अंगी देवी खेळे । का
2838.
अंगी देवी खेळे । का रे तुम्हासी न कळे । कोणाचे हे चाळे । सुख दुःख न मनिता ॥१॥
मी तो आता येथे नाही । ओळखी वचनाच्या ठायी । पालटाचा घेई । भाव खरा लोपे ना ॥धृपद॥
आपुलाले तुम्ही पुसा । सोवा पेव्याच सरिसा । स्थिरावल्या कैसा काय । जाणो विचार ॥२॥
तुका म्हणे लाभकाळ । तेथे नसावे शीतळ । मग तैशी वेळ । कोठे जाते सांपडो ॥३॥
अर्थ :
अरे माझ्या अंगांमध्ये देवी संचारली आहे हे तुम्हाला का रे कळत नाही? मला सुख व दुःख देखील समजत नाही हे चाळे कोणाचे आहे? माझ्या बोलण्यावरून तुम्ही समजून घ्या की मी देहभानावर नाही. आणि माझ्या मध्ये जो काही बदल झाला आहे तो पालटला देखील जाणार नाही आणि झाकला देखील जाणार नाही. तुम्ही हे लक्षात घ्या की माझ्या अंगांमध्ये देवीचा संचार झाला आहे धान्य जसे पेवेमध्ये गुप्त स्वरूपात असतात त्याप्रमाणे तुमच्या मनातील गुप्त प्रश्न तुम्ही मला विचारा. अहो माझ्या अंगामध्ये देवीचा संचार झाला आहे आणि त्या देवीचा संचार जर स्थिर झाला तर नंतर मला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा विचार काय समजणार आहे? तुकाराम महाराज म्हणतात आता ही वेळ म्हणजे लाभ करून घेण्याची आहे त्यामुळे तुम्ही येथे शांत राहू नका. आणि एकदा की ही सुवर्णसंधी तुमच्या हातातून गेली तर मग कुठे तुम्ही या सुवर्णसंधीला सापडत जाताल?
