वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › १०. राक्षस-वानर संग्राम

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088127 · अभंग क्र. १०

10.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय दहावा ॥
इंद्रजिताला मांत्रिक रथाची प्राप्ती

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

युद्ध चालू असता रात्र झाली :

रणी करिता द्वंद्वयुद्ध । इंद्रजित गांगिला सुबद्ध ।
त्याचे पोटी अति विरुद्ध । रात्रीं शरबंध करावया ॥१॥
प्रथम गांजिलें हनुमंते । ते बहु दुःख इंद्रजिताते ।
अंगदे गांजिता येथे । अति लज्जेतें पावला ॥२॥
अपमानाचे अति विरुद्ध । रामलक्ष्मणादि वीर विविध ।
रणी करावया शरबंध । रात्रीं युद्ध मांडिले ॥३॥

युद्ध्यतामेव तेषां तु तदा वानररक्षसाम् ।
रविरस्तंगतो रात्रिः प्रवृत्ता प्राणहारिणी ॥१॥
अन्योन्यं बद्धवैराणां घोराणां जयमिच्छताम् ।
संग्रवृत्तं निशायुद्धं तदा वानररक्षसाम् ॥२॥
राक्षसोऽसीति हरयो वानरोऽसीति राक्षसाः ।
अन्योन्यं समरे जघ्नुस्तस्मिंस्तमसि दारुणे ॥३॥
हत दास्य चैहीति कथं विद्रवसीति च ।
एवं सुतुमुलः शब्दस्तस्मिस्तमासि शुश्रुवे ॥४॥

रात्रीचा फायदा घेऊन इंद्रजीताचा शरबंध प्रयोग :

रणी भिडतां वानरवीर । राक्षस गांजिले थोर थोर ।
निबिड पडावया अंधकार । निशा निशाचर इच्छिती ॥४॥
रात्रीं प्रबळ निशाचर । तेथे निर्बळ वानर ।
ऐसा करिता विचार । दिवाकर‍अस्त जाला ॥५॥
निजबळे सबळ रजनी । सुषुप्ति प्राण्यां प्राणहरणी ।
ते गुडुप पडता रणी । कोणी देखेना ॥६॥
अरे तू काय होसी वानर । कपीसी पुसती निशाचर ।
पडखळोनि येरयेर । रणी सात्वर मारिती ॥७॥
राक्षसा वानरा बद्धवैर । राक्षसा साह्य अंधकार ।
वानरा साह्य श्रीरामचंद्र । युद्ध दुर्धर मांडलें ॥८॥
छेदी भेदीं रणी पाडीं । पायी धरोनिया ओढी ।
वेगी । उपटा रे तांतडी । वीर कडाडीं गर्जती ॥९॥
आमुचा अधिक पुरुषार्थ । इतर मशकें कायसीं येथ ।
ऐसे अंधारी गर्जत । करीत घात येरयेरा ॥१०॥
पाडीं पाडीं म्हणती रणी । मिसळल्या वीरश्रेणी ।
युद्ध होतसे झोंटधरणी । मागे कोणी न सरती ॥११॥

तस्मिंस्तमसि दुःपारे राक्षसाः क्रोधमूर्च्छिताः ।
परिपेतुः सुसआंक्रुद्धा भक्षयंतौ वनेचरान्॥५॥
हयान्कांचनपीडांश्च ध्वजांश्चाभरणानि च ।
आप्लुत्य दशनैस्तीक्ष्णैर्नखैश्च विचकर्षिरे ॥६॥
कुंजरान्कुंजरारोहान्पताकाध्वजिनो रथान् ।
आप्लुत्य विचकर्षुस्ते दशनैः क्रोधमूर्च्छिताः॥७॥
लक्ष्मणस्त्वथ रामश्च शरैराशीविषोपमैः ।
आदिश्यादिश्य रक्षांसि प्रवराणि निजघ्नतुः॥८॥
तुरंगखुरविध्वस्तं रथनेमिसमुद्धतम् ।
रुरोध कर्णौ योधानां चक्षुंषि च महीरजः॥९॥

आपणा न दिसे आपुले शरीर । तेथे कोण देखे येरयेर ।
तमोबळें निशाचर । युद्धार्थदुर्धर पेटले ॥१२॥

वानारांची प्रतिक्रिया आणि रावणास प्रधानांचे उत्तर :

निशाबळे निशाचरीं । लावून आले निशाण भेरी ।
नाद ऐकोनि वानरी । राक्षसभारीं मिसळले ॥१३॥
वानर धरोनि अंधारांत । राक्षस मुखी खावो घालित ।
दांती करांडून दांत । जिव्हा तोडित नखाग्री ॥१४॥
कपि घालिता मुखांतरी । रिघोनियां कर्णद्वारीं ।
लात हाणोनिया शिरी । धरेवरी पाडिती ॥१५॥
वानर खावो सुती पोटी । उर्ध्व उडोनि जगजेठी ।
फोडून ब्रह्मांडकवटीं । राक्षसा सृष्टी पाडिती ॥१६॥
सुवर्णाभरणीं शोभती गाढे । रणी पाखरिले पै घोडे ।
त्यांवरी उड‍उडोनि माकडें । रणी रोकडे पाडिती ॥१७॥
नखी चिरोनि उदर । मुखी फाडोनि पाखर ।
रणी पाडिती मुख्य धुर । असिवारासमवेत ॥१८॥
पताका फाडोनियां दातीं । गजदंत उपटोनियां घेती ।
रणी पाडोनि गजपती । मारिले हस्ती असंख्य ॥१९॥
वानरी घालोनिया उडी । रथसारथीं सहित घोडीं ।
मोडिल्या रथांचिया कोडी । रणपरवडी रक्षसां ॥२०॥
राक्षसें हाणिता नाना शस्त्री । वानर उडाले अंबरी ।
वृथा घाय जाती अंधारी । राम साहाकारी वानरा ॥२१॥
श्रीराम तेजे निरंतर । अंधारी देखणे वानर ।
तिही मारिले निशाचर । सैन्य समग्र रणमारे ॥२२॥
रणी पाडोनि निशाचर । सैन्य मारोनि समग्र ।
रामनामाचा गजर । केला भुभुःकार वानरी ॥२३॥
येरीकडे राम सौ‍मित्र । मुख्य धुरा थोर थोर ।
नावानिगे निशाचर । रणी समग्र मारिले ॥२४॥
सुवर्णपत्री कंकपत्री । बाण वर्षोनि बहुपत्री ।
मारिल्या राक्षसांच्या हारी । रणमहामारी श्रीराम ॥२५॥
रथ छेदिले सचक्र । छेदिले अश्वांचे खुर ।
कंठनाळ छेदूनिया वीर । रणी समग्र पाडिलें ॥२६॥
शुंडादंड दांतेंसहित । छेदोनि पाडिले गजघट ।
वीरांचे छेदोनि नेत्रवाट । रणी सुभट पाडिले ॥२७॥
श्रीराम देखणा अंधारी । वायकांड नाही करी ।
पाचपाचारुनि धुरा थोरी । रणमहामारीं मारिल्या ॥२८॥
श्रीराम वर्षोनि बाणजाळ । सैन्यासगट धुरा प्रबळ ।
क्षणे मारिल्या सकळ । हलकल्लोळ उठिला ॥२९॥
रावण म्हणे प्रधानांसी । मारुं म्हणा श्रीरामासी ।
तो करितो रणकंदनासी । तुम्ही युद्धासी का न वचा ॥३०॥
सत्य बोलिला बिभीषण । त्याचे वचन अति प्रमाण ।
करावया श्रीरामासी रण आंगवण नाही तुम्हा ॥३१॥
ऐकोनि रावणाचे वचन । स्वये विनविती प्रधान ।
न होते आज्ञापन । म्हणोनि रण नाही केले ॥३२॥
रावणवचनें लज्जायमान । युद्धा निघाले प्रधान ।
नावानिगे साही जाण । रणप्रवीण ते ऐका ॥३३॥

यज्ञशत्रुश्च दुर्घर्षो महापार्श्वमहोदरौ ।
वज्‍रदंष्ट्रो महाकायस्तौ चोभौ शुकसारणौ ॥१०॥
तेषां रामः शरैः षड्‍भिः षड् जघान निशाचरान् ।
निमेषांतरमात्रेण घोरैरग्निशिखोपमैः ॥११॥
ते तु रामेण बाणौघैर्लघुहस्तेन ताडिताः ।
युद्धादपसृतास्तत्र सावशेषायुषोऽभवन् ॥१२॥
सुवर्णपुंखैर्विशिखैः संपतद्‌भिः समततः ।
दिशश्चकार विमलाः प्रदिशश्च महाबलः ॥१३॥
ये त्वंन्ये राक्षसा वीरा रामस्याभिमुखे स्थिताः ।
तेऽपि नष्टाः समासाद्य पतंगा इव पावकम्॥१४॥

श्रीरामासी करावया रण । नावानिगे जे प्रधान ।
युद्धा आले सहाही जण । कोण कोण ते ऐका ॥३४॥
महापार्श्व महोदर । वज्रदंष्ट्र हमाकाय वीर ।
शुक सारण चतुर । सहाही दुर्धर युद्धार्थी ॥३५॥

रामाने केलेली दुर्दशा व त्यांचे पलायन :

निजसैन्याचा कडकडाट । महारथाचा घडघडाट ।
श्रीरामासंमुख उद्‌भट । वीर वरिष्ठ पै आले ॥३६॥
येता देखोनि सहाही जण । त्यांचा निःशेष घ्यावया प्राण ।
रामे सज्जिले सहा बाण । वेगविंदान ते ऐका ॥३७॥
सहाही जणी धनुष्यातें ।निर्वाणबाण सज्जिले तेथे ।
विधों जाता श्रीरामाते । तंव रघुनाथे विधिले ॥३८॥
त्यांचे छेदोनि चाप बाण । रथ सारथि करोनि चूर्ण ।
धुळी मेळवोनि सहाही जण । मुकुट छेदून पाडिले ॥३९॥
जरी ते रणी न देत पाठी । राम मारिता जगजेठी ।
आयुष्य होते अदृष्टीं । देवोनि पाठी पळाले ॥४०॥
श्रीराम न मारी पळत्यातें । हे तिही पूर्वी ऐकिलें होते ।
वांचवावया जीवितातें । रणी रामातें विमुख झाले ॥४१॥
पळतां देखोनि प्रधान । स्वये हांसती वानरगण ।
तरी ते पलायमान। रामबाणाभेण सलज्ज ॥४२॥
पळालिया ते प्रधान । त्यांचे सेनानी आणि सैन्य ।
रामे केले रणकंदन । दुर्धर बाण वर्षोनी ॥४३॥
सुवर्णकवची वीरश्रेणी । खिळोनि सांडिले धरणी ।
असंख्य वीर शिरें छेदूनी । पाडिले रणी हंबत ॥४४॥
जो रणी मिरवी हात । बाणी होत शिरःपात ।
जो रणी हाक देत । जिव्हा सदंत छेदी बाणे ॥४५॥
यापरी रामे रणांगणी । धडमुंडांकित केली धरणी ।
उरले ते जीव घेवोनी । गेले पळोनी लंडेसी ॥४६॥

ततःक्रोधसमाविष्टः शरवर्षेण रावणिः ।
अंगदस्य चमूं घोरां नाशयामास सर्वतः ॥१५॥
ततःक्रोधपरीतात्मा युवराजोंऽगदो बली ।
शिलामुत्पाटयामास बाहुभ्यां प्रणदन्मुहुः ॥१६॥
तां समुत्क्षिप्य तेजस्वी छादयानः शरोर्मिभिः।
रथं बभंज वेगेन शिलया कपिकुंजरः ॥१७॥
वर्तमाने चातिरौदे संग्रामेऽतिभयंकरेः ।
अंगदो विरथं कर्तुं रावणिं समुपाद्रवत् ॥१८॥
इंद्रजित्तं रथं त्यक्त्वा हताश्वो हतसारथि ।
अंगदेन महामायस्तत्रैवांतरधीयत ॥१९॥

अंगदाकडून इंद्रजितावर शिळाप्रहार व त्याचे अंतःर्धान :

