वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

आसनी बैसेन उत्तराभिम

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076287 · अभंग क्र. १७९

179.
आसनी बैसेन उत्तराभिमुख ।
सहजासन देख अंतकाळी ॥१॥
सूर्योदयापूर्वी घटिका तीन जाण ।
आसनी बैसेन ध्यानमुद्रे ॥२॥
तेव्हा तुवा पुत्रा बैसोनी पाठीसी ।
सावध मानसी आत्मनिष्ठे ॥३॥
बाह्य ध्वनि कानी पडती तुज काही ।
ध्यान ते हृदयी धरी तेथे ॥४॥
करावा गजर नामकीर्तनाचा ।
दिवस आनंदाचा महा थोर ॥५॥
लावीन रे हात जाण जये स्थळी ।
जाण तू ते मनी प्राण तेथे ॥६॥
तीन आणि तेरा सोळा घटिका जाण ।
आसनी बैसोन ध्यान-मुद्रे ॥७॥
नव घटिका नाम न संडी उच्चार ।
चित्ताचा निर्धार सांगितला ॥८॥
सात घटिका पुढे तयाची वाटणी ।
इंद्रिये गोठणी सर्व येती ॥९॥
चार घटिका ध्यानी राहेन तटस्थ ।
तुवा मन स्वस्थ असो द्यावे ॥१०॥
ऐशा वो घटिका तेरा गेलियाने ।
सद्गुरूस्मरणे वेद जिव्हा ॥११॥
तुकाराम मुखी गंगाधरस्मरण ।
अठरा वेळ माल करे तेचि ॥१२॥
त्यानंतरे पुढे नासिकाग्री दृष्टी ।
वळोनिया मुष्टी हात दोन्ही ॥१३॥
माळ तेव्हा कंठी घालेन स्वहस्ते ।
करूनी प्रशस्त चित्त राहे ॥१४॥
एकाग्रता सर्व वायूंचा उपरम ।
उदानी संभ्रम योग त्याचा ॥१५॥
हृदयी धरोन नारायण-ध्यान ।
राहे समरसोन चित्त तेव्हा ॥१६॥
अखंड अद्वय ह्रुदय-व्यापक ।
स्मरण ते एक अद्वयाचे ॥१७॥
बहेणि म्हणे ऐसी अंतकाळस्थिती ।
सांगितली गति निश्चयेसी ॥१८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग