पांडुरंग हरि माजी भक
30.
पांडुरंग हरि माजी भक्तजन । कैसे वृंदावन शोभतुसे ॥१॥
ब्रह्मादिक ठेले विमाने अंबरी । काला तो गजरी पंढरीये ॥२॥
सनकादीक देव देहुढा पाऊली । गोपाळ वांकुली दाविताती ॥३॥
पुंडलिका नाचे देवमुनी सर्व । भीमातीरी देव प्रगटले ॥४॥
ज्ञानदेव सोपान विसोबा खेचर । नरहरि सोनार नाचताती ॥५॥
निवृत्ति मुक्ताई चांगदेव गाढा । हरिचा पवाडा झेलिताती ॥६॥
अर्थ:
पांडुरंग व त्याचे नाम घेत येणारे भक्त यांच्या मुळे पंढरी वृंदावन क्षेत्रा सारखी शोभत आहे. तो हरिनामाच्या गजरात होणारा काला पाहायला पंढरीत ब्रह्मादिकांच्या विमानांची गर्दी झाली आहे. सनकादीक भक्त व एका पायावर दुसरा पाय वाकडा ठेऊन देव त्या ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखवत आहे. हरिनामाच्या गजरात नाचणाऱ्या पुंडलिकाला पाहुन ते सर्व देव पंढरीत प्रगट होऊन नाचु लागले.तसेच ज्ञानदेव, सोपान, विसोबा खेचर, नरहरी सोनार हे सर्व संत ही नाचु लागले. निवृत्तिनाथ म्हणतात ते स्वतः, मुक्ताई व चांगदेव हरिनामात रंगुन गेले.
