वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ६. वानरसेनेचे लंकेकडे प्रस्थान

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088125 · अभंग क्र. ६

6.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय सहावा ॥
शिष्टाईसाठी अंगदाचे जाणे

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रक्ताचे पाट पाहून श्रीरामांचा कळवळा :

पूर्वप्रसंगीं रणांगणी । वानरी मारिल्या वीरश्रेणी ।
रुधिर प्रवाह देखोनि धरणी । श्रीराम मनी कळवळला ॥१॥

सर्व बंदोबस्त करुन नंतर पुढील योजनेचा बेत :

कृपा उपजली रघुनाथा । एकाचिया अपकारता ।
करु नये सकळांच्या घाता । राजधर्मता हे नव्हे ॥२॥
सुग्रीवराजा आणि जांबवंत । अंगदादि वानर समस्त ।
नळनीळादि हनुमंत । शरणागत बिभिषण ॥३॥

राघवः सन्निवेश्यैवं स्वसैन्यं रक्षसां वधे ।
संमंत्र्य मंत्रिभिः सार्धं निश्चित्य च पुनःपुनः ॥१॥
आनंतर्यमभिप्रेप्सुः क्रमयोगार्थतत्ववित् ।
बिभीषणस्यानुमते राजधर्मनुस्मरन् ॥२॥

दुर्गपरिधी द्वाबंध । करावया राक्षसांचा वध ।
सैन्य ठेविले सन्नद्ध । वीर विविध आतुर्बळी ॥४॥
याउपरी काय कर्तव्यता । श्रीराम पुसे समस्ता ।
अवघे म्हणती रघुनाथा । युद्ध तत्वता करावे ॥५॥
तुम्ही वृद्ध धर्मयुक्त । सुबुद्धी बुद्धिवंत ।
या पुढील कर्तव्यार्थ । सुनिश्चित मज सांगा ॥६॥
वानरभाराच्या गजरीं । सेतु बांधोनि सागरी ।
रावण मारावया सहपरिवारी । लंकेवरी आम्ही आलो ॥७॥
ससैन्य मारावें लंकानाथा । विचार कायसा पै आता ।
ऐसे समस्ता सांगता । ते रघुनाथा न मानेचि ॥८॥

शिष्ट पाठविण्याची सूचना :

जे राजधर्म वेद विहित । तेणेंचि साधे परमार्थ ।
ऐसे धर्म श्रीरघुनाथा । उपपादित सच्छास्त्रें ॥९॥
अतिशयेंसीं अति समर्थ । शिष्ट धाडावा लंकेआंत ।
ऐसे बोलता श्रीरघुनाथ । वानर समस्त क्षोभले ॥१०॥

त्याला कांही वानरांचा विरोध :

आमची चोरोनि नेली सीता । आम्हींच शिष्ट पाठवावा आता ।
हे तंव अयुक्त रघुनाथा । युद्ध करिता भय काय ॥११॥
नाही पा हटलों रणें । नाही युद्धी आले उणे ।
याहीवरी शिष्ट धाडणें । लाजिरवाणे आम्हासी ॥१२॥

श्रीराम त्या वेळी चार प्रकारचा युद्धधर्म सांगतात :

ऐसे बोलता समस्त । श्रीराम सांगे राजधर्मार्थ ।
भूतदया आणि परमार्थ । समचित्त उपपादी ॥१३॥
युद्धधर्म चतुर्विध । साम दाम दंड भेद ।
अनादिसिद्ध हे प्रसिद्ध । ऐका विशद विभाग ॥१४॥
धुरेचे आंगी गाढेपण । तेथे युद्ध करी कोण ।
गज वाजी रथ देवोनि धन । शत्रु बुझावून बोळवावे ॥१५॥
नातरी देवोनि देशदुर्ग । वांचवावे धुरेचें अंग ।
या नांव गा दानप्रयोग । भेद विभाग तो ऐका ॥१६॥
पडल्या धुरेसीं दारुण युद्ध । नाही सेनानी सैन्य सन्नद्ध ।
तेणे परसैन्या करोनि भेद । करावे युद्ध तदन्वयें ॥१७॥

सामाचा महिमा :

