उचिताचा काळ । साधावय
2839.
उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ । आपले सकळ । ते प्रसंगी पाहिजे ॥१॥
नेम नाही लाभ हानि । अवचित घडती दोनी । विचारूनि मनी । पाहिजे ते प्रयोजावे ॥धृपद॥
जाळ जाळा काळे । करपोनेदावे आगळे । जेविता वेगळे । ज्याचे त्याचे तेथे शोभे ॥२॥
पाळी नांगर पाभारी । तन निवडूनि सोंकरी । तुका म्हणे घरी । सेज जमा शेवटी ॥३॥
अर्थ :
योग्य वेळ आल्यानंतर आपले हित साध्य करण्यासाठी बुध्दीच्या बळाचा वापर करुन, प्रसंगानुरुप त्या बुध्दीबळाचा वापर केला पाहिजे. लाभ आणि हानी केव्हा घडेल याचा नेम नाही अचानक दोन्हीपैकी एक काहीतरी घडते. त्यामुळे आपला लाभ कशात होईल याविषयी मनाशीच विचार करावा आणि योग्य त्या कार्याचे प्रयोजन म्हणजे त्याची युक्ती करावी. अन्न शिजवताना अग्नी तर लागतोच परंतू काही वेळेस अग्नी लागतो तर काही वेळेस लागत नाही त्यामुळे अन्न शिजवणाऱ्याने अन्न करपले नाही पाहिजे याची खात्री घेतली पाहिजे. त्याप्रमाणे अन्नग्रहण करताना आपण जेवताना आपल्या स्थितीप्रमाणे आपल्या अधिकाराप्रमाणे योग्य ठिकाणी बसून अन्नग्रहण करावे जेवायला जो तो ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे ज्याच्या त्याच्या ठिकाणी बसला तरच ते शोभत असते. तुकाराम महाराज म्हणतात, शेती करताना प्रथम पाळी नंतर शेत नांगरणी त्यानंतर पेरणी करावी लागते आणि पेरणी केल्यानंतर तण काढून शेतमालाचे रक्षण करावे लागते. आणि मग शेवटी एकदा की शेतमाल आला की त्याचे खळे करुन मग घरी घेऊन यावे.
