बोलावा ब्राह्मण मंत्
178.
बोलावा ब्राह्मण मंत्रस्नान करू ।
दानविधि सारू अंतकाळी ॥१॥
धरावे प्रायश्चित्त वेदाचिया मते ।
आमुचे दैवत द्विज तुम्ही ॥२॥
दशदाने देऊनी केला नमस्कार ।
आता कृपा फार असो द्यावी ॥३॥
सात प्रहर शेष उरला अंतकाळा ।
दिंडीटाळघोळ-कथाभारे ॥४॥
ज्ञानेश्वरी ग्रंथ संपला पर्जन्य ।
करावे ब्राह्मण सिद्ध उभे ॥५॥
वाद्याचिये ध्वनी वाजती अंबरी ।
दशनाद भीतरी आइका रे ॥६॥
घालोनी आसन बैसोनी ध्यानस्थ ।
पाहे मी प्रशस्त गुरू-खुणे ॥७॥
शंख चक्र गदा, तुळसीच्या माळा ।
ब्राह्मणांच्या गळा शोभताती ॥८॥
सावधान तुम्ही म्हणा ज्ञानेश्वर ।
विठ्ठल निर्धार नाम जपा ॥९॥
सांगेन ते तुम्ही ऐका रे सर्वही ।
अंतकाळ देही जवळ आला ॥१०॥
बहेणि म्हणे आता पाचही ते योग ।
पाहो पा प्रसंग येचि क्षणी ॥११॥