भेदाचिया अनुवृत्ती । रणी परचक्रा लाविती ख्याती ।
ऐसी भेदाची गती । सामस्थिती ते ऐका ॥१८॥
युद्धसमयी सामानुक्रम । हा मुख्यत्वे राजधर्म ।
सामीं भूतदयासंभ्रम । साम तो परम परमार्थ ॥१९॥
साम न करिता जाण । युध करिता दारुण ।
असंख्य मरती प्राणिगण । ते हत्या कोण सोशील ॥२०॥
स्वये साम न करिता । साम मानी जो सर्वथा ।
भूतहत्या त्याचे माथा । राजधर्मता सुनीती ॥२१॥
श्रीराम स्वये परब्रह्म । अनुवादला राजधर्म ।
तेचि भूतदया निःसीम । परमार्थ परम संग्रामी ॥२२॥
करिता युद्ध रणकंदनार्थ । तेथेंची लाभे पै परमार्थ ।
ऐसे बोलता रघुनाथ । वेद विस्मत विरिंचि ॥२३॥
स्वधर्म बोलता रघुपती । चाकाटला बृहस्पती ।
चाकाटल्या वेदश्रुती । टकमकती शास्त्रार्थ ॥२४॥

यस्य नाहंकृतो भावो बुद्धियस्य न लिप्यते ।
हत्वापि स इमांल्लोकान्न हंति न निबध्यते ॥३॥

अहंकार सोडून युद्ध केले तर दोष लागत नाही :

गीतेमाजी श्रीभगवंत । युद्धी बोलिला परमार्थ ।
तोचि अनुवादे श्रीरघुनाथ । तोचि श्लोकार्थ अवधारा ॥२५॥
ज्यांसी नाही रणाभिमान । कर्मी नाही कर्माभिमान ।
ज्यांसी देही नाही देहाभिमान । ते तू जाण नित्यमुक्त ॥२६॥
ते जे जे करिती कर्माचरण । ते ते कर्मचि होय ब्रह्मपूर्ण ।
त्यांसी नाही दोषदर्शन । चैतन्यघन निजदृष्टी ॥२७॥
ज्यांच्या बुद्धीच्या पै ठायी । देह देही दोनी नाही ।
कर्मबाध त्यां न बाधी कांही । देही विदेही ते पुरुष ॥२८॥
ऐशा पुरुषी करिता रण । मरतें मारिते नाही जाण ।
ठसठसावोनि पूर्ण । करिती रण रणमारे ॥२९॥
ब्रह्म पावोनि तटस्थ जाला । तो तंव सल्वगुणें प्राशिला ।
त्रिगुणां जिणोनि दादुला । युद्धी तगटला तो शूर ॥३०॥
समूळ स्वधर्माची कथा । स्वये सांगता श्रीरघुनाथा ।
अति विस्मय हनुमंता । जांबवंता ताटस्थ्य ॥३१॥
ऐकोनि श्रीरामाचे वचन । हनुमान घाली लोटांगण ।
अंगदसुग्रीवादि बिभीषण । वानरगणसमयोगें ॥३२॥

सर्वांना आश्चर्यं श्रीरामांना वानर अनुकूल :

येथोनिया श्रीरघुनाथा । आमच्या युक्ति खुंटल्या आता ।
तुझ्या मानेल अनुमता । त्या कार्यार्था तू करी ॥३३॥

शिष्ट कोणाला धाडावें ? तो कसा असावा :

ऐकोनि वानरांचे वचन । स्वये पुसे पै सर्वज्ञ ।
शिष्ट पाठवावा कोण । तो निवडून मज सांगा ॥३४॥
शिष्ट नसावा महाभेड । शिष्टें न धरावी भीड ।
शिष्ट बोलला सुघड । निधडा प्रौढ निजबळे ॥३५॥
शिष्ट नसावा कानकुडा । शिष्ट नसावा प्रेमळ गाढा ।
शिष्ट नसावा ज्ञानमूढा । पाहिजे निधडा अति योग्य ॥३६॥
शिष्ट पाहिजे अति चतुर । उत्तरीं देणे प्रत्युत्तर ।
राहोनिया धुरेसमोर । अति प्रखर बोलका ॥३७॥
धुरेसंमुख बोलता । सभाक्षोभ नुपजे चित्ता ।
आपुल्या दावोनि पुरुषार्था । स्वामिकार्यार्था साधक ॥३८॥
दूत पाहिजे अत्यंत लाठा । क्षोभल्या गांजी दशकंठा ।
रावणसभेचा उन्मादताठा । जो वांटीव पाटा रणमर्दें ॥३९॥
श्रीरामी सर्वज्ञत्व चोखडे । आम्ही तंव वानर माकडे ।
काय बोलावे तुजपुढे । जेंवी सूर्यापुढें खद्योतें ॥४०॥
जे बदलासी दूतकथा । जो लक्षेना आमुच्या चित्ता ।
जो तुज मानेल रघुनाथा । त्यासी तत्वता धाडावें ॥४१॥

हनुमंतापासून सुग्रीवापर्यंत सर्वांचा विचार :

शिष्ट धाडावा हनुमंता । येणे गांजिलें लंकानाथा ।
लंका जाळून आला आता । त्यासी सर्वाथा नये धाडू ॥४२॥
नीळ दूत विचक्षण । बोलू जाणे सुलक्षण ।
त्याच्या ठायी अवलक्षण । अति अवगुण तो एका ॥४३॥
शिष्टाई न घेता रावण । नीळ न परते आपण ।
त्यासींच करील रणकंदन । बळाभिमान बळदर्प ॥४४॥
नळही त्याचसारिखा । न कळे स्वामिकार्याचा आवांका ।
जावोनि झोंबेल दशमुखा । बाहुबळें देखा मारावया ॥४५॥
दूत पाठवावे दधिमुखा । संधि न माने दशमुखा ।
तो पावोनिया अति दुःखा । मर्दिल लंका अविवेकें ॥४६॥
दूत पाठवावा जांबवंत । अति वृद्ध पायी अशक्त ।
तो अतिमंत्री बुद्धिवंत । असावा सतत मजपासीं ॥४७॥
दूतत्वें धाडू पनस । परी तो अतिशये कर्कश ।
नेणे सदुक्ति अनुप्रवेश । झोंबेल उदास दशकंठा ॥४८॥
दूत धाडिता कुमुद । करील रावणासीं विवाद ।
बोलता बोलता चढेल क्रोध । करील उपमर्द लंकेशा ॥४९॥
दूत पाठवावा सुषेण । चतुर बोलका सुलक्षण ।
संधि न मानितां रावण । देईल प्राण सीतेसाठीं ॥५०॥
श्रेष्ठत्वा दूत केसरी । त्यासी रावणाचा राग भारी ।
सर्पमुंगुसांच्या परी । परस्परें भिडतील ॥५१॥
ऋषभ शरभ गवय गवाक्ष । मैंद द्विविद रंभ पद्माक्ष ।
नेणता शिष्टाईचा पक्ष । अतिदक्ष संग्रामी ॥५२॥
इतर जे जे वानरवीर । नेणती शिष्टाईचा प्रकार ।
मारावया दशशिर । अवघे सत्वर उठती ॥५३॥
सुग्रीव मुख्य वानरराजा । धाडू नये दूतकाजा ।
दूत लक्षावया दशरथात्मजा । वानरसमाजा शोधित ॥५४॥
दूत पाठवितां बिभीषण । अवश्य मारील रावण ।
मग मज देणे प्राण । हेही आपण नये करु ॥५५॥

हनुमंत अंगदाचे नाव सुचवितो अंगदाचे गुणवर्णन :

तंव बोलिला हनुमंत । विनंती परियेंसीं श्रीरघुनाथ ।
युवराजा अति विख्यात । दूतकार्यार्थ साधील ॥५६॥

वेढेंदुपद्ममितवानरवाहिनियं
प्रोढप्रतापनिधयः कप्योऽत्र सर्वे ।
तात्रापि च प्रखरबुद्धिवचःप्रतापं
जानेंऽगदं रघुपते तव दूतयोग्यम् ॥४॥

हनुमान म्हणे रघुनंदना । मुख्य मुख्य धुरांच्या गणना ।
वीस पद्में संख्या जाणा । आंगवणा आतुर्बळी ॥५७॥
यांहीमाजी वाळिसुत । अंगद अति बळे विख्यात ।
रावणाच्या सभेआंत । अति समर्थ बोलावया ॥५८॥
बोलता राक्षससभेमधीं । सभाक्षोभ यासी न बांधी ।
शत्रुवाक्यें वाक्यें निषेधी । अतिसुबुद्धि बोलका ॥५९॥
अंगद बोलका निघरघट । अंगद वीर धीर सुभट ।
अंगद गांजूं शके दशकंठ । वीर वरिष्ठ अंगद ॥६०॥
अंगदामाजी परमधीर । अंगद अतिशयेसी शूर ।
अंदाचा निजनिर्धार । अतिगंभीर क्षीरोद ॥६१॥
छळावया रावणाच्या युक्ती । अंगदामाजी अति व्युत्पत्ती ।
अंगद एकला पुरुषार्थीं राक्षसा ॥६२॥
अंगद निधडा स्वामिकार्यार्थीं । अंगदापासी अनेक युक्ती ।
अंगदा अंगी अगाध शक्ती । रणकंदनार्थी राक्षसा ॥६३॥
अंगद वाळीचा लाडका सुत । दूतकार्यार्थीं योग्य युक्त ।
ऐसे बोलता हनुमंत । श्रीरघुनाथ तोषला ॥६४॥

अंगदं वालितनयं कौसलेंद्रोऽब्रवीद्वचः ।
गच्छ सौ‍म्य दशग्रीवं ब्रूहि मद्वचनादिदम्॥५॥
अराक्षसमिमं लोकं तर्कास्मि निशितैः शरैः ।
न चेच्छरणभ्येषी तामादाय च मैथिलीम्॥६॥
यद्याविशसि लिकांस्त्रीन्पक्षीभूत्वा मनोजवः ।
मम चक्षुःपथं प्राप्य न जीवन्प्रतियास्यसि॥७॥

श्रीराम त्याच्याबरोबर संदेश देतात :

पाचारोनि अंगदासी । श्रीराम आलिंगी हृदयासी ।
शिष्ट जावोनि रावणापासी । सांगे हे त्यासी मद्वाक्य ॥६५॥
दंडासी कारण मुख्य चोरी । तुवा चोरिली माझी नारी ।
तुज दंडावया बाणधारी । आलो मी निर्धारी सीताकांत ॥६६॥
मुख्य परदाराहरण । तुझ्या मरणा हेचि कारण ।
सुटल्या माझे दुर्धर बाण । तुज कोण राखील ॥६७॥
सावध ऐके दशमुखा । सबंधु सुपुत्र ससैन्यका ।
अराक्षसी करीन लंका । बाणसंपर्का निजनेटें ॥६८॥
लंकेसी आणोनि माझी कांता । म्हणती श्रीरमा न सुटे सीता ।
तो मी वधावया आलो लंकानाथा । केउता आता पळसील ॥६९॥
सीता अभिलाषितां काका । पाठी लाविली दर्भशिखा ।
त्यासी पळतां तिही लोका । ठाव देखा न मिळेचि ॥७०॥

सीता परत करावी व शरण यावे :

मग तो मज आला शरण । म्या वामनेत्र घेऊन ।
त्याचा वाचविला प्राण । हे विंदान ईषिकेचें ॥७१॥
ऐसी दुर्भशिखा दारुण । सुटल्या माझे दुर्धर बाण ।
पक्षी होवोनि पळतां जाण । जीवे रावण मारीन ॥७२॥
त्रैलोक्यां पळतां दिग्पटी । बाण न सोडी पाठी ।
आतुडल्या माझे दृष्टी । दशकंठीं निःपात ॥७३॥
काक अपराधी संपूर्ण । मज अनन्य रिघतां शरण ।
शरणागता नाही मरण । मज त्याचा प्राण वांचविला ॥७४॥
रावणा तूंही तैसाचि जाण । सीता देवोनि रिघाल्या शरण ।
लंकाराज्यी स्थापून । जन्म मरण येवो नेदी ॥७५॥

बिभीषणाला दुसरी लंका देऊ :

बिभीषणा लंकादान । तदर्थीं ऐके सावधान ।
नवी लंका करुन निर्माण । तेथे बीभीषण स्थापीन ॥७६॥
सागरी तारिले पाषाण । त्या मज श्रीरामासी जाण ।
करिता नवी लंका निर्माण । अर्ध क्षण लागेना ॥७७॥
यालागी श्रीरामा अर्पिता सीता । स्वस्थ जीवित लंकानाथा ।
लंका निजराज्य स्वस्थता । श्रीरघुनाथाचेनि धर्में ॥७८॥

अमृतफळे देऊन अंगदास निरोप :

ऐसे श्रीरामे आपण । स्वमुखें अंगदासी सांगोन ।
अमृतफळें देवोनि जाण । करवी गमन लंकेसी ॥७९॥
अमृतफळांचा शकुन । ज्यांसी करवी रघुनंदन ।
मर्दूनि परांचा मानाभिमान । विजयी पूर्ण तो होय ॥८०॥

अंगदाची कृतार्थता :

अंगदा तुझी शौर्यशक्ती । धृति कीर्ति सहनशांती ।
परम पुरुषार्थाची ख्याती । हनुमंते मजप्रती सांगितली ॥८१॥
अंगद म्हणे श्रीरघुनाथा । आज्ञा प्रमाण जी समर्था ।
स्वये पुरुषार्थ बोलता । अति मूर्खता येऊ पाहे ॥८२॥
असो आमुचिया पुरुषार्था । तुझी आज्ञा श्रीरघुनाथा ।
कार्यसिद्धीचिये माथा । आम्हा विजयता श्रीरामे ॥८३॥
वानर वनचर पालेखाईर । झाले श्रीरामाचे किंकर ।
तेणे आमुचा प्रताप थोर । सुरासुर वंदिती ॥८४॥
श्रीरामा तुझे आज्ञेपुढें । रावण कायसे बापुडे ।
आजि माझे भाग्य चोखडे । कार्य मजकडे सांगितले ॥८५॥
आजि माझे सफलित मनोरथ । स्वये स्वमुखें श्रीरघुनाथ ।
मज सांगितला कार्यार्थ । भाग्यवंत मी एक ॥८६॥
सद्‌गुरु हनुमंताचा धर्म । मज तुष्टला श्रीरघूत्तर ।
स्वमुखे सांगे कार्यानुक्रम । भाग्याचा परम मी एक ॥८७॥
श्रीरामाज्ञा आल्या हाता । साधावया स्वामिकार्यार्था ।
अति उल्लास अंगदचित्ता । होय निगता लंकेसी ॥८८॥
करोनि श्रीरामाते प्रदक्षिणा । लागोनि श्रीरामचरणा ।
चरणतीर्थ घेवोनि जाणा । लोटांगणा घातले ॥८९॥
वंदोनि लक्ष्मण बिभीषणां । लागला सुग्रीवाच्या चरणा ।
तेणे देवोनि आशीर्वचना । उल्लासे जाणा अनुवादे ॥९०॥

श्रीरामादिकांना अंगद वंदन करुन निघतो :

श्रीरामाज्ञा वंदोनि शिशीं । जिवित्व अर्पिले श्रीरामासी ।
तुझेनि श्लाघ्यता कपिवंशासी । रामकार्यासी शीघ्र साधी ॥९१॥
नळ नीळ जांबवंत सुषेण । इत्यादि वानरगण ।
लोटांगणें वंदूनि चरण । आज्ञापन पूसत ॥९२॥
अवघे म्हणती वाळिसुता । मृदु मंजुळ विनीतता ।
सुखी केले आम्हा समस्ता । निजविजयार्था तू लाहसी ॥९३॥
देखोनि सद्‌गुरु हनुमंता । अंगदासी उल्लासता ।
त्याचे चरणी ठेवोनि माथा । सप्रेमता सद्‌गदित ॥९४॥
अंगदा हनुमंताची भक्ती । अंगदा हनुमंतासीं प्रीती ।
शिघ्र जावया लंकेप्रती । आज्ञा मारुति देतसे ॥९५॥
अंगदासी हनुमंते । आश्वासोनि वरदहस्तें ।
लंकेसी पाठविले त्याते । दशमुखातें गांजावया ॥९६॥
श्रीरामा साष्टांग नमस्कार । अवलोकोनि लंकापुर ।
करोनि रामनामे गजर । अंगदवीर उसळला ॥९७॥

जगामाकाशमाविश्य मूर्तिमानिव हव्यवाट ।
सोऽभिपत्य मुहूर्तेन श्रीरामद्रावणमंदिरम् ॥८॥
ददर्शासीनमव्यग्रं रावणं सचिवैः सह ॥९॥

गगनी जाता अंगदवीर । सुग्रीवादि पै वानर ।
तिही केला जयजयकार । अति गजर नामाचा ॥९८॥

आकाशमार्गाने अंगदाचे लंकेकडे गमन :

जैसा श्रीरामाचा बाण । तैसे अंगदाचें उड्डाण ।
सत्वर सत्वर करोनिया गमन । आला आपण लंकेसी ॥९९॥
आकाशाचिये पोकळी । अंगदे धालोनि पायांतळी ।
चढोनि निरालंब निराळीं । लंकेजवळी स्वये आला ॥१००॥
बाळसूर्य रसे ओतिला । किंवा अग्नितेजें घडला ।
तैसा अंगद शोभला । लंके आला दैदीप्यमान ॥१॥
अंगदाचें निज‍उड्डाण । लंकेपासीं आले जाण ।
एका जनार्दना शरण । पुढे निरुपण अति गोड ॥२॥
अंगदरावणसंभाषण । युक्तिप्रयुक्तीचें छळण ।
तेंही गोड निरुपण । सावधान अवधारा ॥३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
अंगदशिष्टाईगमनं नाम शष्टोऽध्यायः ॥६॥
ओव्या ॥१०३॥ श्लोक ॥९॥ एवं ॥११२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग