वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ३८. श्रीराम युद्धासाठी आगमन

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088293 · अभंग क्र. ३८

38.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय अडतिसावा ॥
राजांचे रामदर्शनार्थ आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

याप्रकारें अयोनिजारमण । भरत आणि शत्रुघ्न लक्ष्मण ।
सद्गुरु वसिष्ठाचे करोनि सेवन । राज्यकार्य चालविती ॥१॥
करिता श्रीरघुनाथा । कोणा नाही दैन्यवार्ता ।
कोणा नाही दैन्य चिंता । राज्यीं असता श्रीराम ॥२॥

जनकांचे श्रीरामांकडे आगमन :

राज्यकार्य प्रजापाळण । रात्रंदिवस करी रघुनंदन ।
तंव कोणे काळी विदेह पूर्ण । श्रीरामदर्शना पै आला ॥३॥
नामविदेही रूपविदेही । देही पाहता तोही विदेही ।
विदेहासि देहचि नाही । विअदेहीं पाही कन्या ज्याची ॥४॥
ऐसा तो विदेही जनक । आला ऐकोनि वैदेहीनायक ।
पुढे येवोनि नमस्कार सम्यक । अति आदरे श्रीरामे केला ॥५॥
श्रीराम म्हणॆ जी विदेहनृपती । तुमचेनि आम्हा यश कीर्ति ।
तुमचेनि उप्रतेजें क्षितिपती । रावणादिक मारिले म्या ॥६॥
तुमचेनि कृपेकरून । अलभ्य लाभ पावती जन ।
मी तरी तुमचा स्थापित दीन । परी एक वचन अवधारिजे ॥७॥
मी करीन तुमची पूजा । ते अंगीकारावी जनकराजा ।
रत्नाभरणे सुवर्ण वोजा । मम प्रीती घेईंजे ॥८॥
तंव जनक म्हणॆ देवाधिदेवा । आम्ही करावी तुझी सेवा ।
तो तू पूजितोसि मूळींच्या भावा । लक्षोनिया राजेंद्रा ॥९॥
तुझे दर्शने तृप्त झालों । अकल्पित फ़ळ पावलों ।
येथवरी येवोनि कृतार्थ झालों । सकळ लधलों पूजेंतें ॥१०॥
तुवा केली आभरणीं पूजा । ते म्या दोघी कन्येंसी वोजा ।
देतसे गा गरूडध्वजा । ऐकोनि श्रीरामराजा संतोषला ॥११॥

रामांकडून सात्कार स्वीकारून जनकाचे मिथिलेला गमन :

विदेहांचे करोनि पूजन । कित्येक दिवस अयोध्येस राहवून ।
मग विदेह निघाला मिथिलेसि जाण । आज्ञा घेवोन चालिला ॥१२॥
श्रीराम म्हणॆ विदेहासी । प्रयाण करावे आपुले नगरासी ।
सवे भरत बोळवील तुम्हांसी । नगरापर्यंत दिधला ॥१३॥
ऐकोनि श्रीरामाचे वचना । जनकें श्रीरामासि करोनि प्रदक्षिणा ।
चालिला अपुल्या मिथिलाभवना । अति आनंदें गर्जनेसी ॥१४॥

कैकय देशाच्या राजाचे आगमन व त्याचा सत्कार :

तंव येरीकडे कैकयीचा ज्येष्ठ बंधु । कैकयदेशाचा प्रभु प्रसिद्धु ।
श्रीरामासी मातुलसंबंधु । श्रीरामदर्शना पै आला ॥१५॥
मातुळ आला ऐकोन । श्रीराम सामोरा होऊन ।
करोनि साष्टांग नमन आलिंगन । दिशले क्षेम परस्परें पुसती ॥१६॥
श्रीराम म्हणॆ अहो जी नृपती । आम्ही चौघे बंधु सहितीं ।
हे राज्य आणि संपत्ती । तुमचेनि प्रसादें भोगितसों ॥१७॥
इतुके बोलोनि रघुराजे । मग आरंभिले तयाचे पूजे ।
रत्नाभरणी उपचार जे जे । ते मातुलासी समर्पिले ॥१८॥
धूप दीप चंदन । नाना परिमळॆं पूजोन ।
सवेंचि म्हणॆ श्रीरघुनंदन । आपुल्या नगरा प्रयाण कीजे ॥१९॥
वृद्ध असे नगरी पिता । क्षोभ होईल त्याच्या चित्त ।
रत्नाभरणे लक्ष्मणेंसीं त्वरिता । आपुले राज्या चालिला ॥२०॥
केकयेश्वरें करोनि प्रदक्षिणा । नमस्कार करोनि सवेंचि प्रयाण ।
सांगाते घेवोनि लक्ष्मणा । आपुले नगरा निघाला ॥२१॥

