वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ६५. ऋषींची स्तुती

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088126 · अभंग क्र. ६५

65.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय पासष्टावा ॥
मंदोदरी सहगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

ऐसा रावणाच्या वनिता । अतिशोकाकुळिता ।
विलाप करिती समस्ता । दुःखाक्रांता रणरंगी ॥१॥
मंदोदरी आली तेथ । अति दुःखे दुःखार्दित ।
पडिला देखोनि निजकांत । विलाप करीत आक्रोशे ॥२॥

तासां विलपमानानां तदा रावणयोषिताम् ।
ज्येष्ठपत्‍नी प्रिया दीना भर्तारं समुदैक्षत ॥१॥
दशग्रीव हतं दृष्ट्वा रामेणाक्लिष्टकर्मणा ।
पतिं मंदोदरी तत्र कृपणं पर्यदेवयत् ॥२॥

मंदोदरीकृत रावणशची स्तुती व शोक – विलाप :

विष्णुसंभूत जे स्वये । रचिली स्वहस्ते देवे ।
चराचर मोहातें पावे । रुप स्वभावे देखता ॥३॥
जो त्रिकाळ आत्मज्ञानी । तो मोहला शूळपाणी ।
ओळखवेना निजपत्‍नी । शंकर मनी वेडावला ॥४॥
अकळ भगवंताची माया । अनन्यरुपें रचिली तया ।
रावणातें भुलवावया । आणि जाया मंदोदरी ॥५॥
ते रावणाची ज्येष्ठ पत्‍नी । स्वये सतीशिरोमणी ।
आली रणभूमि ठाकोनी । पति लक्षोनि मंदोदरी ॥६॥
निजपति रुधिरोक्षित । विसंज्ञ पडिला रणांत ।
देखोनिया विलाप करित । प्रताप सुचवि पतीचा ॥७॥
जो अनुज कुबेराचा । पढियंता गण शिवाचा ।
त्रैलोक्यी प्रताप तयाचा । तो बाणी रामाच्या पडियेला ॥८॥
जेणे आंदोळिला कैलास । प्रसन्न केला महेश ।
तो रणी पडला क्षितीश । सांडूनि आस रणरंगी ॥९॥
आत्मलिंग मातेकारणें । निमेषगती आणिले जेणे ।
तेणे शयन केले रावणे । श्रीरामबाणे करोनिया ॥१०॥
करोनिया महाख्याती । बंदी घातला सुरपती ।
मंडळवर्ती नित्य खालती । तो लंकापती रणी पहुडला ॥११॥
नित्य ओळंगती सुरवर । चळीं कांपती ऋषीश्वर ।
भेणे सेविती गिरिकंदर । तो दशवक्त्र रणी पहुडला ॥१२॥
जिचेनि नांवे विश्व सुखी । जे विश्वमाता जानकी ।
ते हरिली एकाएकी । झालासि लोकी जगनिंद्य ॥१३॥
या कारणे समग्रीं । प्रहस्तादि मंदोदरीं ।
सकळ प्रधान थोरथोरी । नानापरी शिकविले ॥१४॥
इंद्रजित तुझा ज्येष्ठ कुमर । बंधु कुंभकर्ण महावीर ।
मानिलें नाही त्यांचे उत्तर । बहुप्रकार शिकविती ॥१५॥
धर्मात्मा बिभीषण । युवराजा बंधु जाण ।
हितोपदेश सांगता पूर्ण । केले ताडण लत्ताघातें ॥१६॥
तेंचि हित झाले तयासीं । शरण गेला तो रामासी ।
रामे आश्वासिलें प्रीतीसी । राज्यभिषेकासी करोनिया ॥१७॥
बंधु रामा शरण गेला । तो स्वराज्यें सुख पावला ।
तू नायकसीच बोला । तेणेंचि झाला घात तुझा ॥१८॥
जेणे देहे दशशिरी । कैलासमंदरमेरुशिखरी ।
क्रीडत होता प्रीती थोरी । तो गीधघारीं उचलिला ॥१९॥
चैतन्यवनीं नंदनवनीं । भोग भोगिले सुरभुवनीं ।
ते शरीर रणांगणी । पक्षिश्रेणी लुंछिती ॥२०॥
नानापरी आक्रंदतां । न बोलसी तू लंकानाथा ।
काय लागली सुषुप्ति अवस्था । की गेलासी तत्वता शिवार्चना ॥२१॥
श्रीरामाच्या निजबाणीं । करोनि देहाची भंगाणी ।
मोक्ष साधिला रणांगणी । बळेंकरोनि लंकेशा ॥२२॥
मी तुझी निजकांता । दुःखसागरीं तळमळतां ।
मज सांडोनि निजमोक्ष घेता । तुज वंचकता लागेल ॥२३॥
पुरुषार्थ चुतर्विध । त्यांत पहिले तीन प्रसिद्ध ।
स्त्रियेचा भाग विशुद्ध । असे सिद्ध शास्त्रामाजी ॥२४॥
ऐसे न म्हणे लंकानाथा । अवंचक जे सर्वथा ।
त्यांसी उपेक्षोनिया जाता । परमार्थ तत्वता हा नव्हे ॥२५॥
तरी तू आमुचा भ्रतारु । तूचि आमुचा सद्‍गुरु ।
तूंचि आमुचा ईश्वरु । तुझेनि संसारी सुखरुप ॥२६॥
तुझेनि आम्हा इहलोक । तुझेनि आम्हा परलोक ।
तुझेनि आम्हा मोक्षसुख । देहदुःख जेथे नाही ॥२७॥

बिभीषणाला मंदोदरीचे सांत्वन करण्यास श्रीराम सांगतात :

ऐसा विलाप बहुता रीती । मंदोदरी आक्रंदती ।
ते देखोनि रघुपती । निजचित्तीं कळवळला ॥२८॥
पाचारोनि बिभीषण । सांगतसे रघुनंदन ।
भ्रातृभार्येचें शांतवन । तुवा आपण करावे ॥२९॥
महासती प्रतिव्रता । मंदोदरी अति दुःखिता ।
तिसी शांतवोनि आता । करी तत्वता संस्कार ॥३०॥

एतस्मिन्नंतरे रामो बिभीषणमुवाच ह ।
संस्कार क्रियतां भ्रातुः स्त्रियश्चैता निवर्तय ॥३॥
तमुवाच ततो धीमान्बिभीषण इदं वचः ।
विमृश्य बुद्ध्या तत्वज्ञो धर्मार्थसहितं वचः ॥४॥

ऐसे श्रीरामाचे वचन । ऐकतांचि बिभीषण ।
भक्तांमाजी अग्रगणी जाण । तो तत्वज्ञ रामभजने ॥३१॥
जो इहलोक परलोक । उभयसंस्था जाने देख ।
तत्वज्ञान अति सुटंक । ज्ञानटिळक ज्ञानियाचा ॥३२॥
लाहोनि रामआज्ञापन । मंदोदरीसी विचक्षण ।
बोलता झाला आपण । सावधान अवधारा ॥३३॥

बिभीषणाचा उपदेश :

