॥ श्रीएकनाथमहाराजकृत
61.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय एकसष्टावा ॥
श्रीरामाचे अगस्त्याश्रमांत गमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
शत्रुघ्न गेला मधुपुरीसी । मागे श्रीराम भरत लक्ष्मणेसीं ।
राज्य करिता अयोध्येसी । पुढे काय वर्तले ॥१॥
रामांच्या अधर्मचरणानेच आपला लहान
मुलगा मृत्यु पावला अशी एका ब्राह्मणाची शंका :
कोणी एक द्विज पुण्य पवित्र । अग्निहोत्री महापंडित ।
चारी वेद मुखोद्गत । धर्मीं तत्पर स्वधर्में ॥२॥
ऐसा तो गुणसंपन्न । तयाचे बाळक पांचसात वर्षांचे जाण ।
ते अकाळी पावले मरण । दुःख दारुण विप्रासी ॥३॥
तेणे द्विजें घेवोनि बाळक । महाद्वारा आला करीत शोक ।
स्नेहें रुदन करी देख । नाना विलापे कपाळपिटी ॥४॥
म्हणे मी नाही आचरलों अधर्म । म्या नाही केले निंद्य कर्म ।
वादी छळिले नाहींत ब्राह्मण । स्वकर्मा जाण चुकलों नाही ॥५॥
म्या कोणाचा न केला अपराध । म्या कोणासीं न केला विवाद ।
मी अबद्ध जपलों नाही वेद । कोणाचा नाही अपवाद उच्चरिला ॥६॥
पंचवार्षिक माझे बाळ । तारुण्य जरा न येता केवळ ।
साधूनिया काळ वेळ । माझे तान्हें बाळ हरिले कैसे ॥७॥
रघुनाथराज्यीं पूर्ण आयुष्य । काळाचा तेथे नाही प्रवेश ।
अधर्माचा नाही लेश । तरी मी का क्लेश पावलों ॥८॥
माझे एकुलते तान्हें जाण । कोणे पापें पावले मरण ।
तयासवे आम्ही प्राण । श्रीरामद्वारीं देह सांडूं ॥९॥
ऐसे पूर्वी नाही ऐकिलें । श्रीरामराज्यीं अपूर्व झाले ।
याबरोबर आम्ही सकळे । आपुलें देह पै त्यागूं ॥१०॥
श्रीरामाचे अधर्मे करुन । माझे बाळक पावले मरण ।
यदर्थीं कांही संदेह जाण । अनुप्रमाण असेना ॥११॥
ऐसी द्विजोत्तमाची करुणा । ऐकोनि जानकीरमणा ।
बाळकदुःखे तया जाणा । थोर खेद पावला ॥१२॥
रामांचा सर्व ऋषींना प्रश्न :
श्रीरामे बाळ देखोन । अत्यंत करुणा उंचबळोन ।
सभे बैसले तेही जन । थोर आश्चर्य पावले ॥१३॥
मग बोलावोनि ऋषीश्वर । वसिष्ठ वामदेव थोर थोर ।
गौतम जाबाली अत्रि आणिक मुनिवर । सभे येवोनि बैसले ॥१४॥
तयांसि करोनि नमन । अभिवंदन आणि पूजन ।
आसने उत्तम द्वोन । तपोधन बैसविले ॥१५॥
नारदही तेथे आला । श्रीरामे आलिंगून पूजिला ।
वरासनी बैसविला । तपोधनांजवळी हो ॥१६॥
मृतबाळकाच्या वृत्तांता । श्रीरामे सांगितले समस्ता ।
तंव नारद झाला बोलता । धर्मशस्त्रनीतीतें ॥१७॥
नारदांचे धर्मशास्त्रांचे दिद्गर्शन :
ऐके गा श्रीरघुपती । बाळक निमाले जे अर्थी ।
पूर्वी कृतयुगाप्रती । ब्राह्मण तप करित होते ॥१८॥
विप्रावेगळे तपीं तत्पर । इतरांसी नाही अधिकार ।
त्रेतायुगाचे ठायी राजन्यां अधिकार । तपीं असे राजेंद्रा ॥१९॥
आणिक कृतत्रेतायुगीचें जन । आपुले स्वधर्मी असती जाण ।
तेथे नाही अकाळ मरण । दोही युगांचा हा महिमा ॥२०॥
त्रेतायुगी करोनि नेम । स्थापिले चारी वर्ण उत्तम ।
अनधिकारी तप करोनि अधर्म । एक चरणी चालता झाला ॥२१॥
अधर्माचा प्रथम चरण । श्रीरामा प्रवर्तला जाण ।
जे राष्ट्रीं अनधिकारी साधन । करिताती जाण तै मृत्यु पावे ॥२२॥
अनधिकारी करिता तप । अनधिकारी करिता जप ।
अनधिकारी पूजापडप । घेती ते जना मृत्युपीडा ॥२३॥
त्रेतायुगाभीतरीं । तप करिती वैश्यशूद्र अनधिकारी ।
तयांचें पापें पीडा भारी । रायासि होय राजेंद्रा ॥२४॥
तयांचे अधर्मे अनृतेंकरोन । प्रजेसी पीडा वर्षे पर्जन्य ।
बहुकाळ पडे अवर्षण । राज्यपद जाण स्थिर नव्हे ॥२५॥
शूद्रांच्या पापाचरणामुळे ब्राह्मणपुत्राचा मृत्यु :
द्वापरीं तप त्रिवर्णांसी । ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांसी ।
शूद्रें न करावे तपासी । निजकर्म आचरावें ॥२६॥
तयाच्या पापेंकरुन । द्विजबाळक पावले मरण ।
यदर्थीं संदेह नाही जाण । पृथ्वीशोधन करावे ॥२७॥
राजा होत्साता जाण । जो न करी पापपुण्यविवेचन ।
तयासि होय अधःपतन । संदेह जाण असेना ॥२८॥
ऐसी असे धर्मनीती । हे शीघ्र विचारोनि जानकीपती ।
पुढील कार्याची उत्कंठा चित्ती । धरोनि राहटी करावी ॥२९॥
मृत बालकास तेलाच्या द्रोणींत ठेवावयास
सांगून पुष्पक विमानांतून संचारार्थ निघाले :
ऐसे नारदाचे वचन । ऐकोनिया श्रीरघुनंदन ।
वेगी पाचरोनि लक्ष्मण । काय बोलता पै झाला ॥३०॥
ऐसे सौमित्रा झडकरी । द्विजा आश्वासोनि मधुरोत्तरीं ।
बाळकाचे शरीर स्नेहाभीरतीं । तळोनियां राखावे ॥३१॥
बाळकाची वपु तैली तळून । द्रोणामाजि ठेववि करोनि यत्न ।
नानापरींचें सुगंध पाळून । संस्थापन करावे ॥३२॥
ऐकोनी श्रीरामाचे वचन । सौमित्रे विप्रा आश्वासून ।
बाळकाचे शरीर तैली तळून । द्रोणीमाजि स्थापून रामाजवळी आला ॥३३॥
श्रीरामे क्षण एक धरोनि ध्यान । केले पुष्पकाचें आवाहन ।
तत्काळ पुष्पक येवोनि जाण । कर जोडून राहिले ॥३४॥
पुष्पक म्हणे श्रीरामा । तुमची आज्ञा प्रमाण पुरुषोत्तमा ।
तूंचि माझा निजात्मा । सत्य मी किंकर स्वामीचा ॥३५॥
ऐकोनि पुष्पकाचें वचन । संतोषोनि रघुनंदन ।
ऋषीस करोनिया नमन । विमानारुढ पै झाला ॥३६॥
पूर्व-पश्चिम व उत्तर दिशेस रामांना अधर्मचरण आढळले नाही :
श्रीराम चापशरपाणी । ये शुद्ध पश्चिम देखोनि ।
अधर्माची वार्ता कानी । ते दिशी न पडली ॥३७॥
नगरी स्थापोनि भरतलक्ष्मण । आपण करिता झाला प्रयाण ।
नाना वने उल्लघोंनि जाण । पश्चिमदिशे पै आला ॥३८॥
तदनंतरे उत्तरदिशेसी । श्रीराम निघाला शोधनासी ।
हिमाचळाचे प्रदेशीं । तापसी स्वधर्मे अनुष्ठान करिती ॥३९॥
तेथे नाही पापाचा लवलेश । शुद्ध सात्विक जन बहुवस ।
सदा भगवद्भजनीं उल्हास । आशापाश सांडोनी ॥४०॥
तयाउपरी पूर्वदिशेसी । श्रीराम निघे शुद्धीसी ।
जगन्नथपर्यंत पहाता त्यासी । अधर्म दृष्टीसी दिसेना ॥४१॥
नीळकंठ नेपाळ वैजनाथ । पूर्वबंगाल वोडसा समस्त ।
कैकट मागध गया तेथ । देश त्वरित शोधिले ॥४२॥
सर्वा ठायी भगवद्भजन । ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्र जन ।
आपुलाले स्वधर्मी होवोनि लीन । श्रीरामकीर्तन पै करिती ॥४३॥
दक्षिणदिशेला एका तापस शूद्राला
धूम्रपान करताना पाहून रामांचा त्याला प्रश्न :
तयाउपरी दक्षिणदिशेसी । श्रीराम निघाला शोधावयासी ।
शेळाचळाचे उत्तरपार्श्वी । सरोवर एक देखिले ॥४४॥
अति रमणीय तोयपूर्ण । परिवेष्टित कमळिणी जाण ।
तयाचे तीरीं तापस धूम्रपान । अधोमुखें करीतसे ॥४५॥
अधःशिर ऊर्ध्वचरण । मुखी नळिका लावोनि जाण ।
करीतसे धूम्रपान । तया रघुनंदन देखता झाला ॥४६॥
श्रीराम समीप येवोनी । बोलता झाला मधुर वचनी ।
म्हणे धन्य धन्य तू मुनी । देखोनि नयनी सुख झाले ॥४७॥
कोण याति कोण वर्ण । कोण ग्राम कोण अभिधान ।
तप करावया काय कारण । कोण इच्छा हृदयी असे ॥४८॥
विनोदार्थ महामुनीं । हे मज सांगे विस्तारोनी ।
स्वर्गप्राप्तीलागीं धूम्रपानीं । प्रवर्तलासी तापसा ॥४९॥
एवढे करोनि सायास । कोण कार्या चिंतितोस ।
येरें ऐकोनि श्रीरामवचनास । उत्तर देता पै झाला ॥५०॥
तापसी शूद्राचे उत्तर ऐकून रामांकडून त्याचा शिरच्छेद; देवांना आनंद :
म्हणे ऐके गा ये शरचापपाणी । मी प्रवर्तलों धूम्रपानीं ।
त्या फळाची इच्छा तुजलागोनी । आणिक स्वयातिही प्रकट करीन ॥५१॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जाण । या तीन्ही याति नाहींत मजलागून ।
केवळ शूद्र मी अनुष्ठान । कार्या कारण करितसें ॥५२॥
येणे शरीरे देवत्व प्राप्त । व्हावया तप करितो निश्चित ।
पूज्य व्हावे लोकांत । मान महत्त्व पावावया ॥५३॥
ऐकोनि तापसाचें वचन । श्रीरामे खड्.ग घेवोनि जाण ।
मस्तकी हाणोनि शिर छेदून । धरणीवरी पाडिले ॥५४॥
शिर पडता धरणीवरी । स्वर्गी देव जयजयकारी ।
इंद्रादिक सामोरे येवोनि ते अवसरी । श्रीरामासि स्तविते झाले ॥५५॥
भला भला गा धरणिजापती । म्हणोनि पुष्पवर्षाव करिती ।
देवकार्यालागोनि रघुपती । अवतरलासी रविवंशीं ॥५६॥
हा दुरात्मा भला मारिला । त्रैलोक्यासी आनांद झाला ।
देव म्हणती वर माग वहिला । प्रसन्न झालों तुजलागीं ॥५७॥
जे मागसी ते ये समयी । श्रीराम सत्य देऊ पाही ।
ऐसे बोलोनि ते सर्वही । थोर आनंद पावले ॥५८॥
मृतबालकास जिवंत करण्याचा वर श्रीराम देवांजवळ मागतात :
सुरांचे मुखी बळीचें वचन । ऐकोनिया श्रीरघुनंदन ।
म्हणे स्वामी झालेति प्रसन्न । तरी मृतबाळका उठवावें ॥५९॥
अयोध्येमाजी वृद्ध द्विजाचें बाळ । मृत्यु पावले अकाळ ।
उठवोनि तुम्ही प्रबळ । यश मज पै द्यावे ॥६०॥
देव म्हणती श्रीरामा । हा वधिला दुष्टात्मा ।
तेव्हांच त्या बाळाकाचा आत्मा । कुडीमाजी प्रवेशला ॥६१॥
जे काळी शिर छेदिले । तेव्हाच तयाचे प्राण आले ।
त्याच्या मातापित्यांसी सुखा झाले । सुहृद स्वजनगोत्रांसी ॥६२॥
देवऋषी म्हणती श्रीरामा । आम्ही जातो अगस्त्याश्रमा ।
दीक्षा घेतलीसे पुरुषोत्तमा । जळी वास अगस्तीने केला ॥६३॥
द्वादशवर्षपर्यंत । जळीं शय्या करी अगस्ति तेथ ।
तयाचे व्रतपरिपूर्णार्थ । जाऊ तेथ श्रीरामा ॥६४॥
तुम्हींही तेथवरी यावे । अगस्तीचे दर्शन घ्यावें ।
तयाचे व्रत श्रीराघवें । परिपूर्ण आघवें करावे ॥६५॥
श्रीरामांचे अगस्तींच्या आश्रमाला आगमन :
ऐकोनि देवांचे वचन । पुष्पकी आरुढोनि रघुनंदन ।
देवांसहित आला जाण । अगस्तिआश्रमा ते काळी ॥६६॥
देव भेटले अगस्तीसी । घेवोनि पूजा षोडशोपचारेंसीं ।
श्रीरामे वृत्तांत अगस्तीसीं । विस्तारेंसीं सांगितला ॥६७॥
नमन करोनि अगस्तीसी । देव निघाले निजाश्रमासी ।
तयाउपरी श्रीरामे कुंभोद्भवासी । नमन साष्टांगेंसी पै केले ॥६८॥
ऋषीस केला नमस्कार । अगस्तीनें केला आदर ।
फळ मूळ घेवोनि रघुवीर । सुख अपार पावला ॥६९॥
अगस्ति म्हणे श्रीरामासी । थोर भाग्ये आश्रमा आलासी ।
तुझिये प्राप्तीलागीं ऋषी । नाना सायास करिताती ॥७०॥
तुझिये प्राप्तीलागून । एकी सेविलेंसे बन ।
एक करिती धूम्रपान । एक पंचाग्निसाधन साधिती ॥७१॥
एक झाले निराहारी । एक झाले चीरकृष्णाजिनजटाधारी ।
एक ते झाले फळाहारी । निराहारी पै एक ॥७२॥
ऐसे तुझे प्राप्तीकरण । करिताती नाना साधन ।
तो तू स्वभावे दर्शन । आम्हालागून देतोसी ॥७३॥
श्रीरामा माझ्या प्रीतीलागी । ही उत्तम आभरणे लेई अंगी ।
जयांचे तेज त्रिजगीं । बाणलिया प्रकाशे ॥७४॥
ही उत्तम आभरणे जाण । विश्वकर्म्यानें केलीं निर्माण ।
ती अंगीकारोनि आपण । विराजमान पै व्हावे ॥७५॥
ऋषीची देखोनि परम प्रीती । संतोषोनियां श्रीरघुपती ।
आभरणे लेतां गगनी दीप्तीं । तया तेजाची फांकली ॥७६॥
श्रीराम म्हणे कुंभोद्भवा । ही आभरणे कोणाचीं कोणी दिधली केव्हा ।
सविस्तर सांगे मुनिपुंगवा । थोर आनंदेंकरोनी ॥७७॥
ऐकोनी दाशरथीचें वचन । बोलता झाला अगस्ति जाण ।
त्रेतायुगीचें कथन । ऐक सावध श्रीरामा ॥७८॥
एका जनार्दना शरण । अगस्तिश्रीराम संवादकथन ।
श्रोते होवोनि सावधान । रामायण अवधारा ॥७९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
श्रीराम अगस्त्याश्रमगमनं नाम एकषष्ठितमोऽध्यायः ॥६१॥ ओंव्या ॥७९॥
