॥ श्रीएकनाथमहाराजकृत
31.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय एकतिसावा ॥
अतिकाय राक्षसाचा वध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
चौघा वानरांनी तिघा राजकुमारांना व दोन राक्षसांना मारिलेः
चौघे मिळोनि वानर । तिघे रावण राजकुमर ।
महापार्श्व आणि महोदर । पांचही महाशुर मारिले ॥१॥
आम्ही म्हणो हे वानर । पालेखाईरे वनचर ।
परी हे निधडे महाशर । दुर्धर वीर मारिले ॥२॥
सखे बंधु मारिले तिन्ही । पितृव्य निमाले दोन्ही ।
ते देखोनिया नयनी । अतिकाय मनी क्षोभला ॥३॥
अतिकायाचे क्रोधाने आगमन :
मारिले देखोनि स्वजन । अतिकाय कोपायमान ।
रविप्रभेंसीं समान । देदीप्यमान तेजस्वी ॥४॥
एवढिया तेजासीं कारण । ब्रह्मदत्त वरद संपूर्ण ।
प्राकृताचेनि हातें मरण । सर्वथा जाण न पावसी ॥५॥
ब्रह्मवरदें बळवंत । देवदानवदैत्यघात ।
स्वये करी रणाआंत । निजपुरुषार्थ मिरवोनी ॥६॥
सारथ्यासी स्वये सांगत । जेथे आहे रघुनाथ ।
वानरांसी न लावू हात । रणी रघुनाथ मारावया ॥७॥
अतिकायाचा विचार :
पाठीसी असता श्रीरघुनाथ । रणी वानर नाटोपत ।
तेथवरी प्रेरिला रथ । त्यासी रणांत मारावया ॥८॥
वानरांचे बळकारण । मुख्य श्रीरामलक्ष्मण ।
ते मारिल्या दोघे जण । वानरगण निमाले ॥९॥
अखया मारुन जाळिलें नगर । देवांतक नरांतक त्रिशिर ।
महापार्श्व महोदर । सुहृद समग्र निर्दळिले ॥१०॥
ते व्हावया उत्तीर्ण । सुखी करावया रावण ।
रणी मारीन रामलक्ष्मण । तरी मी जाण अतिकाय ॥११॥
रणी मारिल्या श्रीरामचंद्र । मारणे न लागती वानर ।
तेंही विषयींचा विचार । ऐक साचार सांगेन ॥१२॥
श्रीराम वृक्ष लक्ष्मण दंड । हनुमान एक मध्यबिंड ।
सुग्रीवादि शतशाखा प्रचंड । विस्तार उदंड कपिसेना ॥१३॥
सीता सुंदर सुमनफळ । रावण भुलला तत्काळ ।
हित सांगतांही सकळ । तो अळुमाळ उमजेना ॥१४॥
रणी मारिल्या रघुवीर । निमाले हनुमान सौमित्र ।
निमाले सुग्रीवादि वानर । सीता सुंदर स्ववश ॥१५॥
ऐसी करावया ख्याती । अतिकाय मी रणार्थीं ।
घाये मारीन रघुपती । बाणावंर्ती वर्षोनी ॥१६॥
रणी मारावया रघुनाथ । मी अतिकाय आलो येथ ।
विस्फारोनि चापहस्त । रणी गर्जत साटोपे ॥१७॥
मुकुट कुंडले वीरकंकणें । अतिकाय शोभला तेणे ।
बाहु अंगदे अंगत्राणें । जेंवी का किरणें श्रीसूर्य ॥१८॥
धनुष्याच्या टणत्काराने वानरसैन्य त्रस्त :
धनुष्यी करिता टणत्कार । दुमदुमिले गिरिकंदर ।
भूकंपें उलथती सागर । भेणे वानर पळाले ॥१९॥
अतिकाय देखोनि दुर्धर । भयें त्रासिले वानर ।
पळोन आले ते समग्र । श्रीरघुवीर ठाकोनी ॥२०॥
जो शरण्य शरणागता । टाकून आले त्या रघुनाथा ।
अभय देतांचि समस्ता । कपि स्वस्थता पावले ॥२१॥
अतिकाय तो अति दुर्धर । रथी बैसला दिसे अत्युग्र ।
त्याते देखोनि रघुवीर । विस्मय थोर पावला ॥२२॥
श्रीरामांना बिभीषण अतिकाय राक्षसाची माहिती सांगतो :