प्रधान पळाले त्वरान्वित । सैन्य भंगलें समस्त ।
ते काळी इंद्रजित । अंगदसैन्यांत मिसळला ॥४७॥
इंद्रजित हनुर्वाडा चपळ । रागे वर्षत बाणजाळ ।
अंगदसैन्या हलकल्लोळ । रणकल्लोळ मांडला ॥४८॥
निजसैन्यासीं आवर्त । तेणे अंगद क्रोधान्वित ।
रणी मर्दावया इंद्रजित । केला पुरुषार्थ तो ऐका ॥४९॥
पंचयोजनें सबळ शिळा । अंगद उचली बाहुबळा ।
त्याच्या छेदोनि बाणजाळा । सवेग शिळा सोडिली ॥५०॥
इंद्रजित विंधी अमित शर । परी ते शिळा दुर्निवार ।
धाके सांडूनि रहंवर । पळे सत्वर इंद्रजित ॥५१॥
त्या शिळेच्या निजघातीं । सहितरथाश्वसारथी ।
इंद्रजित रणांगणी विरथी । लाविली ख्याती अंगदे ॥५२॥
होता शिळेचा संपात । तेणे मरावा इंद्रजित ।
परी तो राक्षस बुद्धिवंत । त्वरान्वित पळाला ॥५३॥
हताश्व हतसारथी । इंद्रजित रणांगणी विरथी ।
धनुष्यबाणशस्त्रसंपातीं । शिळासंपातीं शतचूर्ण ॥५४॥
विरथी पळता इंद्रजितासी । अंगदे धावोनि धरिला केशीं ।
येरें कापून बुचड्यासी । लागवेगेंसी पळाला ॥५५॥
अंधारी पळतां गुप्तगती । अंगदे उडोनि धरिता हाती ।
तंव तो अंतर्धानस्थितीं । खेचरगती तडकला ॥५६॥
इंद्रजित पावतां अंतर्धान । अंगदे केले गडगर्जन ।
निर्दाळून त्यांचे सैन्य । बळवाहन परतला ॥५७॥
द्वंद्वयुद्ध आणि आतांचे रण । दोही रणकाळीं आपण ।
अंगदापुढें पलायमान । अति उद्विग्न इंद्रजित ॥५८॥
प्रथम मज गांजी हनुमंत । अंगदे दोनी वेळा येथ ।
जळो जळो माझा पुरुषार्थ । केलों हताहत वानरी ॥५९॥
रणी न जिंकवती वानर । केंवी जिंकावे रामचंद्र ।
इंद्रजित स्वये चिंतातुर । करी अभिचार शारबंधा ॥६०॥

इंद्रजिताने शिववरदान जागृत करुन प्रयोग केला :

इंद्रजितासी शिववरदान । शिवाचें जे सर्पभूषण ।
तेंचि होवोनियां बाण । शरबंधन वीरांसी ॥६१॥
सर्प जे का शिवभूषण । तेचि स्वये होवोनि बाण ।
भलतैसा वीर विचक्षण । शरबंधीं जाण बांधिती ॥६२॥
केल्या तदर्थ आभिचारिक । रणी होय फलोन्मुख ।
येरवी ते निरर्थक । ऐसे देख शिववरदान ॥६३॥
यालागी इंद्रजित आपण । करावया अभिचारिक यज्ञ ।
करिता होय यज्ञसाधन । विधिविधान ते ऐका ॥६४॥

स यज्ञभूम्यां विधिवत्पावकं जुहृतेऽस्त्रवित् ।
जुहृतस्तस्य तत्राग्निं रक्तपीतांबरस्रजः ॥२०॥
आजहुस्तत्र सामग्रीं राक्षसा यत्र रावणिः ।
शस्त्राणि शतपत्राणि समिधश्च विभीतकाः ॥२१॥
लोहितानि च वासांसि स्त्रुवं कार्ष्णायसं तथा ।
सर्वतोऽग्निं समास्तीर्य शतपत्रैः सतोमरैः ॥२२॥
छगस्य चापि कृष्णस्य कंठ जग्राह जीवतः ।
शोणितं तत्र विधिवत्स जुहाव रणोत्सुकः ॥२३॥

आरक्त वस्त्र आरक्त माळा । आरक्त शेंदुराचा टिळा ।
गोरोचनमणींच्या पीत माळा । घातल्या गळा यज्ञसिद्ध्यर्थ ॥६५॥
अभिचारहोमविधानीं । शस्त्रे मंथोनि काढिला अग्नी ।
रक्तचंदन‍इंधनीं । पेटविला वन्ही लखलखित ॥६६॥
अग्नि पेटवितां धूम निघे । तै कर्त्यासी अपजयो लागे ।
विधूम ज्वाला निघतां वेगे । तै लागवेगें रणविजय ॥६७॥
आणिक तेथील यागविधान । उलूकरक्तें परिसमूहन ।
शस्त्रांचे परिस्तरण । करी आपण इंद्रजित ॥६८॥
राक्षसी आणिले शस्त्रसंभार । इंद्रजित प्रोक्षी जपोनि मंत्र ।
परिस्तरणाचा प्रकार । शास्त्रविचार तो ऐका ॥६९॥
शतपत्रा शतघ्नी । खड्ग त्रिशूळ तोमर बाणी ।
गदा मुद्‌गल गुप्तघ्नी । परिस्तरणीं ही शस्त्रे ॥७०॥
तिखें काढिले लोह गाळोनि । त्याच्या स्त्रुवा होमविधानी ।
इंद्रजित करी धरोनी । होमा अवदानीं छागरक्ता ॥७१॥
ज्या छागासी पांढरा तिलक । तेणे यजमाना लागे सीक ।
निखळ कृष्णवर्ण देख । आवश्यक आणिला ॥७२॥
छाग मारोनि निघता रक्त । होमसिद्धी ते विपरीत ।
शस्त्रास्त्र निर्जीव होत । नव्हे सामर्थ्य रणमारा ॥७३॥
यालागी छाग जीवे जीत । त्याचे कंठीचें घेवोनि रक्त ।
इंद्रजित स्वये होम करित । जाले विपरीत ते ऐका ॥७४॥
इंद्रजित जपतां मंत्रमेळीं । त्याची बैसली दांतखिळी ।
स्वये क्षोभली कंकाळी । क्रोधानुमेळीं वाग्ददेवी ॥७५॥
रणी मारावा श्रीरघुनाथ । उच्चारिता हा मंत्रार्थ ।
वाग्देवता चळीं कांपत । तेणे वचनार्थ खुंटला ॥७६॥

इंद्रजितास मंत्राचे विस्मरण :

श्रीराम जगाचें जीवन । श्रीराम परमात्मा चिद्धन ।
त्यासी नाही जन्ममरण । मंत्रोच्चारण खुंटले ॥७७॥
श्रीराम जन्ममरणातीत । श्रीराम सबाह्य सदोदित ।
त्यासी सर्वथा न चले घात । मंत्रीं मंत्रार्थ खुंटला ॥७८॥
मंत्रशक्ति जे कंकाळी । शिववरदानशक्ति शूळीं ।
दोघीं क्षोभोनि क्रोधनळीं । मंत्रार्थशैली खुंतली ॥७९॥
मंत्र नाठवे हृदयकमळीं । शब्द नुच्चारी जिव्हामूळीं ।
होमसिद्धीच्या निजकाळीं । माझी वचनावळी खुंटली ॥८०॥
नाठवे मंत्रार्थ ना मंत्र । मुखी नुच्चारे अक्षर ।
तेव्हा रावणज्येष्ठकुमर । दुःखदुर्धर पावला ॥८१॥
शिववरदेंशीं समर्थ । शरीं बांधावया श्रीरघुनाथ ।
जो जो केला म्या पुरुषार्थ । तो तो व्यर्थ मज माझा ॥८२॥
होमसिद्धिकाळ प्राप्त । माझा खुंटला वचनार्थ ।
जिंकणें ठेला रघुनाथ । दुःखाभिभूत इंद्रजित ॥८३॥
न जिंकवे रघुकुळ टिळक । इंद्रजितासी परम दुःख ।
विलपतसे अधोमुख । करी महाशंख अति दुःखे ॥८४॥

श्रीरामांची प्रतिक्रिया व वाग्देवतेची सुटका :

ते जाणोनि श्रीरघुनाथ । म्हणे इंद्रजिताचा पुरुषार्थ ।
केंवी बांधील शरबंधात । तोही युद्धार्थ पाहू पा ॥८५॥
स्वये विचारी श्रीरघुनाथ । मी तंव जन्ममरणातीत ।
सौ‍मित्र मरणेंसीं अलिप्त । शरबंधार्थभय काय ॥८६॥
शिववरद इंद्रजितासी । मिथ्या न करी मी शिवासी ।
अंगी साहेन शरबंधासी । शिववरदासीं सत्यत्वा ॥८७॥
माझा गेलियाही प्राण । मिथ्या न करी शिववरदान ।
शरबंधाचें भय कोण । साहतां कठिण मज नाही ॥८८॥
प्राकृतीं भ्यावें शरबंधासी । त्याचे भय काय आम्हांसी ।
सत्य करीन शिववरदासी । शरबंधासी साहोनी ॥८९॥
ऐसे विचारोनि तत्वता । राम वाग्देवतेची देवता ।
इंद्रजिताच्या वचनार्था । निर्मुक्तता श्रीरामे ॥९०॥

परिणामी अग्निराविष्कार :

वाचा होतांचि निर्मुक्त । इंद्रजित जाला हर्षयुक्त ।
मंत्र आणि मंत्राबीजार्थ । हृदयी समस्त प्रकटले ॥९१॥
कृष्णछागाचें घेवोनि रक्त । उग्रमंत्रीं मंत्रबीजार्थ ।
होम करिता विध्युक्त । साश्व रथ प्रकटला ॥९२॥
रथ देखता सामग्रीसीं । अति उल्लास इंद्रजितासी ।
युद्ध करावया श्रीरामासी । अति आवेशी चालला ॥९३॥

आरुरोह रथं श्रेष्ठमंतर्धानचरं शुभम् ।
अवध्यवाजिभिर्युक्तं शस्त्रैश्च विविधैर्युतम् ॥२४॥
समारोपितनेपथ्यं शस्त्रशक्तिसमन्वितम् ।
भलैस्तथार्धवन्द्रैश्च तूणीरैः समुपस्थितम् ॥२५॥
जाज्वल्यमानं वपुषा तपनीयविभूषितम् ।
जंबूनदमयो नागस्तरुणादित्य्सन्निभः ॥२६॥
बभूवेंद्रजितः केतौ वैडूर्यसमलंकृता ॥२७॥

रथ होमी नाही प्रकटला । कैंचा कैसा कोठूण आला ।
मेघनादें नाही लक्षिला । अवचट अला अभंग ॥९४॥
अभंग रथ अवध्य वारु । वरी दिव्यास्त्रसंभारु ।
ऐसा देखोनि रहंवरु । रावणकुमरु उल्लासे ॥९५॥
रथी शस्त्रांचा संभार । शतघ्नी शक्ती सहस्र ।
भाले परिघ चंद्रार्ध शर । बाण तूणीर शूळशक्ति ॥९६॥
ऐशी शस्त्रास्त्रांची संपत्ती । जिये रथी असे पुरती ।
त्यासी नेपथ्य म्हणती । शास्त्रप्रयुक्तीं अभिधान ॥९७॥
ऐसा देखोनिया रथ । इंद्रजित करी होम समाप्त ।
रथी बैसला उल्हासित । हर्षन्वित तेजस्वी ॥९८॥
सुवर्णाभरणीं सुशोभित । रथी झळकत गजेंद्रकेत ।
तोही वैडूर्यसालंकृत । रथी शोभत अति शोभा ॥९९॥
अभिचाराचा पुरुषार्थ । साधूनि इंद्रजित उल्हासित ।
हाता आल्या अभंग रथ । मग गर्जत स्वानंदे ॥१००॥
अंतर्धानरथगती । नये दुजियासी अभिव्यक्ती ।
निरालंब मार्गाप्रती । अतर्क्य शक्ती रथवेगा ॥१॥

हुत्वाग्नौ राक्षसैमैत्रैस्ततो वचनमब्रवीत् ।
अद्य हत्वा वधार्हौ तो मिथ्या संजल्पतौ रणे ॥२८॥
जयं पित्रे प्रदास्यामि रावणाय मन्ःप्रियम् ॥२९॥
निर्वाणबाणैर्विहतं राघवं सहलक्ष्मणम् ।
करिष्यामि ससुग्रीवमित्युक्त्वांतरधीयत ॥३०॥

इंद्रजिताची योजना व आकाशवाणी :

राक्षसविजयाचे निजमंत्र । होम करोनि अभिचार ।
अभंग पावलों रहंवर । विजयी सर्वत्र मी एक ॥२॥
मारीन कपिकुंजरकोटी । सुग्रीव पाडीन उठाउठी ।
निर्वानर करीन सृष्टी । तरी मी हट्टी इंद्रजित ॥३॥
आता माझ्या प्रतापापुढें । श्रीराम कायसे बापुडे ।
रणी मारीन रोकडें । फोडीन हाडे सौ‍मित्राची ॥४॥
जटाधारी वल्कलपरिधान । कपटी दोघे राम लक्ष्मण ।
विंधोनियां वरद बाण । घेईन प्राण दोहींचा ॥५॥
घरींचा वैरी बिभीषण । त्याचे छेदीन नाक कान ।
एवढा करोनि अपमान । लंकाभुवन मग देखेन ॥६॥
श्रीरामाच्या संग्रामासी । परम आधि रावणासीं ।
रणी मारुन त्या दोघांसी । सुखी पित्यासी करीन ॥७॥
आभिचारिकवरदवाणी । तेणे मी विजयी त्रिभुवनी ।
इंद्रजित गर्जता आल्हादोनी । आकाशवाणी तंव जाली ॥८॥
शिववरदाच्या सर्पबाणीं । राम जिंतिला शरबंधनीं ।
परी तो तुम्हांसी मारील रणी । दुर्धर बाणी वर्षोनी ॥९॥
श्रीरामा साह्य शंकर । रामनाम जपे निरंतर ।
निजसर्पाचा बाणभार । स्वये शंकर उखळील ॥११०॥
मोकळे होवोनि राम सौ‍मित्र । वर्षोनिया दुर्धर शर ।
रणी पाडिती दशशिर । निशाचर निवटिती ॥११॥
विकट वर्षोनिया बाण । रणी पाडील कुंभकर्ण ।
तुज मारील लक्ष्मण । कुळनिर्दळण श्रीरामे ॥१२॥
कुमर सेनानी प्रधान । इतर चतुरंगसैन्य ।
श्रीराम करील रणकंदन । कुळनिर्दळण श्रीरामे ॥१३॥
लंकाराज्यी बिभीषण । श्रीराम स्थापील आपण ।
सीता श्रीरामे सुखसंपन्न । सत्य वचन हे मानी ॥१४॥

आकाशवाणीचा इंद्रजितावर परिणाम :

ऐकोनि आकाशवाणीची मात । नळीं कांपे इंद्रजित ।
अंरर्धानामाजी लपत । झणी रघुनाथ मज देखे ॥१५॥
शिववरदें समर्थ । प्रत्यक्ष रथ झाला प्राप्त ।
आकाशवाणी मिथ्याभूत । भय कोण येथ तियेचे ॥१६॥
अशरीरी आकाशवाणी । जिव्हा नाही तिजलागूनी ।
जे बोलती मिथ्या काहाणी । कोण मानी सत्यत्वे ॥१७॥
शिववरदाचे सर्पबाण । वृथा न वचती जाण ।
बाणी मारीन राम लक्ष्मण । वानरगणसमवेत ॥१८॥
क्षणां भ्याकड क्षणां धाकड । इंद्रजितासी अति सांकड ।
पुढील युद्धाचा पडिपाड । कथा अति गोड श्रीरामे ॥१९॥
रामायणींचे गोडपण । स्वये श्रीराम आपण ।
त्याचे चरित्र अति विंदान । परम पावन शिवप्रिय ॥१२०॥
एका जनार्दना शरण । श्रीराम पाळी शिववरदान ।
साहोनियां शरबंधन । करीन कंदन राक्षसा ॥१२१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
शरबंधहोमविधानं नाम दशमोध्यायः॥१०॥
ओव्या ॥१२१॥ श्लोक ॥३०॥ एवं ॥१५१॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग