तंव अध्यात्मिक पंडित
939.
तंव अध्यात्मिक पंडित अग्निहोत्री | एक म्हणविती श्रोत्री सदाचार ॥१॥
आम्हासी ते नाही तुमचे स्वरूपज्ञान | अपूर्व दर्शन देखिले आजी ॥२॥
सुखाचे पारणे करविले या रूपे | तेणे त्रिविधताप निवारले ॥३॥
कवण वृत्ति काय चालविजे व्यापार | योजिले बिढार कवणे ठायी ॥४॥
आजिचे निमित्त काय उपस्थित | ऐकोनि पंढरीनाथ बोलते जाले ॥५॥
माझी कुळवृत्ति हरिदासा ठाउकी | मज यासी ओळखी निकट असे ॥६॥
मज असंगा संगु सर्वकाळी याचा | अनंत जन्मांचा ऋणानुबंध ॥७॥
साक्ष तुमचे चरणा करुनि बोले वाचा | मी मैत्र नामयाचा अंतरंगु ॥८॥
करोनिया स्नानविधी यावे शीघ्रवत | करावे सनाथ कृपादृष्टी ॥९॥
बिढार तरी असे राउळाभीतरी | नांव सांगो तरी अनंत जाणा ॥१०॥
जीवीचे गुडजौप्य संतांसी पुसावे | निःसंदेह यावे भोजनासी ॥११॥
ऐसी ते अमृतवाणी ऐकोनि श्रवणी | आनंदले मनी भूदेव ते ॥१२॥
आज्ञा देती देवा जावे निजमंदिरा | शीघ्रवत करा पाकसिद्धी ॥१३॥
मग रुक्माईसी सांगे सकळ विवंचना | प्रार्थिले ब्राह्मणा सकळिकांसी ॥१४॥
कर्मठ अभिमानी नोळखती मज | देखोनिया चोज वाटे त्यांसी ॥१५॥
कुळवृत्ति नाम पुशिले मज तिही | सांगितले म्यांही सर्व त्यांसी ॥१६॥
सांगाती संतांचा मी मैत्र नामयाचा | अनंत जन्मांचा निकट म्हणोनी ॥१७॥
बिढार तरी असे राउळाभीतरी | सांगे खूण परी न कळे त्यांसी ॥१८॥
नाम तरी अनंत दाविला संकेत | परी नेघे त्यांचे चित्त आठवण ॥१९॥
तंव ते विश्वमाता म्हणे जी कृपानिधी | सदा भेदबुद्धि त्यांचे ठायी ॥२०॥
विद्या वयसा जाती कुळाचा अभिमान | त्या कैंचे चरण प्राप्त तुमचे ॥२१॥
उदार चक्रवर्ती भक्तांचा विसावा | त्याच्या निजभावा वेळाईतु ॥२२॥
तो भाग्ये जोडला वैकुंठीचा ठेवा | उजरी जाली दैवा नामयाच्या ॥२३॥
