कथे बैसोनि सादरे । स
2627.
कथे बैसोनि सादरे । सुखचर्चा परस्परे । नवल काय तो उद्धरे । आणीक तरे सुगंधे ॥१॥
पुण्य घेई रे फुकाचे । पाप दुष्टवासनेचे । पेरिल्या बीजाचे । फळ घेई सेवटी ॥धृपद॥
कथा विरस पाडी आळस । छळणा करूनि मोडी रस । बुडवी आपणासरिसे । विटाळसी नावेसी ॥२॥
सज्जन चंदनाचिये परी । दुर्जन देशत्यागे दुरी । राहे म्हणे हरी । विनंती करी तुका हे ॥३॥
अर्थ :
हरीकथेमधे आदराने बसून हरिभक्त हरीकथेची परस्परांशी सुख चर्चा करतात. त्यांचा तर उध्दार होईल यात नवल काय आहे परंतू त्यांच्या अंगावरुन वाहणारे सुगंधी वारे त्यांच्याजवळ बसणा-यांच्या अंगावरुन गेले तर तेही तरुन जातील. त्यामुळे फुकट हरीकथेत बसून फुकटचे पुण्य घ्यावे आणि दुष्ट पापी वासनेचे त्याग करुन टाकावे. तू जसे बीज पेरशील तसेच तुला शेवटी फळ मिळेल जो आळस करुन कथेचा विसर पाडतो आणि भक्ताचा छळ करुन कथेचा रसभंग करतो, जशी विटाळ स्त्री नावेत बसली तर ती सर्वांनाही विटाळ करते त्याप्रमाणे तो मनुष्य स्वत:ही बुडतो आणि आपल्या सर्व कुळालाही बुडवितो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा चंदनाप्रमाणे सज्जन व्यक्तीला माझ्याजवळ कर आणि दुर्जन व्यक्तीच्या देशाचा देखील त्याग करुन त्यांच्यापासून मला दूर ठेव. हे हरी अशी विनंती मी तुम्हाला करीत आहे.