तू सती पतिव्रता । मंदोदरी विष्णुसंभूता ।
व्यर्थ खेद करणे चित्ता । उचित सर्वथा हे नव्हे ॥३४॥
असलियाचा संतोष जनी । गेलियाची हानी मानी ।
हे हर्ष शोक जनी दोनी । ते ज्ञाते मनी न धरिती ॥३५॥
प्राप्तविषयें सुख भोगावें । अप्राप्तविषयें दुःख पावावे ।
तरी ते प्राकृत जाणावे । न संभवे सतीत्वा ॥३६॥
तुझे सतीत्वाची ख्याती । विस्तारली त्रिजगती ।
ते मढें घेवोनि हाती । दुःखावर्ती निमगन ॥३७॥
जेव्हा आदरिला शोक । तेव्हांचि सतीत्व गेले देख ।
आकल्पवरी करिता दुःख । दशमुख तरी नये ॥३८॥
रडत रडत शोक करीत । अपूर्ण कामे तळमळित ।
मढें धरोनि आगीं निघत । अधःपात दोघांसी ॥३९॥
प्रेत धरोनि आगीं रिघती । त्या प्रेतपिशाच होती ।
जे का भोगी अवतरती । मान मागती बहुविध ॥४०॥
ऐसी एक गती । एक आणिकचि स्थिती ।
पति निमाला मध्यरातीं । त्या नेणती देहभ्रमें ॥४१॥
मध्यरात्रीं निमाला पती । दिवसा मढें मिरवे सती ।
पति गेला हातोहाती । मढ्याप्रती आगीं रिघे ॥४२॥
जरी देहचि पति होये । तरी तो तैसाचि पडिला आहे ।
गेला गेला म्हणती काये । नेणती सोये तयाचि ॥४३॥
एकी शुद्धसत्वात्मका । पति चैतन्य जाणोनि देखा ।
सांडून देहाचा आवांका । सायुज्य देखा साधिती ॥४४॥
त्या त्रैलोक्यासी मंडण । येरांसी दुःख दारुण ।
स्वये भोगिती अधःपतन । करिती भ्रमण पिशाचत्वें ॥४५॥
शुद्धस्वरुप नेणे सती । मढें धरोनि बहुसाल मरती ।
त्यांत तुझी कवण गती । न कळे निश्चिती आम्हांसी ॥४६॥
श्रीरामहस्तें मरता । अवघ्या त्रैलोक्या देखता ।
सायुज्य झाले लंकानाथा । कुळासहित उद्धरिला ॥४७॥
त्याचा शोक करिता देख । अवघे विश्व म्हणेल मूर्ख ।
तूंही पाहे निजविवेक । दशमुख कवण तो ॥४८॥
जरी देह म्हणसी रावण । तरी तो तैसाचि आहे जाण ।
म्हणसी त्याहून विलक्षण । त्यांचे ज्ञान तुज नाही ॥४९॥
इंद्रियेंचि म्हणसी पती । स्वतः चैतन्य ती नव्हेती ।
ज्याच्या ठायी चाळकशक्ती । तो निश्चिती वेगळाचि ॥५०॥
ऐसे स्थूळ सूक्ष्म कारण । चौथा देह महाकारण ।
चाळक त्याहूनि भिन्न । न कळे चिन्ह तयाचे ॥५१॥
याचिलागीं योग करिती । याचिलागीं याग अनुष्ठिती ।
उग्र पुरश्चरणें करिती । मंत्र जपती यालागी ॥५२॥
व्रत तप आणि दान । याचिलागीं तीर्थाटन ।
नौष्ठिक ब्रह्मचर्य पूर्ण । यालागी जाण आचरती ॥५३॥
याचिलागीं क्षेत्रवास । याचिलागीं संन्यास ।
संसारावरी घालून कास । होती उदास यालागी ॥५४॥

रामांच्या निजस्वरुपाची ओळख करुन घ्यावी :

म्हणोनि चाळक तो नेणतां । सकळ साधने होती वृथा ।
याकारणें तुवा आता । चाळक तत्वता लक्षावा ॥५५॥
लक्षिलिया निजचाळक । निःशेष नासे द्वंद्वदुःख ।
स्वये ब्रह्मत्व ठसावे देख । अगाध सुख पाविजे ॥५६॥
आता असोत या गोष्टी । तुज रावणाची अवस्था मोठी ।
तरी आता उठाउठी । राम जगजेठी उडवील ॥५७॥
नेणसी रामाचे महिमान । वृथाचि करिसी विलपन ।
राम परमात्मा आपण । अलक्ष पूर्ण सुरसिद्धा ॥५८॥
राम स्रष्ट्यातें उपजविता । राम जीवातें जीवविता ।
राम काळाचा संहर्ता । राम सर्वथा अलक्ष ॥५९॥
राम इंद्रिया चेतविता । राम प्राणांतें चाळिता ।
राम मनाते कल्पिता । राम बोद्धव्यता बुद्धीची ॥६०॥
राम चित्ताचें चेतव्य । रामे अहंकारा अहंभाव ।
अंतःकरणी आवरणभाव । जाण स्वयमेव श्रीरामे ॥६१॥
सप्तधातु सत्पकोश । रामे वाढती सावकाश ।
रामेंवीण सकळ ओस । हे कोणास कळेना ॥६२॥
मृत्तिकेवेगळा नाही घटु । तंतूवेगळा नाही पटु ।
अक्षरावीण न घडे पाठु । जाण स्पष्ट महासतिये ॥६३॥
जो तो घट निपजे । गगन त्या सबाह्य सहजें ।
तेंवी प्रतिमा रघुराजें । निजांगें व्यापिजे निपजतां ॥६४॥
जेंवी सुवर्णी अलंकार । तेंवी श्रीरामी चराचर ।
तो प्रत्यक्ष असता रघुवीर । मोहे अपार आक्रंदसी ॥६५॥

मंदोदरीस बोध :

ऐसे बिभीषणें सर्वज्ञें । सांगता हितवचनें ।
तेंचि बाणले तत्क्षणें । निजज्ञाने अति चतुर ॥६६॥
जेंवी मेघमुखींचें उदक । पडतांचि एकाएक ।
वरीच्यावरी चातक । झेलून देख पै नेत ॥६७॥
उगवता रजनीकर । ताप निरसोनि समग्र ।
परमामृते चकोर । तृप्ती साचार पावती ॥६८॥
बिभीषणवचनेंकरी । मदुर गिरा अति कुंसरीं ।
प्रबोधिली मंदोदरी । दुःखसागरीं पै बुडता ॥६९॥
येरी होवोनि सावधान । नमियेला बिभीषण ।
भली दिधली आठवण । होसी सर्वज्ञ रामभक्त ॥७०॥
तुझेनि बोले मज आता । आठवली पूर्वकथा ।
याचि रीती जनकदुहिता । श्रीरामसंस्था सांगितली ॥७१॥
परी मोहाचे बळ दुर्धर । आठवों नेदी विचार ।
तुझा जो का वचनभास्कर । किरणे खडतर तयाची ॥७२॥
त्यांचा पडतांचि प्रकाश । मोहतमाचा र्‍हास ।
झाला न लागता निमेष । हृदयकोश उजळला ॥७३॥

रमंते योगिनी यत्र सत्यानंदे चिदात्मनि ।
इति रामदेनासौ परब्रह्माभिधीयते ॥५॥

राम परमात्मा चिद्धन । ऐसे निश्चिया झाले पूर्ण ।
चरचरीं रघुनंदन । अनवच्छिन्न साक्षित्वें ॥७४॥
याच रीती रावण । सर्वगत सनातन ।
जाणोनिया रघुनंदन । निजशिरींकरुन पूजिला ॥७५॥
सायुज्याचा रघुराज । निजशिर छेदोनि वोजा ।
करिता प्रीती लक्षपूजा । वीस भुजां उल्लास ॥७६॥
दुर्जय कष्टेंकरोनि जाण । सायुज्य साधिले आपण ।
तो उठविता दशानन । लागेल संपूर्ण स्वामिद्रोह ॥७७॥
निजदेहो रावण । करोनिया रामार्पण ।
सायूज्य पावला परिपूर्ण । तेंचि आपण साधावें ॥७८॥

देह रामार्पण करुन पतीच्या मार्गाने जाण्याचा मंदोदरीचा निश्चिय :

जेणे मार्गे निजपतीं । साधियेली निजभक्ती ।
मीही साधीन त्याचि रीती । देह रघुपती अर्पीन ॥७९॥
आता उठविलिया रावण । मरण न चुके जाण ।
तेणे काळे रघुनंदन । सर्वथा जाण भेटेना ॥८०॥
श्रीरामदृष्टीपुढें मरण । त्यापुढे तुच्छ ब्रह्मसदन ।
स्वर्गादिका पुसे कोण । ते आजि जाण सांपडलें ॥८१॥
श्रीरामदृष्टीपुढें देहपतन । ब्रह्मसायुज्य तेणे पूर्ण ।
ते सांडूनि वांछी आन । नरक दारुण तयासीं ॥८२॥
सांडोनिया श्रीरघुनाथा । देहलोभें विषय भोगितां ।
अनिवार नरकावस्था । भोगितां कल्पांती सरेना ॥८३॥
म्हणोनिया पतिव्रता । अनुसरोनिया तत्वता ।
देह त्यागोनियां आता । निजकांता विनटेन ॥८४॥
ऐसा करोनि निर्धार । पुढे चालिकी सुंदर ।
नमूनि साष्टांगी रघुवीर । आनखाग्र पाहिला ॥८५॥
सांग अवलोकोनि रुपडे । पुनः पुनः वाडेंकोडें ।
मनी धरिले प्रेम गाढे । निजनिवाडे सुंदरी ॥८६॥
येथे क्षणे श्रोते कोपती । ज्यासी नाही वर्णव्यक्ती ।
तो अनिवार निश्चिती । आनखाग्रस्थिती तेथे कैची ॥८७॥
ऐसे आक्षेपीं उत्तर । श्रोते परिसोत चतुर ।
राम रुपातीत पर । तोचि अवतार धरीतसे ॥८८॥
आबळा भोळे नेणती । केंवी अव्यक्ती प्रवेशती ।
म्हणोनि राम आला व्यक्ती । चिदचिन्मूर्ती द्विबाहु ॥८९॥
त्याते सांग अवलोकून । केले प्रदक्षिणा नमन ।
तीर्थ घेतले प्रार्थून । पुसे आज्ञापन सतीत्वा ॥९०॥
तंव श्रीरामतेजे विलक्षण । क्षणैक परतवूनि प्राण ।
बोलता झाला पै रावण । स्वहितवचन निजकांतें ॥९१॥
दुकाळिया बुभूक्षितासी । ओगरिलें असता षड्रसांसी ।
जेंवी न पुसे कोणासी । घेत कवळासी तांतडी ॥९२॥
तेंवी श्रीरामदृष्टी चोखट । विस्तारिलें सायुज्यताट ।
तेथे आलीस अवचट । तरी यथेष्ट साधावें ॥९३॥
नश्वर देहाचियेसाठीं । कैवल्य येथे उठाउठी ।
पडली स्वानंदमिठी । राम जगजेठी ओळला ॥९४॥
त्या आनंदातें अनुसरोन । श्रीरामाते धरुन ।
अविलंबें करोनि जाण । स्वहित आपण मागावें ॥९५॥
चित्तासीं अति चंचळता । बुद्धीसीं नाही स्वस्थता ।
तू सती प्रतिव्रता । विलंब सर्वथा न करावा ॥९६॥
बंधु रामासी शरण गेला । सुवर्णाचे नगर पावला ।
विरोधोनि म्या वहिला । रामसायुज्य लाधलों ॥९७॥
मज उद्धरोनि रघुनाथे । दिधले स्वसुखसाम्राज्यातें ।
तिष्ठत राहिलोंससें येथे । प्रतीक्षा करीत पै तुझी ॥९८॥
तू तंव अवंचक पतिव्रता । भगवद्‍बुद्धीं निजकांता ।
भजिन्नलीस यथार्थता । कृपा रघुनाथा तेणे आली ॥९९॥
ते कृपेचे आयतन । देही देहभाव सांडून ।
विदेहत्केंरोनि जाण । सायुज्य आपण साधावें ॥१००॥
इतकें बोलोनि रावण । निवांत राहिला आपण ।
आनंदमय त्रिभुवन । साक्षी दशानन वदतांचि ॥१॥
मंदोदरीचे सतीत्व । श्रीरामाचे निजवैभव ।
ऐकोनिया अति अपूर्व । त्रैलोक्यी सर्व विस्मित ॥२॥
रामनामाच्या दीर्घ स्वरें । खेचरें भूचरें वनचरें ।
दानवे मानवे समग्रें । जयजयकारे गर्जती ॥३॥

मंदोदरी आनंदाने सहगमनाची तयारी करते :

येरीकडे महासती । सहगमनाची आइती ।
करिती झाली अति प्रीती । आनंद चित्ती अनिवार ॥४॥
सहस्रसंख्या संभार । चंदनकाष्ठें बिल्वागर ।
तुळसीकाष्ठें अति पवित्र । वेगवत्तर आणिली ॥५॥
देवोनि सतीत्वाचीं वाणे । श्रीराम कवळी निजध्यानें ।
करावया निजधामा पेणे । प्रेमानुसंधानें डुल्लत ॥६॥
दहनरचन अति वोजा । शयन करविलें वीस भुजां ।
शिरांचा विखुरला जो पुंजा । दशकंठभाजा एकवटी ॥७॥
तंव अपूर्व वर्तले तेथे । निजशिरीं श्रीरामाते ।
लक्षपूजा पूजिलें होते । ती समस्ते न दिसती ॥८॥
विस्मित झाली मंदोदरी । शिरें न दिसतां सुंदरी ।
हो‍उनि अत्यंत घाबरी । विचार करी शिरांचा ॥९॥

ते पाहून बिभीषण स्मित करुन मंदोदरीचे अज्ञान प्रकट करतो :

देखोनिया तिचे चिन्ह । हांसिन्नला बिभीषण ।
श्रीरामाचे महिमान । अद्यापि ज्ञान तुज नाही ॥११०॥
जे अर्पिले श्रीरामासी । ते केंवी परते जळावयासी ।
मंदोदरी ऐसी कैसी । श्रीराममहिमेसीं अनोळख ॥११॥
जे श्रीरामासी मिनले । त्याचे नाम रुप तेव्हांचि गेले ।
मग प्रयत्‍नी शोधिलें । तरी परतले दिसेना ॥१२॥
अलंकार हरपे सुवर्णी । तेंवी पतिशिरें रघुनंदनी ।
सर्वथा गेली हारपोनी । ती कैसेनि दिशतील ॥१३॥

ते ऐकून त्यांस नमस्कार करुन चितेवर देहार्पण :

ऐकोनिया ते वचन । केले बिभीषणासी नमन ।
करोनिया रामस्मरण । केले शयन पतिसेजे ॥१४॥
विधियुक्त उपासन । दक्षिणहस्तेंकरुण ।
मंत्राग्नि चेतविला पूर्ण । देदीप्यमान तेजस्वी ॥१५॥
चैतन्याग्नि अंतरीचा । बाह्य प्रदीप्त उपासनेचा ।
भडका उठिला अग्नीचा । प्रकाश दोहींचा एकचि ॥१६॥
जेंवी अग्नीमाजी सुवर्ण । तद्रूपतेसीं देसीप्यमान ।
भासे अति सुलक्षण । मंदोदरी जाण तेंवी दिसे ॥१७॥
पतिसंगें होते शयन । ते वेंगी बैसली उठोन ।
बोलती झाली आपण । श्रीराममहिमान ते ऐका ॥१८॥

अग्नीत उठून बसून ती राममहिमा सांगते :

निजानंदेंकरोनि वहिली । जनकदुहिता अनुवादली ।
प्रयाणकाळीं बोलली । पतिव्रता वहिली सुलोचना ॥१९॥
हेंचि वदला बिभीषण । राम मानवी नव्हे जाण ।
राम परमात्मा आपण । राम चिद्धन चिन्मूर्ति ॥१२०॥
राम चैतन्याची कळा । राम जीवाचा जिव्हाळा ।
राम प्रेमाचा पुतळा । पावली कळा मज आता ॥२१॥
तीर्थ घेवोनि प्रदक्षिणा । करोनि चरण अवलोकना ।
करिता सबाह्य ओतला जाणा । देही देहपणा । हरपली ॥२२॥
मुसेचें सांडूनि मेण । रस ओतिजे परिपूर्ण ।
तेंवी मज सबाह्य जाण । श्रीरघुनंदन ओतिला ॥२३॥
माझे अंगीचें रोमकूप । श्रीराम तेजे देदिप्य ।
अग्नीचा जो दाहक प्रताप । नाही अल्प बधित मज ॥२४॥
हेंचि नवल सांगूं काये । श्रीरामे धरिली धरा राहे ।
श्रीराम जीवे जीवन पाहे । जीवविताहें सर्वांसी ॥२५॥
श्रीरामतेजेंकरोनि जाण । स्वप्रकाशे देदीप्यमान ।
त्रिजगती हुताशन । करी पाचन नेमाचें ॥२६॥
श्रीराम सामर्थ्ये वायू जाण । निजमर्यादा करी चळण ।
अंतरी प्राणवृत्ती पूर्ण । बाह्य संचरण यथाकाळें ॥२७॥
श्रीरामाचे कडवसा । शून्यत्वे ठावो आकाशा ।
जाणितलें राघवेशा । चिदाभासा चिद्धन ॥२८॥
श्रीराम घ्राणाचें निजघ्रेय । तेंचि सुवासीं सौरभ्य होय ।
निजसौरभ्येंचि स्वये पाहे । घेत आहे निजावडी ॥२९॥
राम रसाचा अध्यक्षु । राम रसनेचा निजचक्षु ।
रसज्ञपणें अति दक्षु । अलौकिक रसभोक्ता ॥१३०॥
सकळ गोडियांचे जे गोड आहे । ते श्रीरामचि पै स्वये ।
जो सेविता लवलाहें । रसना होये सर्वांग ॥३१॥
श्रीरामाते अवलोकिता । रुपचि हरपे वस्तुतां ।
सकळ स्वरुपें प्रकाशिता । पारखी स्वतां स्वरुपाचा ॥३२॥
स्पर्शेद्रियें । श्रीरामचळणें प्रसिद्ध ।
आनंदा निजानंद । स्पर्शनबोध श्रीराम ॥३३॥
प्रणवाचा आदिवेद । नादा भुलविता जो शब्द ।
निःशब्द जो निजानंद । श्रवणाबोध श्रीरामे ॥३४॥
त्रिविध जो का अहंकार । पंचीकरणप्रकार ।
राम त्याचाही अंतर । तत्वविचार जेथे निमे ॥३५॥
गुणासाम्य ऐसी अवस्था । ती रामगुणेंचि वस्तुतां ।
महत्वाच्या निजसत्वा । राम तत्वता प्रकाशक ॥३६॥
ज्याचे म्हणती हिरण्यगर्भ । हे चराचर ज्याचा गर्भ ।
तो श्रीरामाचा निजगर्भ । अनुपम शोभा जयाची ॥३७॥

असे मंदोदरीचे बोलणे ऐकून तिच्या मस्तकी स्वर्गस्थांची पुष्पवृष्टी :

ऐसे बोलता सुंदरी । पुष्पवृष्टी सुरवरी ।
केली मंदोदरीचे शिरी । अति गजरी अति प्रीती ॥३८॥
त्राहाटिल्या सुरदुंदुभी । जयजयकार झाला नभीं ।
देवांगना निरालंबी । आनंदगर्भी नाचती ॥३९॥
येरीकडे सती आपण । अग्नीमाजी लोटांगण ।
श्रीरामासी करोनि जाण । मागुतें स्तवन आदरिलें ॥१४०॥

मंदोदरीकृत रामस्तुती :

राम गतीची निजगती । राम चेतनेची चिच्छक्ती ।
राम विश्रांतीसीं विश्रांती । अतर्क्यगती रामाची ॥४१॥
राम नादाचा अनादिनाद । राम शब्दाचा निजशब्द ।
राम आनंदाचा निजानंद । राम महाबोध बोधाचा ॥४२॥
राम चेतनाचें चक्षु । राम इंद्रियांचा अध्यक्षु ।
विषयसुखाचा मूळवृक्षु । राम चक्षु चक्षुंचा ॥४३॥
राम स्वर्गाचा आदिस्वर्ग । राम अपवर्गाचा अपवर्ग ।
राम जीवशिवांचा योग । राम सुलभ सुलभत्वें ॥४४॥
राम सुखाचे सोलीव सुख । रामविस्मरणीं अगाध दुःख ।
ऐसे बोलता एकाएक । निजदेह देख विसरली ॥४५॥

अग्नीत स्वतः देहसमर्पण :

मौनेचिकरीं महासती । लोटांगण रघुपती ।
घालोनिया अति प्रीती । सांडिलें निश्चिती कलेवर ॥४६॥
आगीं कापुरा योग होता । तद्रूप होय एकात्मता ।
तेंवी देहत्यागे रावणकांता । झाली तत्वता श्रीराम ॥४७॥
लोकी प्रथा ऐसी । सहगमन नाही मंदोदरीसीं ।
सतीत्वाची ख्याति जिसीं । ते वैधव्येंसीं केवी राहे ॥४८॥
अवघी केला जयजयकार । वानरभारी आल्हाद थोर ।
सती पतिव्रता पवित्र । केले चरित्र जगद्वन्‍द्य ॥४९॥
राक्षसांच्या कांता । आणि रावणाच्या वनिता ।
येरी येरीतें वाणे देता । झाल्या प्रवेशत्या अग्नीमाजी ॥१५०॥

बिभीषणाकडून सर्वांची विधियुक्त उत्तरक्रिया :

धर्मात्मा श्रीरामभक्त । बिभीषण अति विरक्त ।
उत्तरविधी साद्यंत । केली विधियुक्त बंधूसी ॥५१॥
सकलांचें मनोगत । सिद्धि पावले समस्त ।
अवघे झाले आनंदभरित । नामे गर्जत अति गजरें ॥५२॥

रामोपि सह सैन्येन सुग्रीव सहलक्ष्मणः ।
हर्षं भेजे रिपुं हत्वा वृत्रं वज्रधरो यथा ॥६॥

राम लक्ष्मण सुग्रीव जाण । अंगद जांबुवंत वायुनंदन ।
मुख्य अग्रणी अहुमंत जाण । चाळक संपूर्ण रामाचा ॥५३॥
अवघे झाले आनंदभरित । सुरकार्य झाले समस्त ।
निवटिला लंकानाथ । साधुसंतविरोधी ॥५४॥
एका जनार्दना शरण । मंदोदरीचे सहगमन ।
झाले अति गजरें करुन । ख्याति दारुण सतीत्वाची ॥५५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
मंदोदरीसहगमनं नाम पंचषष्टितमो‍ऽध्यायः ॥६५॥
ओंव्या ॥१५५॥ श्लोक ॥६॥ एवं ॥१६१॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग