालट अवयवांसी । निश्चयेंसी देखते झाले ॥१०॥
स्त्रीरुप सकळ सैन्य । देखोनि राजा दुःखित जाण ।
जेथे पार्वतीसहित त्रिनयन । तेथे कर्दमपुत्र स्वये आला ॥११॥
करोनि कामांतकाची स्तुती । अति नम्र विनीतवृत्तीं ।
प्रसन्न झाला उमापती । बोलतसे ते समयी ॥१२॥
अगा ये कर्दमसुता तुजलागोन । मी प्रसन्न झालों माग वरदान ।
तंव येरें पार्वतीचे स्तवन । साष्टांग नमनी पै केले ॥१३॥
दोघे झालिया प्रसन्नभूत । राजा झाला बोलत ।
तुमचे हे वन होय सत्य । मज पुरुषत्व प्राप्त होवो ॥१४॥

ऐलाला एक महिना स्त्रीत्व व एक महिना पुरुषत्वाच्या प्राप्तीचा वर :

एक मासी स्त्री एक मास पुरुष जाण । ऐसा वर द्यावा कृपा करुन ।
मग महेशे म्हणे धन्य धन्य । उत्तम वरदान मागितले ॥१५॥
अर्ध वरद महेशाचें । अर्ध वरदान पार्वतीचे ।
हे तुज दिधले सत्य साचे । अनुमानातें धरुं नको ॥१६॥
ऐसे देवोनि वरदान । पुन्हा बोले उमा वचन ।
मागील नव्हे आठवण । सत्य जाण राजेंद्रा ॥१७॥
कर्दमपुत्रा मासपर्यंत । पुरुषत्व झाले प्राप्त ।
दुसरे मासीं योषिता अद्भूत । लावण्ये महा साजिरी ॥१८॥
श्रीराम म्हणे लक्ष्मणभरतांसी । कर्दमपुत्राची कथा ऐसी ।
वनी विचरता शाप त्यासी । महेशाचा पै झाला ॥१९॥
ऐसे हे दिव्य आख्यान । ऐकोनि बुद्धि विस्मय पावोन ।
श्रीरामाप्रति कर जोडून । विनंती करिते झाले दोघे ॥२०॥
पुढे कर्दमसुताचें वर्तमान । श्रीरामा अधिक विस्तारोन ।
सांगावे जी कृपा करुन । पुढती नमन करिते झाले ॥२१॥
ऐलराजा स्त्रीदेह पावोन । वर्तन कैसा वनोवन ।
ऐसे हे उत्तम कथन । सविस्तर श्रीरामा सांगावे ॥२२॥
ऐकोनि भरतलक्ष्मणांचा प्रश्न । सांगता झाला ऐलाख्यान ।
श्रोते होवोनि सावधान । रम्य रामायण अवधारा ॥२३॥
ऐलराजा प्रथममासीं । पावोनिया स्त्रीदेहासी ।
सवे सेना स्त्रीरुपेंसीं । विचरतसे वनोवन ॥२४॥
तया अरण्याभीतरीं । राजा होवोनि सुंदर ।
तिच्या लावण्याची परी । श्रोती सावध ऐकावी ॥२५॥
मुखकमळ अति सुंदर । कमळदळासारिखे नेत्र ।
कुच अवयव देखोनि ऋषीश्वर । मदनें मुरकुंड्या पडिल्या पै ॥२६॥
सेना स्त्रीरुपेंसीं समस्त । हस्तीवरी आरुढोनि तेथ ।
ऐल विचरता विपिनाआंत । तंव सोमसुत बुध तेथे असे ॥२७॥
चंद्रसुत बुध अनुष्ठान । तये वनी करी जाण ।
तयाचे आश्रमासमीप येता पूर्ण । एक सरोवर देखिले ॥२८॥
सेनेसहित सरोवरीं । ऐल प्रवेशला उदकाभीतरीं ।
क्रीडा करोनि बाहेरी । किंचित्सेंवकेसीं निघाला ॥२९॥
करी शोभे धनुष्यबाण । सवे सेवक चवघे जण ।
ऐसे बुधे देखोनि आपण । मदनें विव्हळ पै झाला ॥३०॥
बुध म्हणे तियेच्या सखियांसी । तुम्हांत ही सुंदर कोण रुपयौवनेंसीं ।
लावण्य पाहता पृथ्वीसीं । हीसमान दुजी नाही ॥३१॥
हिचें देखोनि लावण्य । सुरनरकिन्नरां काम गहन ।
इचा भ्रतार आहे कोण । काय कारण विसंबला ॥३२॥
ऐसे ऐकोन बुधाचें वचन । ऐलरायाच्या दूतीं जाण ।
सांगों आदरिलें समूळ कथन । सावधान अवधारा ॥३३॥
अहो आमुचा प्रभु निश्चिती । याची सेना सेवक संपत्ती ।
सर्वा शापे पावली स्त्रीत्वप्राप्ती । हे नवल मुनि येथे झाले ॥३४॥
अहो जी मुनि या वनाभीतरीं । पुरुष आहेत की नाहींत निर्धारी ।
आमचे प्रारब्धाची नवलपरी । स्त्रीरुप होवोनियां ठेलो ॥३५॥
या पर्वताच्या माथा जाण । बहुसाल पुरुष असती जन ।
परी आमचें प्रारब्ध असे हीन । योषिता करोन ठेविले ॥३६॥
मुनि म्हणे तयांसी । तुम्ही विचरां या वनप्रदेशीं ।
की पुरुष त्यांचे सेवेसी । करोनि सावकाशी वसावें ॥३७॥
ऐसे सोमसुते बोलोन । तंव समीप ऐल आली जाण ।
बुधासी साष्टांगें करोनि नमन । कर जोडोन उभी असे ॥३८॥
इंद्रसुत म्हणे कलमनयने । सुभगे सुंदरे चंद्रानने ।
तुज देखिल्या भूकतहाने । सर्व विसरिजे राजबाळे ॥३९॥
मी चंद्राचा सुत जाण । मज वरावें स्व-इच्छेकरुन ।
ऐसे ऐकोनि बुधाचें वचन । ऐला काय बोलिली ॥४०॥
चहूंकडे पाहे सखीजनांसी । तंव कोणी न दिसे निर्भयेंसी ।
निःशंक निर्लज्ज होवोनि मानसी । वचन त्या बुधासी बोलती झाली ॥४१॥
अगा ये सुंदरा सोमसुता । अत्यंत सज्ञाना गुणवंता ।
मज अभय देई आता । मी तुझी कांता होतसे ॥४२॥
ऐकोनि तियेचें वचन । संतोषला सोमनंदन ।
तये वनी किंचिद्दिन । उभयतां क्रीडा करित होती ॥४३॥
तंव कोणे एके समयी माधव मास । घेवोनि सुंदर ऐलेस ।
बुधु क्रीडतां होवोनि संतोष । आनंदा दोघे पावोनि भूपती ।
बुधासि म्हणता झाला सेनासंपत्ती । कोठे गेली माझी मुने ॥४५॥
तंव इंद्रसुत म्हणे रायासी । ऐके सावध परियेसी ।
तुम्ही निद्रित असता सेजेसीं । मेघ वर्षला ॥४६॥
शिळांचा पर्जन्य वर्षला शिळावारीं । सैन्या झाली चकचुरी ।
तुज असता मम आश्रमाभीतरी । प्राण वांचला राजेंद्रा ॥४७॥
राजा म्हणे बुधासी । माझा पुत्र शशिबिंदु नामेसीं ।
राज्य करितो आपुलें देशी । मी सैन्येंसीं भ्रष्टलों ॥४८॥
आता त्यजीन आपुला प्राण । एकला वांचल्या फळ कोण ।
राज्यासि आता सैन्येंवीण । दुःख दारुण होतसे ॥४९॥
येरु म्हणे तुवा रहावे स्वस्थचित्तें । सांडोनि सैन्यचिंता येथे ।
फळमूळ भक्षोनि दिवस किंचितें । पुढे हित करीन तुझे ॥५०॥
ऐकोनि सोमसुताचे वचन । राजा ऐल आश्रमी राहोन ।
पूर्णमास भरता जाण । स्त्रीरुप धरिता जाहला ॥५१॥
धरोनिया स्त्रीरुपासी । बुध ऐल क्रीडातां वनासी ।
पुत्र झाला पुरूरवा नामेंसी । अति प्रसिद्ध धर्मात्मा ॥५२॥
सोमसुतापसोनि संभूत । ऐलेसि पुरूरवा झाला सुत ।
पुढील कथा सुनिश्चित । सावचित ऐकावी ॥५३॥
एका जनार्दना शरण । पुढील कथा अति गोड निरुपण ।
श्रोता वक्ता श्रीजनार्दन । श्रीरामरामायण जाण तेथे ॥५४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
ऐलाख्याने चतुःषष्टितमोऽध्यायः ॥६४॥ ओंव्या ॥५४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग