सनकादिकी मंत्रघोष |
980.
सनकादिकी मंत्रघोष | केले विधिपूर्वक पांच दिवस |मग पांडुरंग यथावकाश | भक्ता वास महिवरी ॥१॥
धन्यभूमि आळंकापुरी | ज्ञान समाधि खेचरी |पूर्ण परिपूर्ण श्रीहरी | स्वये आपण उभा असे ॥२॥
ध्रु.॥संत भागवत देव्हडे | अमर उभे चहुंकडे |नारद तुंबर पुढे | वीणा वाजविती ॥३॥
एकी केला जयजयकार | ज्ञानदेवी धरूनिया कर |विठ्ठल चरणा समोर | निकट बैसते जाले ॥४॥
करे कुरवाळिले ज्ञाना | कांसवी अवलोकिला पान्हा |आसुवे येताती नयना | तया ज्ञानदेवाचिया ॥५॥
विठोजी म्हणे ज्ञानांजना | तुझेनि कवित्वे हरे दारूणा |उच्चारिता महाविघ्ना | सकळै पळतील ॥६॥
तुज आठविल जो भक्त | तो होईल विरक्त |ऐसे विठोजी बोलत | येरु चरणी रूळे ॥७॥
नामा म्हणे सकळ तीर्थराज | तया क्रुपा कैसी केली सहजा |एकादशी दिधली पूजा | तया ज्ञानदेवासी ॥८॥