काशीपतीचे आगमन व त्याचा सत्कार :

येरीकडे प्रतर्दन काशीपती । दिवोदासाचा कुमर निश्चिती ।
आला ऐकोनि सीतापती । गेला चारी पाउले सामोरा ॥२२॥
काशीपतीस देवोनि सन्मान । करोनि आलिंगन नमन ।
नाना उपचारीं पूजोन । श्रीरघुनंदन बोलतेसे ॥२३॥
श्रीराम म्हणे काशीपती । तुझेनि दर्शने आम्हा परम प्रीती ।
तुवा येवोनि सांभाळिले हे प्रीती । मोठी आम्हा तुज वाढली ॥२४॥
आता एक करावे । रत्नाभरणा सवे घ्यावें ।
तुवांआपुल्या नगरा जावे । जे अमरादिकां दुर्लभ ॥२५॥
सुवर्णकलशांचिया हारी । महादेवें धरिली शूळावरी ।
अति रमणीय माणिकार्णिकातीरीं । गिरीश करी राज्य जींचे ॥२६॥
ऐसी वरुणामाझारी । शिवे वसविली ते पुरी ।
म्हणोनि वाराणसी चतुरीं । तिये नांव बोलिजे ॥२७॥
ऐसी रमणीय काशीपुरी । तेथे जावे नृपकेसरी ।
येरें आज्ञा वंदोनि शिरी । स्वसैन्येसीं निघाला ॥२८॥

इतर आलेल्या राजांचा सत्कार :

मागिलीकडे श्रीरघुनंदन । तीन शत राजे आले ऐकोन ।
करोनि यथाविधी पूजन । वस्त्राभरणे अर्पिलीं ॥२९॥
रायांसी म्हणे श्रीरघुपती । तुमचे कृपेनें पापमूर्तीं ।
मरण पावला लंकापती । माझी कीर्ती करून ॥३०॥
तुमचे कटाक्षें रावण । मरण पावला सत्य वचन ।
परी मजवरी निमित्त ठेवून । लोक म्हणती श्रीरामे वधिला ॥३१॥
रावण मारिला रणसागरी । सहकुटुंबप्रधानपुत्रीं ।
अराक्षसी लंकापुरी । बिभीषणावेगळीं पै केली ॥३२॥
जानकीचे हरण केले । तियेनिमित्त इतुके करणॆ पडिले ।
ऐकोनि राजे बोलते झाले । श्रीरामेंसी ते समयी ॥३३॥

राजांकडून श्रीरामस्तुती :

राजे म्हणती श्रीरघुनंदन । तुवा मारिले रावणा ।
राज्यीं स्थापिले बिभीषणा । जानकी घेवोनि आलासी ॥३४॥
तुवा देवकार्य सिद्धीस नेलें । अवतारचरित्र प्रकटिले ।
तुझिये कीर्तीनें भरले । भूमंडळ उचंबळत ॥३५॥
विजयो हो तुझ्या भुजांसी । विजयी झालासी सूर्यवंशी ।
वैदेहवीरा आता दे आज्ञेसी । निजदेशाशी जावया ॥३६॥
इतुके ऐकोनि रायांचे वचन । बरवे म्हणोनि श्रीरघुनंदन ।
पुनरपी नृपातें पूजोन । वस्त्राभरणे दिधलिं ॥३७॥
हस्ती घोडे रथ संपत्ती । पृथक् पृथक् देवोनि रायांप्रती ।
बोळविता झाला तयांप्रती । आदरे अति करोनि ॥३८॥
ऐसा तो श्रीरामचंद्र । पुढे काय करिता झाला नरेंद्र ।
नृप बोलावून गुणसमुद्र । ते सावध श्रोती परिसावे ॥३९॥
आधीच रम्य रामायण । त्यावरी श्रीरामचरित्र गहन ।
परिसतां भवबंधखंडन । पुण्य पावन पै करी ॥४०॥
एकाजनार्दनी विनती । विनवीतसें संतांप्रती ।
मी नेणॆं संस्कृतव्युत्पत्ती । कथासंगतिवांचोनि ॥४१॥
जेंवीं अंध अंधारी जाय । तयासी न कळॆ मार्गासी सोय ।
तैसी मा तुम्हांमाजी पाहे । तुमचे सोयी चालतों ॥४२॥
अबद्ध सुबद्ध रामायण । भवरोगसी करी छेदन ।
जेंवी पुरिला हुताशन । नाना वने पै जाळीं ॥४३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तराकांडे एकाकारटीकायां
रामनृपदर्शनोत्सवो नाम अष्टत्रिंशो॓ऽध्यायः ॥३८॥ ओंव्या ॥४३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग