आता जावे वेगी नामया
938.
आता जावे वेगी नामया घेऊनि | सांगावी आवंतणी ब्राह्मणांसी ॥१॥
सकळकामपूर्ण असती तुमच्या पायी | विचारावे कांही न लगे देवा ॥२॥
काय काय न लभे तुमचे कृपादृष्टी | सदा सुखवृष्टी हरिच्या दासा ॥३॥
नामयाचा हात धरोनि पंढरीनाथ | निघाले अक्षत द्यावयासी ॥४॥
निवृत्ति ज्ञानेश्वर जनमित्र सोपान | सांवता जाल्हण घेऊनि सरिसे ॥५॥
चोखामेळा बंका काठीकर पुढे | दोन्ही वाही देव्हडे सनकादिक ॥६॥
नामयाचे पाठी चाले केशीराज | लागावया रज चरणीचे ॥७॥
आपुल्या दासाचा सिद्धी न्यावा पणु | म्हणोनि यजमानु जाला देव ॥८॥
तेणे मिसे करितसे क्षेत्रप्रदक्षिणा | प्रार्थित ब्राह्मणा परम प्रीति ॥९॥
ऐसा अनाथांचा नाथ दीनाचा गोसावी | आवडी नित्य नवी सेवकाची ॥१०॥
तो या नामयाचा सुखाचा शृंगारु | रुक्मादेविवरु श्रीविठ्ठल ॥११॥