स्वये श्रीरामे आपण । पाचारोनि बिभीषण ।
म्हणे पैल हा वीर येतो कोण । रणप्रवीण निःशंक ॥२३॥
हाकाऊन बिभीषण । स्वये पुसे रघुनंदन ।
पर्वतप्राय अति दारुण । येतो कोण ते सांग ॥२४॥
धनुर्धारी पिंगाक्ष । रथी बैसला अति दक्ष ।
येतो आमचें धरुन लक्ष । रणाध्यक्ष प्रतापी ॥२५॥
रथी जुंपिले अश्व सहस्र । दोन शते वीस तूणीर ।
असि चाप गदा मुग्दर । त्रिशूळ तोमर रथस्थ ॥२६॥
छत्र पताका युग्मचामरीं । ध्वजीं मुक्त माळाझल्लरी ।
राहूचें शिर ध्वजावरी । रणमहामारी ब्रिदाइत ॥२७॥
बाहुअंगदे मुकुट शिरी । कुंडलांचें तेज भारी ।
लखलखी मुखावरी । जेंवी भास्करी निजकिरण ॥२८॥
हेमसन्नद्ध चापबाण । रथी बैसला निःशंक पूर्ण ।
मजसंमुख यावया जाण । आंगवण केंवी यासी ॥२९॥
तेच विषयींचें निरुपण । स्वये सांगतो बिभीषण ।
अतिकायाची आंगवण । बळ संपूर्ण वरदोक्ती ॥३०॥
भीमकर्मा महातेजा रावणो राक्षसाधिपः ।
तस्यैष वीर्यवान्पुत्रो रावणप्रतिमो बली ॥१॥
वृद्धसेवी श्रुतिधरः सर्वास्त्रविदुषां वरः ।
अश्वपृष्ठे नागपुष्ठे खड्गे धनुषि कर्षणे ॥२॥
भेदे सांत्वे च दाने च न्याये मंत्रे च संमतः ।
तनयं विद्धि मालिन्या अतिकायमिमं विदुः ॥३॥
अतिकायाची जन्म - कथा व गुणवर्णन :
रावण जाला लंकापती । म्हामालिनीगर्भसंभूती ।
याची जाली पै उत्पत्ती । नामे निश्चिती अतिकाय ॥३१॥
अतिकाय वीर विख्यात । रावणासमान बळवंत ।
परी हा साधुसेवी अति विनीत । आणि श्रवणवंत सच्छास्त्रीं ॥३२॥
जाणे रथपती चक्रभ्रमण । गजवाजीआरोहण ।
खड्ग पदाति करावया रण । आंगवण अतिकाया ॥३३॥
शूळ त्रिशूळ मुद्गर । फरश पट्टिश तोमर ।
अचुकसंधानी धनुर्धर । प्रवीण शस्त्री अतिकाय ॥३४॥
भेदाचें परिमार्जन । लोभदंभाचें सांत्वन ।
दान देवोनि उदार पूर्ण । विनीतपण सर्वांसीं ॥३५॥
निर्दळोनि अनीती । दृष्टीपुढें ओळंगे नीती ।
विचाराविषयीं हा बृहस्पती । सांगे सुखोत्किसंवाद ॥३६॥
ऐसा सर्वार्थीं निपुण । संग्रामी जिंतले सुरगण ।
मशकप्राय करोनि जाण । इंद्र संपूर्ण गांगिला ॥३७॥
संग्रामी अति प्रखर । प्रतापतेजे जैसा रुद्र ।
सर्वार्थीं अति दुर्धर । रावणकुमर अतिकाय ॥३८॥
अनेनाराधितो ब्रह्मा तपसा भावितात्मना ।
अस्त्राणि चास्य दत्तानि रिपूणां च पराजये ॥४॥
सुरासुरैखध्यत्वं दत्तमस्य स्वयंभुवा ।
एतच्च कवचं दिव्यं रथश्च रविभासुरः ॥५॥
एतेन शतशो देवा दानवाश्च पराजितः ।
एषोतिकायो बलवान्राक्षसानामथर्षभः ॥६॥
तदस्मिन्क्रियतां यत्नः क्षिप्रं पुरुषपुंगव॥७॥
ब्रह्मयाचे वरदानाने अतिकायाला अभेद्यकवचाची प्राप्ती झाल्याचे कथन :
पूर्वी अतिकाय निरन्न । करुनि ब्रह्मयाचे आराधन ।
ब्रह्मा करोनि सुप्रसन्न । ब्रह्मवरदान पावला ॥३९॥
पराभवून शत्रुसमुदाय । नित्य संग्रामी निजविजय ।
ऐसा शस्त्रअस्त्रसमुदाव । ब्रह्मदेव स्वये अर्पी ॥४०॥
सुरासुरांसी करिता रण । सर्वथा युद्धी न ये मरण ।
अवध्यत्वाचें वरदान । दिधले आपण ब्रह्मदेवे ॥४१॥
अभेद्य कवच अभेद्य रथ । ब्रह्मा देत हर्षयुक्त ।
तेणे देवदानव समस्त । रणी गांजित अतिकाय ॥४२॥
वरदबळें बळोन्मत्त । अतिकाय येतो गर्जत ।
शिघ्र याच्या वधार्थ । यत्न निश्चित करावा ॥४३॥
अभेद्य कवच अनिवार्य बाण । येणे बळे अतिकाय जाण ।
येतो तुजसी करावया रण । आंगवण वरदाची ॥४४॥
याचे न सुटतां बाण । प्रयत्न देखावा आपण ।
ऐसे बोलता बिभीषण । रघुनंदन हांसिला ॥४५॥
श्रीरामांची उक्ती व अतिकायाचा धनुष्याचा टणत्कार :
ब्रह्मवरद ते बापुडे । अतिकाय मशक घुंगुरडे ।
त्याचे भय वाडेंकाडें । काय मजपुढे सांगसी ॥४६॥
माझा सुटलिया बाण । कळिकाळाचा घेईल प्राण ।
अतिकाय ते बापुडे कोण । मरेल आपण निमेषार्धे ॥४७॥
अतिकाय प्रेरुन रथ । आला वानरसैन्याआंत ।
धनुष्य टणत्कारोनि तेथ । असे गर्जत रणरंगी ॥४८॥
रणरंगी वारंवार । सिंहनाद करिता थोर ।
तेणे क्षोभोनि वानरवीर । युद्धा सत्वर मिसळले ॥४९॥
अतिकाय अति भयंकर । देखोनि श्रेष्ठ वानर ।
युद्धा मिसळले दुर्धर । शिळाशिखरद्रुमपाणी ॥५०॥
कपि हाणिता द्रुमपाषाण । अतिकाय त्यांसी न विंधी बाण ।
हीन दीन वानरे जाण । मारिल्या कोण पुरुषार्थ ॥५१॥
वानर वनचर ते किती । पालेखाईर यांची जाती ।
त्यांसी मारिल्या कोण कीर्ती । रणी रघुपती मारीन ॥५२॥
वानरांकडे दुर्लक्ष करुन अतिकायाची श्रीरामांवर चाल :
वानरांसी करणे रण । हेंचि मज उणेपण ।
मुख्य धूर मी मारीन । रघुनंदन संग्रामी ॥५३॥
वानरांचे द्रुमपाषाण । अतिकाय मानून तृण ।
श्रीरामासी करावया रण । आला आपण साटोपे ॥५४॥
वानर बापुडे ते किती । त्यावरी धनुष्य न धरी हाती ।
रणी मारावया रघुपती । संग्रामशक्ती मज आहे ॥५५॥
निवारुन द्रुम पाषाण । उपेक्षून वानरगण ।
श्रीरामासी करावया रण । आला गर्जोन अतिकाय ॥५६॥
घेवोनिया धनुष्य बाण । युद्धा आलो मी आपण ।
ज्यासी असेल आंगवण । तेणे मजसी रण करावे ॥५७॥
तुम्ही माजी कोणप्रती । जरी असेल संग्रामशक्ती ।
तरी तेणे येवोनि मजप्रती । रणव्युत्पत्तीं भिडावें ॥५८॥
ततस्य वाक्यं ब्रुवतो निशम्य चुकोप सौमित्रिरमित्रहंता ।
अमृष्यमाणश्च समुत्पपात जग्राह बाणांश्च ततः प्रहस्य ॥८॥
पुरस्ताच्चातिकायस्य विचकर्ष महाधनुः ।
पूरयित्वा महीं शैलानाकाशं सागरं दिशः ॥९॥
ज्याशब्दो लक्ष्मणस्याग्रे त्रासयन्रजनीचरान् ।
विसिस्मिये महातेजा राक्षसेंद्रसुतो बली ॥१०॥
अथातिकायः कुपितो दृष्ट्वा लक्ष्मणमग्रतः ।
आदाय शिशितं बाणमिदं वचनमब्रवीत् ॥११॥
अतिकायाची दर्पोक्ती :
ज्यासी असेल आंगवण । तेणे मजसी करावे रण ।
ऐकोनि अतिकायाचें वचन । आले स्फुरन लक्ष्मणा ॥५९॥
वंदून रामाचे चरण । सज्जोनिया धनुष्यबाण ।
करुन स्वानंदे उड्डाण । आला गर्जोन सौमित्र ॥६०॥
सबळ बळे अति गाढा । दृढ सज्जोनिया मेढा ।
आला अतिकायापुढां । रणी निधडा सौमित्र ॥६१॥
करिता धनुष्यी टणत्कार । भूकंप सपर्वतसागर ।
नादें उठत अंबर । गिरिकंदर दुमदुमिले ॥६२॥
टाळीं बैसलीं दिग्गजांसी । नाद कोंदला दशदिशीं ।
भय सुटलें राक्षसांसी । कासाविसी ज्या घोषें ॥६३॥
ऐकता ज्याघोष दारुण । अतिकायाचा जाऊ पाहे प्राण ।
उतटलें अंतःकरण । निधडा पूर्ण सौमित्र ॥६४॥
संमुख निधडा लक्ष्मण । देखता अतिकाया कोप पूर्ण ।
धनुष्यी सज्जोनिया बाण । रागे गर्जोन बोलत ॥६५॥
मागा सांडून रघुकुळटिळक । पुढे आलासी तू बाळक ।
माझी वाजतांचि हाक । मरसी निःशेख घायेंवीण ॥६६॥
धरोनिया अभिमान । मजसी करु म्हणसी रण ।
माझे सहावया निर्वाणबाण । आंगवण तुज कैची ॥६७॥
सुटतां मुद्वाणशैली । तुज पळतां रणकल्लोळीं ।
लपतां भूतलीं की नभःस्थळी । शोधून होळी करतील ॥६८॥
हेमपत्री सुतीक्ष्ण बाण । सुटल्या घेती तुझा प्राण ।
मजसी करिता रणांगण । वृथा मरण पावसी ॥६९॥
सांदोनियां धनुष्यबाण । शीघ्र पळावें आपण ।
तुज म्या दिधले जीवदान । सर्वथा जाण मारींना ॥७०॥
त्यजून संग्रामसंकट । सांडुन युद्धकडकडाट ।
तुज म्या दिधली धर्मवाट । घडघडाट पळावें ॥७१॥
लक्ष्मणाचे अतिकायाला प्रत्युत्तर :
अतिकायाच्या निंद्य उत्तरीं । कोप न येचि सौमित्री ।
अगाध शांतीची निजथोरी । शब्दचातुरी अवधारा ॥७२॥
स्वमुखे बोलता निजकीर्तीं । ते तंव शूरासी अपकीर्ती ।
शब्दचातुर्यव्युत्पत्तीं । काय पुरुषार्थीं जालासी ॥७३॥
बोलता शब्दाची आंगवण । त्वा काय जिंतिले रणांगण ।
व्यर्थ बोलाचे दादुलपण । निर्लज्ज पूर्ण तू एक ॥७४॥
जे बडबडती वितंड । त्यांते म्हणती केवळ भांड ।
भंडपुराण तुझे तोंड । तू रणनिर्लंड निर्लज्ज ॥७५॥
घेवोनिया धनुष्यबाण । संमुख उभा मी लक्ष्मण ।
बोलासारखी आंगवण । करुन आपण दावावी ॥७६॥
बालोऽयमिति विज्ञान न चावज्ञातुमर्हसि ।
बोलाऽवा यदि बा वृद्धो मृत्युं जानाति संयुगे ॥१२॥
बालत्व मानिले कुमारासीं । तेणे मर्दिलें लवणासुरासी ।
तेंवी या बालत्वें राक्षसी । रणमर्देसी मर्दीन ॥७७॥
नवग्रहांचे बळ घटासीं । तरी युद्ध न करवे पाषाणासीं ।
तेंवी तू शूर देवदैत्यांसीं । संग्राम मजसी न करवे ॥७८॥
मज मानूनि बाळपण । सर्वथा न करावे हेळण ।
माझ्या बाळपणाचें लक्षण । सावधान अवधारी ॥७९॥
धाकुटी दीपकळिका जैसी । स्वये लावितां वळचणीसी ।
जाळीत उठे पुरनगरांसी । गिरिदुर्गांसीं भस्मात ॥८०॥
तैसे माझे धाकुटपण । संग्रामी राक्षसा कुळकंदन ।
मारीन इंद्रजित रावण । तेथे तू कोण क्षुद्र मशक ॥८१॥
माझे सुटल्या निर्वाणबाण । अतिकाय तुज राखेल कोण ।
क्षणार्धे घेईन तुझा प्राण । तुझी आंगवण दावी पा ॥८२॥
ऐसे बोलता लक्ष्मण । अतिकाय कोपला दारुण ।
काढोनि निर्वाणबाण । सौमित्र संपूर्ण विंधिला ॥८३॥
लक्ष्मणस्य वचः श्रुत्वा हेतुमत्परमार्थवत् ।
अतिकायः प्रचुक्रोध बाणं चास्य समाददे ॥१३॥
तमापतंतं सौमित्रिस्त्रिधा चिच्छेद लाघवात् ।
रावणिः परमामर्षीं शरैरेनमुपाद्रवत् ॥१४॥
ततः शरसहस्त्रेण संस्थाप्य रघुनंदनम् ।
बिभीषणं च सामात्यं शरवर्षैर्महाभुजः ॥१५॥
अर्धचंद्रेण चिच्छेद लक्ष्मणः परवीरहा ।
ततो विद्याधराः सर्वे देवा देवर्षयस्तथा ॥१६॥
गुह्यकाश्च महात्मानस्तद्युद्धं ददृशुस्तदा ॥१७॥
अतिकाय व लक्ष्मणाचे युद्ध :
आपली स्तुति करणे आपण । हे शूरासी निंद्य दूषण ।
ऐसे धर्म युक्तवचन । स्वये लक्ष्मण बोलिला ॥८४॥
हृदयी भेदला वाग्बाण । तेणे कोपे अतिकाय आपण ।
घेवोनिया निर्वाणबाण । रणी लक्ष्मण विंधिला ॥८५॥
लक्ष्मणे लघुलाघवेंकरीं । बाण छेदोनि वरच्यावरी ।
त्रिधा भेदून अंबरी । धरेवरी पाडिला ॥८६॥
निर्वाणबाण रणाआंत । करावया लक्ष्मणाचा घात ।
तो बाण येणे केला व्यर्थ । धन्य पुरुषार्थ सौमित्रा ॥८७॥
श्रीराम आणि लक्ष्मण । दोघांही निधडी आंगवण ।
दोघे योद्धे रणप्रवीण । संग्रामी जाण नाटोपती ॥८८॥
ठाकून मारिल्या बिभीषण । न लगे जुंझ न लगे भांडण ।
दोघे स्वये सांडिती प्राण । तैसे विदान मांडिलें ॥८९॥
ब्रह्मदत्ताचे सहस्र बाण । अनिवार्य अति दारुण ।
विंधोनि गोंविला लक्ष्मण । मारुन बिभीषण शरवर्षे ॥९०॥
शरणागता वज्रपंजर । सत्यशस्त्री लक्ष्मण वीर ।
सोडून बाण अर्धचंद्र । शरें शर छेदिला ॥९१॥
बाण येतांचि कडाडीं । अतिकाय अतिशये हडबडी ।
डोळा चालली झांपडी । पडली मुर्कंडी घायेंवीण ॥९२॥
अतिकाय ब्रह्मवरदान । प्राकृतीहातीं न ये मरण ।
अवतारपुरुषाहातीं जाण । दिनांतीं प्राण जातील ॥९३॥
न होता सूर्यास्तमान । अतिकायासी न मारीच बाण ।
पाळोनियां ब्रह्मवरदान । आला परतोन तूणीरीं ॥९४॥
लक्ष्मणाचे रण विचित्र । पाहू आले सुरासुर ।
सिद्ध चारण विद्याधर । यक्ष किन्नर गुह्यक ॥९५॥
देवऋषि नारदमुनी । युद्ध पाहू आला धांवोनी ।
हरिखें नाचे उपरमोनी । धन्य करणीं सौमित्रा ॥९६॥
अनिवार ब्रह्मवरदबाण । घाय निवारोनि संपूर्ण ।
शरणागता संरक्षण । धन्य लक्ष्मण पै योद्धा ॥९७॥
बाण निवारोनि समस्त । स्वस्थ राखो न शरणागत ।
न लावितां त्यासी आघात । पाडी मूर्च्छित अतिकाया ॥९८॥
युद्ध पहावया पडिपाडें । पाहू लागला लंकेपुढें ।
नारद हरिखें नाचे उडे । वाडेंकोडें गर्जत ॥९९॥
स्वर्गी गर्जती सुरवर । ऋषी करिती जयजयकार ।
नामे गर्जती वानर । धन्य सौमित्र रणयोद्धा ॥१००॥
अतिकाय उघडी नयन । तंव बाण गेला परतोन ।
दुर्धर होवोनि कोपायमान । निर्वाणरण मांडिलें ॥१॥
लक्ष्मणाचे पंच प्राण । घ्यावया सोडिले पांच बाण ।
निश्चियाचें निजनिर्वाण । परम दारुण संग्रामी ॥२॥
अतिकायाचे पांचही बाण । छेदून सांडी लक्ष्मण ।
जेंवी सर्पाते गरुड जाण । छेदी आपण नखाग्रें ॥३॥
छेदून त्याचे शरसंधान । स्वये लक्ष्मण आपण ।
तेजस्वी घेऊन बाण । वोढी काढून विंधिला ॥४॥
कडकडाटे येवोनि बाण । ललाटीं लागला दारुण ।
तेथेंचि जाला निमग्न । जेंवी सर्पागमन वारुळीं ॥५॥
अतिकायें करिता निवारण । त्याचे छेदोनियां बाण ।
जाला ललाटीं निमग्न । कंपायमान राक्षस ॥६॥
रुधिराचिया धारा । रक्तें न्हाणिले निशाचरा ।
घाये दंडिले महावीरा । रणी थरथरां कांपत ॥७॥
जेंवी त्रिपुराचें त्रिपुर । रुद बाणी करी जर्जर ।
तैसाच येथे निशाचर । लक्ष्मणे दुर्धर गांगिला ॥८॥
बाणमात्रें महाबळी । लोळविला रथातळीं ।
घाये मेळविला धुळी । आतुर्बळी सौमित्र ॥९॥
चिंतयामास चाश्वास्य विश्रम्य च महाबलाः ।
साधुमुक्तेन बाणेन श्लाघनीयोऽसि मे रिपुः ॥१८॥
स्यंदनोपस्थमादाय चापमादाय चोत्तमम् ।
एकत्रीन्पंचसप्तेति सायकान्राक्षसर्षभः ॥१९॥
ततस्तान्राक्षसोत्सृष्टाञ्शरौघान्राघवानुजः ।
असंभ्रांतः प्रविच्छेद निशितैर्बहुभिः शरैः ॥२०॥
लक्ष्मण व अतिकाय यांचे अस्त्रयुद्ध :
अतिकाय शरसमेळी । लोळविला रथातळीं ।
मूर्च्छा भाजून ते काळी । झाला महाबळी सावध ॥११०॥
माझी निवारोनि शरसुटी । बाण भेदिला लल्लाटीं ।
धन्य धनुर्वाडा तू श्रेष्ठी । वीरजगजेठी मी मानी ॥११॥
देव दानव दैत्य पन्नर । सदा संग्रामी मजसी विमुख ।
त्याही मज त्वा लाविला धाक । योद्धा नेटक मी मानी ॥१२॥
ऐसा शत्रूचा घेता गुण । अतिकाय कोपला दारुण ।
घेवोनिया निर्वाणबाण । विंधी आपण साटोपे ॥१३॥
प्रथम विंविधला बाण एक । लक्ष्मणे तोडिला तो देख ।
सवेंचि विंधीं पांच आणिक । तेही निःशेख तोडिले ॥१४॥
सवेंचि विंधिले बाण तीन । तेही सांडिले छेदून ।
आणीक विंधिता सात बाण । तेही तोडून सांडिले ॥१५॥
एक तीन पांच सात । बाण छेदिले समस्त ।
अतिकाय तेणे कोपन्वित । दांत खात संग्रामी ॥१६॥
तान्शरान्युधि संप्रेक्ष्य निकृत्तान्रावणात्मजः ।
चुकोप त्रिदशेंद्रारिर्जग्राह च शितं शरम् ॥२१॥
तेन सौमित्रिमायातमाजघान स्तनांतरे ।
सोऽतिविद्धो बलवता लक्ष्मणो लक्ष्मिवर्द्धनः ॥२२॥
सुस्राव रुधिरं भूरि मदमत्त इव द्विपः ।
स चकार तदात्मान विशल्यं सहसा विभुः ॥२३॥
अतिकायाचे निर्वाणशर । लक्ष्मणे छेदिले समग्र ।
तेणे क्षोभोनि रावणकुमर । शर दुर्धर सज्जिला ॥१७॥
तेणे बाणेंसी गर्जोन । हृदयी विंधिला लक्ष्मण ।
बाण भेदलियाही संपूर्ण । सौमित्र जाण न डंडळी ॥१८॥
सुटलिया रुधिरधारा । शोभे जैसा रणनोवरा ।
रणी गर्जता सौमित्र । निशाचरा आकांत ॥१९॥
जेंवी महागज मदच्युत । डुल्लत विचरे वनाआंत ।
तेंवी लक्ष्मण रुधिरोक्षित । स्वानंदे डुल्लत रणरंगी ॥१२०॥
हृदयी रुपला जो बाण । तो स्वये उपडोनि आपण ।
हृदय निःशल्य केले जाण । रणप्रवीण सौमित्र ॥२१॥
जो हृदयींचे शल्य फेडी । त्याचे तोडरीं विघ्नकोडी ।
प्रपंचपरमार्थविजयगुढी । उभवी रोकडी तिही लोकी ॥२२॥
जो शल्य फेडी हृदयाआंत । त्यासी रणरंगी परमार्थ ।
तोचि विजयी संग्रामांत । जो करी घात अहंममतेचा ॥२३॥
यापरी तो वीर धीर लक्ष्मण । हृदयींचे सर्व शल्य काढून ।
अतिकायाचा घ्यावया प्राण । अस्त्रसंधा संधारी ॥२४॥
निधडा धनुर्वाडा वीर । रणव्युत्पत्तीं शूर सौमित्र ।
अस्त्र मंत्र बीजाक्षर । सतेज शर सज्जिला ॥२५॥
जग्राह च शरं तीक्ष्णं तमस्त्रेणाभिसंदधे ।
आग्नेयेन महाबाहुः सर्वा विद्योतयन्दिशः ॥२४॥
अतिकायाय चिक्षेप कालदंडमिवांतकः ।
दृष्ट्वा तु तं महबाहुः शरं जग्राह कोपनः ॥२५॥
उत्ससर्ज तदा बाणं दीप्तं सूर्यास्त्रसंयुतम् ।
तावुभावंबरे बाणावन्योन्यमभिजघ्नतुः ॥२६॥
तावन्योन्यं विनिर्भिद्य पेततुर्धरणीतले ॥२७॥
ब्रह्मवरदानामुळे लक्ष्मणाचे बाण व्यर्थ ठरतात :
सौमित्र युद्धी सावधान । घ्यावया अतिकायाचा प्राण ।
अग्निअस्त्र सज्जून बाण । विधी आपण साटोपे ॥२६॥
बाण सुटता तेजोराशी । प्रभा न माय आकाशी ।
अतिकाय देखोनि त्यासी । सूर्यास्त्रासीं विंधिले ॥२७॥
अग्नि सूर्य तेजोराशी । बाण भिडतां आकाशी ।
तेज मिळाले तेजासीं । अस्त्रे अस्त्रासी निवारण ॥२८॥
पहाता पहाता वाडेंकोडें । तेजींतेज मिनले गाढे ।
दोहींचीं निर्वीर्य कांडे । रणी दुखंडे ती पडली ॥२९॥
दोनी अस्त्रे झालीं निराकार । दोघे विसावले वीर ।
रणी क्षोभोनि निशाचर । इषीकास्त्र सोडिले ॥१३०॥
रणी क्षोभोनि निशाचर । रागे सोडिले इषीकास्त्र ।
लक्ष्मण निधडा धनुर्धर । छेदिले सत्वर इंद्रास्त्रें ॥३१॥
छेदिलें देखोनि इषीकास्त्र । कोपोनिया रावणपुत्र ।
सोडिता जाला याम्यास्त्र । रणी सौमित्र लक्षोनी ॥३२॥
येता देखोनि याम्यास्त्र । अस्त्रविंदानी सौमित्र ।
वाय्वस्त्रें तेंही अस्त्र । रणी सत्वर छेदिलें ॥३३॥
रणी खवळोनि सौमित्र । पर्जन्यधारा वर्षे शर ।
पावोनि अतिकायशरीर । बाण समग्र भंगिले ॥३४॥
ब्रह्मदत्त कवच त्यासी । बाण न रुपती अतिकायासीं ।
तेणे लक्ष्मणे अति आवेशी । बाणायुतेंसीं विंधिला ॥३५॥
रणी कोपोनि सौमित्र । अयुतायुत विंधिता शर ।
ब्रह्मकवचें अतिकाय वीर । व्यथा अणुमात्र पावेना ॥३६॥
स वृष्यमाणो बाणौघैरतिकायो महाबलः ।
ब्रह्मदत्तवरो वीरो राक्षसेंद्रो न विव्यथे ॥२८॥
न शशाक रुजं कर्तुं यदा तस्य महाशरैः ।
अथैनमभ्युपागम्य वायुवाक्यमभाषत ॥२९॥
ब्रह्मदत्तवरो ह्येष ह्यभेद्यकवचावृतः ।
ब्राह्मेणास्त्रेण भगवञ्जहि दैवतकंटकम् ॥३०॥
वायूंच्या सूचनेप्रमाणे ब्रह्मास्त्रयोगाने अतिकायाचा वध :
लक्ष्मणाचे दुर्धर शर । भेदू न शकती निशाचर ।
ब्रह्मदत्तकवचें वीर । व्यथा अणुमात्र पावेना ॥३७॥
ऐसे देखोनि लक्ष्मण । विचारीं पडला संपूर्ण ।
अतिकाया न भेदती बाण । काय आपण करावे ॥३८॥
तंव गुप्तत्वे येऊनी । वायु गुज सांगे कानी ।
यासी न भेदवे बाणी । ब्रह्मवरदानी कवचावृत ॥३९॥
यासी ब्रह्मयाचें वरदान । ब्रह्मास्त्रें विंधोनि बाण ।
सवेग याचा घ्यावा प्राण । दुष्ट दारुण देवद्रोही ॥१४०॥
देवद्रोही देवकंटक । भूतद्रोही जीवघातक ।
धर्मंद्रोही दुःखदायक । यासी आवश्यक मारावें ॥४१॥
ऐकोनि वायूचें वचन । रणी हर्षला लक्ष्मण ।
अतिकायाचा घ्यावया प्राण । ब्रह्मास्त्र पूर्ण सज्जिलें ॥४२॥
अचुकसंधानी सौमित्र । हेमपत्री सित पीत शर ।
बाणी सज्जिलें ब्रह्मास्त्र । निशाचर मारावया ॥४३॥
अस्त्रतेजाचा लखलखाट । बाणबळाचा कडकडाट ।
शरपिसारियाचा सुसाट । भंवत आट सुरासरां ॥४४॥
दैत्य दानव सुरगण । चंद्रसूर्यादि ग्रहगण ।
सुटतां लक्ष्मणाचा बाण । आंदोलायमान राक्षस ॥४५॥
क्षोभे उलथत सागर । कंपें कांपती धराधर ।
बाण सोडितां सौमित्र । चराचर हडबडिले ॥४६॥
ऐसा येता देखोनि बाण । स्वये अतिकाय आपण ।
दृढ साधूनि रणांगण । धनुष्या गण वाहिला ॥४७॥
अतिकाय महावीर । लघुलाघवे विंधी शर ।
ते बाण छेदूनि समग्र । ब्रह्मास्त्र लोटलें ॥४८॥
येता देखोनि ब्रह्मास्त्रासी । अतिकाय विंधि बहु बाणांसी ।
त्या छेदूनि सर्वांसी । आले अंगासी ब्रह्मास्त्र ॥४९॥
जेंवी गरुड छेदी अजगर । तेंवी ब्रह्मास्त्रें छेदोनि शर ।
अतिकायाचें छेदावया शिर । आले ब्रह्मास्त्र अंगासी ॥१५०॥
सरलें हाणिता शस्त्रास्त्र । मग हाणी पर्वतशिखर ।
तरी न धरवे ब्रह्मास्त्र । हाहाकार उठिला ॥५१॥
निर्वाणींचे विंधिता बाण । तेही ब्रह्मास्त्रें करोनि चूर्ण ।
अतिकायाचा घ्यावया प्राण । आले जाण अंगासी ॥५२॥
शक्ति शूळ गदा तोमर । फरश पट्टिश खड्ग कुठार ।
हाणिताही परिघ मुद्गर । ब्रह्मास्त्र ढळेना ॥५३॥
समस्तही शस्त्रजाळ । ब्रह्मास्त्रें करोनि निष्फळ ।
अतिकायाचें कंठनाळ । रणी तत्काळ छेदिलें ॥५४॥
मुकुट कुंडले सुशोभित । निजतेजें लखलखित ।
शिर छेदोनि रणांत । देदीप्यमान पाडित भूमींसीं ॥५५॥
तच्छिरः सशिरस्त्राणं लक्ष्मणेन प्रमर्दितम् ।
पपात सहसा भूमौ शृंगं हिमतो यथा ॥३१॥
तं भूमौ पतितं दृष्ट्वा विक्षिप्तं वीरभूषणम् ।
बभूवुर्व्यथि सर्वे हतशेषा निशाचराः ॥३२॥
अतिकायराक्षस महापराक्रमी व अतिरथी होता :
कुंभकर्णाची परम ख्याती । त्याते महारथी म्हणती ।
अतिकाय तो अतिरथी । पाडिला क्षिती सौमित्रे ॥५६॥
धन्य बळियाढा लक्ष्मण । मुकुत कुंडले सशिरस्त्राण ।
शिर पाडिले छेदून । विराजमान भुतळी ॥५७॥
जैसे हिमाद्रीचें शिखर । तैसे छेदोनि पाडिलें शिर ।
ते देखोनि निशाचर । पळती सत्वर लंकेसी ॥५८॥
मारिता उरली राक्षससेना । पळोनि जावोनि लंकाभुवना ।
वृत्तांत सांगती दशानना । जे साही जणा मारिले ॥५९॥
देवांतक नरांतक त्रिशिरा । महापार्श्व महोदरा ।
मारिले अतिकाया दुर्धरा । सहाही महावीरां प्राणांत ॥१६०॥
रणी लक्ष्मणाच्या हाती । अतिकाय पावला ब्रह्मप्राप्ती ।
श्रीरामदृष्टी युद्धस्थिती । परम मुक्ति राक्षसा ॥६१॥
एका जनार्दना शरण । कुमार मारिले साही जण ।
पुढील कथेचे अनुसंधान । सावधान अवधारा ॥६२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
अतिकायवधो नाम एकत्रिंशशत्तमोऽध्यायः॥३१॥
ओव्या ॥१६२॥ श्लोक ॥३२॥ एवं ॥१९४॥
