द्याल माळ तरी पडेन म
4008.
द्याल माळ तरी पडेन मी पाया । दंडवत वाया कोण वेची ॥१॥
आले ते हिशोबे अवघिया प्रमाण । द्याल तरी दान मान होतो ॥धृपद॥
मोकळिया मने घ्याल जरी सेवा । प्रसाद पाठवा लवकरी ॥२॥
तुका म्हणे तुम्ही जालिया कृपण । नामाचे जतन मग कैचे ॥३॥
अर्थ :
देवा तुम्ही प्रसाद म्हणून तुमच्या गळयातील माळ मला दयाल तरच मी तुमच्या पाया पडेल नाहीतर फुकट दंडवत तुम्हाला कोण घालील ? देवा जे हिशोबाने आहे ते सर्वांनाच प्रमाण आहे म्हणजे सर्वांनाच मान्य असते त्यामुळे तुम्ही मला दान दिले तरच तुम्हाला मान मिळेल. देवा जसे मोकळेपणाने तुम्ही आमच्या कडुन तुमची सेवा करुन घेता अगदी त्याप्रमाणे मोकळया मनाने प्रसादही तुम्ही पाठवा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही जर दान देण्यास कृपण म्हणजे कंजूष झालात तर तुमच्या दीनवत्सल, दीनदयाल, पतितपावन, भक्तवत्सल या नामाचे जतन कसे होईल ?
