(बाळक्रीडा अभंग)
3864.
(बाळक्रीडा अभंग)
जाणवले इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती ॥१॥
तातडिने मेघा आज्ञा करी राव । गोकुळींचा ठाव उरो नेदा ॥२॥
नेदाविया गाई म्हसी वांचो लोक । पुरावे सकळिक सिळाधारी ॥३॥
धाक नाही माझा गौळिया पोरा । सकळिक मारा म्हणे मेघा ॥४॥
म्हणविती देव आपणा तोवरी । नाही जव वरी कोपलो मी ॥५॥
मीपणे हा देव न कळेचि त्यासी । अभिमानी राखी गर्वाचिया ॥६॥
अभिमानराशी जयाचिये ठायी । तुका म्हणे तई देव दुरी ॥७॥
अर्थ :
आपला इंद्रयाग कृष्णाने बंद केला आणि गोपाळ आपल्याकडे पाहून वाकुल्या दाखवतात हे इंद्राला समजले. अगदी तातडीने इंद्राने मेघदेवाला आज्ञा केली की, इतकी वृष्टी गोकुळावर करा की, गोकुळाजवळ एक सुध्दा अवशेष ठेवू नका. शिळया दारांचा वापर करा गोकुळातील गाई, म्हशी आणि लोकांना कोणालाही वाचू देऊ नका अरे या गवळयाच्या पोरांना माझा धाक राहिला नाही सर्वांना मारु टाका असा इंद्रदेव मेघाला म्हणत होता. जोपर्यंत मी कोपत नाही तोपर्यंत तो कृष्ण् स्वत:ला देव म्हणून घेतो. ज्याजवळ मीपणा आहे, अभिमान आहे, गर्वाच्या राशी आहे तोपर्यंत देव त्या लोकांना कळणारच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पुढे इंद्र म्हणतो की, ज्याच्या ठिकाणी अभिमान आहे त्याला देव कळणारच नाही तसेच इंद्राच्या ठिकाणीही अभिमान निर्माण झाला व त्यालाही श्रीकृष्ण् देव आहे हे समजले नाही आणि ज्याच्या ठिकाणी अभिमान आहे त्याच्यापासून देव दूरच आहे.
