॥ श्रीएकनाथमहाराजकृत
72.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय बाहत्तरावा ॥
लक्ष्मण - सीतेचे समाधान
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
त्रिगुणांची जटा शिरी । सर्वथा युगाचे सुरासुरी ।
स्वये त्याची केली बोहरी । भजनेंकरी रामाच्या ॥ ॥
लागोनियां भजनवाटा । सोडिला त्रिगुणांचा कुरुठा ।
नांवे साचार त्रिजटा । भजननिष्ठा उगवली ॥२॥
ऐसी त्रिजटेची ख्याती । चरित्र पावन त्रिजगती ।
बिभीषणें करोनि विनंती । विमान रघुपती अर्पिले ॥३॥
ते न घेच रघुनाथ । तेणे बिभीषण सचिंत ।
विमाना न शिवे रघुनाथ । भाग्यहत मी करंटा ॥४॥
विमानेंकरोनि तत्वता । कांही सेवा रघुनाथा ।
माझी पावेल अल्पता । सकळ वृथा ते झाले ॥५॥
बाह्म उपचारांनी राम वश होणें नाही :
तरीं ऐसे केंवी घडे । जे बाह्म पदार्थी सेवा जोडे ।
बाह्य सर्वथा रामा नावडे । वृथा वेडे शिणताती ॥६॥
ऐसा निश्चिय मानोनि चित्ती । मौनें नमिला रघुपती ।
तंव झाली नवलगती । आला निश्चिती विश्वकर्मा ॥७॥
श्रीरामांसाठी विश्वकर्म्याने नवे कामग विमान तयार करून दिले :
घालोनिया लोटांगण । विनविला रघुनंदन ।
करावया अयोध्यागमन । नवें विमान करीन मी ॥८॥
विश्वकर्मा अति निगुती । रचिता झाला विमानस्थिती ।
आजन्म कष्टांची विश्रांती । श्रीरघुपती सेविलिया ॥९॥
येणे संतोषेंकरोनि जाण । निर्मिता झाला विमान ।
संकल्पमात्रें करी गमन । म्हणोनि अभिमान कामग ॥१०॥
विमानाची पर्वताकार विशालता :
अति प्रचंड पर्वताकार । रचिले अति मनोहर ।
तेथील खणांचा विचार । संक्षेपाकार सांगेन ॥११॥
कोणी म्हणती एक खण । कोणी भाविती त्रिखण ।
कोणी भाविती पंचखण । कोणी दशखण भाविती ॥१२॥
एक भाविती षोडश । एक सांगती एकवीस ।
एक सांगती पंचवीस । स्वमतें असोस बोलती ॥१३॥
निश्चय पाहता संपूर्ण । एकी अनेक भाविती खण ।
एक अनेक हे वणवण । नाही जाण दुखण्यासी ॥१४॥
अठ्ठावीस छत्तीस म्हणती । ते जाणावी अवघी भ्रांती ।
एकी अनेकांची स्थिती । स्वमतें बोलती बहुविध ॥१५॥
तळींहून चढती खण । शेवटिल्या खणा जाता पूर्ण ।
हरपे खणांची खणखण । ऐसे विंदान साधिले ॥१६॥
सात पौळी अति सुटंका । दहा गवाक्षें पै देखा ।
पंचप्रकारीं रचिलें चोखा । गाडोरा सुरेख त्रिगुणांचा ॥१७॥
किंकिणीं ज्वाळमाळांचे परी । पन्नास आगळ्या दोनी वरी ।
तयांमाजी मुख्य चारी । निरंतरी वाजत ॥१८॥
इतर माळांचिया हारी । शोभताती नानापरी ।
गुंफिलिया त्रिप्रकारीं । नादाची परी अलोलिक ॥१९॥
जे जे काळी प्रीत जैसी । ध्यनि उमटे तैसी तैसी ।
दहा चाळक मुख्य त्यासी । इतर नादांसी नाही संख्या ॥२०॥
नित्य प्रकाशालागूनी । दीपशिखा पै धरोनी ।
शशिसूर्य अनुदिनी । दिवारजनी तिष्ठत ॥२१॥
नवलक्ष दीपावळी । नित्य शोभती अंतराळी ।
औटकोटी भूमंडळी । पताकाओळी मंडित ॥२२॥
मध्यखणीं हुताशन । नित्य करितसे पाचन ।
क्रियाशक्तिसंपादन । पाकशासन करीतसे ॥२३॥
अरुचि उपजेल भोजनी । म्हणोनि वैद्यराज दोनी ।
अश्वनीदेव अनुदिनी । ओषधि घेवोनि वोळंगती ॥२४॥
भक्तिज्ञान वैराग्य चौखट । अति सुरस त्रिकूट ।
यथाकाळें एकनिष्ठ । अति निर्दुष्ट पुरविती ॥२५॥
दशधा वायूचे पदर । तेचि दशदिशा अलंकार ।
जावों न देती सैर । मर्यादापर वागविती ॥२६॥
चाळक तयासी मारुती । संकल्पमात्रें गमनस्थिती ।
नित्य वर्तवी मनोवृत्ती । श्रीरघुतिनिजमतें ॥२७॥
आज्ञाशासन निरंतर । कर्ता स्वामी सौमित्र ।
त्याचेनि अनुमतें साचार । गगनसंचार विमाना ॥८२॥
अति जिवलग पूर्ण । शुद्धभावार्थी बिभीषण ।
वागवावया विमान । आज्ञापन त्यासी केले ॥२९॥
बिभीषणासी सखा जाण । सुष्ठबुद्धि सुग्रीव पूर्ण ।
विवेक वैराग्य समान । निजसमान वागविती ॥३०॥
ऐसी निजकळा नागर न । धात्यानें रचिलें विचित्र ।
जेथे साक्षी श्रीरामचंद्र । असे अगोचर होउनी ॥३१॥
ऐसे साधोनि विंदान । विश्वकर्मा आपण ।
पुढे ठेवोनि विमान । रघुनंदन नमियेला ॥३२॥
लंकेमध्ये श्रीरामांची पूजा घडणार नाही म्हणून बिभीषणाच्या मातेला अतीव दुःख :
येरीकडे लंकाभुवनीं । बिभीषणाची जननी ।
श्रीरामगमन ऐकोनी । झाली मनी अति दुःखी ॥३३॥
ऐसे होते निजमानसीं । राम प्रवेशेल लंकेसी ।
तेणे काळे अति प्रीतीसी । यथा सामर्थ्येंसीं पूजीन ॥३४॥
रूप पाहेन डोळेभरी । गोष्टी सांगेन तोंडभरी ।
वचन ऐकेन कानभरी । तैसेंच अंतरी पै ध्यान ॥३५॥
अनंत जन्मांचें कल्मष पूर्ण । जे पुढेही करीन दुराचरण ।
त्याचे करावया क्षाळण । श्रीरामागमन वांछित ॥३६॥
श्रीरामभजनी प्रीती गाढी । तेणे सर्वसंसारबेडी ।
तुटे न लागता अर्धघडी । योनिसांकडी पै निरसे ॥३७॥
याचि आशा उत्कंठित । श्रीरामाची वाट पाहत ।
तंव ऐकिलें विपरीत । राम गमनस्थ अयोध्ये १३८ ॥
तरी आपलेंचि भाग्य हीन । उत्कंठा न होता पूर्ण ।
आम्हांसि न देता दर्शन । अयोध्यागमन मांडिलें ॥३९॥
श्रीरामचरणीं नव्हेचि भेटी । वज्र पडो ये ललाटी ।
भाग्ये अतिशये करंटी । फुंदे गोरटी अति दुःखी ॥४०॥
करे पिटी ललाट । हृदयावरी हाणी चपेट ।
रामे उद्धरिला दशकंठ । उपेक्षा निष्टंक आम्हांसी ॥१४॥
चोरोनि आणिली निजभाज । तो उद्धरिला राक्षसराज ।
आम्हा मोकलोनि रघुराज । केंवी प्रयाणवोज करितसे ॥४३॥
धन्य मंदोदरी पतिव्रता । निजांगेंचि तत्वता ।
भेटोनिया श्रीरघुनाथा । संसारखता फाडिले ॥१४॥
श्रीरामतेजे आपण । पतीसवेसहगमन ।
करोनिया जन्ममरण । क्षणे जाण निरसिले ॥४४॥
करोनिया निजख्याती । सायुज्यिला रघुपती ।
तैसीच सुलोचना सती । निजमुक्ती साधिली ॥१४५॥
मंदभाग्य मी करंटी । निजांगेंचि उठाउठी ।
श्रीरामाची निजभेटी । कडकडाटीं न घेचि ॥१४६॥
म्हणोनिया अति उद्विग्न । उकसाबुकसीं स्कृंदन ।
स्वये करीतसे आपण । तेणे राम पूर्ण कळवळला ॥४७॥
कैकसीची तळमळ पाहून तिला भेटीसाठी आणण्यास श्रीरामांची आज्ञा :
अंतर्यामी श्रीरघुनाथ । तेणे जाणोनि अवचित ।
स्वये बिभीषणा सांगत । तुमची माता येथे न येचि भेटी ॥४८॥
तुम्हांसी स्मरण नाही निश्चित । आम्ही निजकार्यीं दुश्चित ।
मातेची भेटी न घेत । केवी निघत अयोध्ये ॥४९॥
येरु मस्तक ठेवोनिया चरणा । स्वये विनवी रघुनंदना ।
स्वामीचिया निजदर्शना । उत्कंठा मना मातेसी ॥५०॥
स्वामीनें स्मरण न करिता । केंवी आणू न पुसतां ।
यालागी रघुनाथा । नाही माता आणिली ॥५१॥
मातेला आण्ण्यासाठी बिभीषण दूतांना धाडतो :
आज्ञेप्रमाणें आता । घेऊन येईन निजमाता ।
म्हणोनि ठेवी चरणावरी माथा । धाडी सत्वरता दूतासी ॥५२॥
आज्ञापिले रघुनंदनी । भेटो आणी निजजननी ।
तुम्ही सवेग जाऊनी । भेटीलागोनी आणावी ॥५३॥
माझे सांगोनी लोटांगण । श्रीरामभेटीलागून ।
स्वये आणावी आपण । अविलंबें करू न जाण येथे ॥५४॥
वंदोनियां ते वचन । लंकेमाजी येऊन ।
माते कैकसीलागून । केले नमन सेवकी ॥५५॥
अयोध्येसीं प्रयाण करिता । तुझे भेटीलागीं यथार्थता ।
राहणे झाले रघुनाथा । मूळ तत्वता धाडिले ॥५६॥
दूतांनी कैकसईक्त विमानातून येण्याचे विनविले कैकसी आनंदित :
अंगीकारोनी श्रीरामाज्ञा । वेगी बैसोनि विमाना ।
शीघ्र करावे प्रयाणा । श्रीरामदर्शनालागूनी ॥५७॥
ऐकोनिया तो वचनार्थ । झाली पूर्ण आनंदभरित ।
पूर्वार्जित जे मनोरथ । ते समस्त आजि कळले ॥५८॥
श्रीरामदर्शना चित्त । होते अत्यंत उत्कंठित ।
बाप कृपाळु रघुनाथ । अंतरवृत्त जाणता ॥५९॥
भेटावया रघुपती । न चले यानाची निजगती ।
यानारूढ विषयस्थिती । सर्वथा रघुपती भेटेना ॥६०॥
भाग्य फळा आले माझे । जे स्मरण केले रघुराजे ।
चरणी चालत निजवोजे । भेटी जाइजे हेंचि भले ॥६१॥
म्हणोनिया राजमाता । चरणी चालली तत्वता ।
भेटावया रघुनाथा । हर्षितचित्ता निघाली ॥६२॥
निघोनि नगराबाहेरी । आली रामसैन्याभीतरी ।
पुढे येवोनि झडकरी । धरिली करी बिभीषणें ॥६३॥
श्रीरामदर्शनाने कैकसीला अत्यंत प्रेमानंद होतो :
नेतां श्रीरामासंमुख । आनंदभरित रघुकुळटिळक ।
माता देखोनि एकाएक । आलिंगी देख निजप्रेमें ॥६४॥
आलिंगितां देख एकाएक । कैकसी सुखाची झाली देख ।
जन्म मृत्यु जरा अशेख । स्वये निःशेख विसरली ॥६५॥
विसरली ते पुत्रशोक । विसरली ते द्वंद्वदुःख ।
इहलोक परलोक । लोकालोक विसरली ॥६६॥
श्रीरामी देता आलिंगन । विसरली देहाचे भान ।
विरोनि गेली स्वये आपण । जेंवी लवण जीवनीं ॥६७॥
श्रीराम भेटलिया तत्वता । तुच्छ त्यापुढे समाधि अवस्था ।
सलोकता स्वरूपता । सायुज्यता सरेना ॥६८॥
ऐसे पडिले आलिंगन । ते स्वरूपीं समावे संपूर्ण ।
युक्ती सोडवून रघुनंदन । मनोहर आपण वचन बोले ॥६९॥
रावणाचे दोष त्याच्या मातेला सांगून राम तिची समजूत घालतात :
रावण आणि कुंभकर्ण । तुझे पुनीत संतान ।
वधिता झाला रघुनंदन । ऐसे आपण न म्हणावे ॥७०॥
अभिलाषितां पतिव्रता । सकुळ रावणा क्षोभली सीता ।
तिणें करविलें त्याच्या घाता । बोल सर्वथा आम्हांसी ॥७१॥
परनारीचा अभिलाष हेच सर्वनाशाचे आदिकारण :
जी अभिलाषी परनारी । पतिव्रता त्याहीवरी ।
त्यासी ठाव नेदी धरित्री । पचें अघोरी कल्पकोटी ॥७२॥
सीता जन्मली धरेभीतरीं । ते अभिलाषी कपटेंकरीं ।
म्हणोनि क्षोभली धरित्री । केली बोहरी कुळेंसीं ॥७३॥
परदारगामी नर । त्याचा भार अति दुर्धर ।
धरा साही न शके अणुमात्र । जाय सत्वर रसातळा ॥७४॥
महापर्वत पाषाण । चतुर्विध सृष्टि संपूर्ण ।
त्याचा भार अणुप्रमाण । नाही जाण धरेंसीं ॥७५॥
विषयी विषयलुब्ध देख । परदारगामी विशेख ।
पतिव्रते विक्षेपक । भार देख धरेसी ॥७६॥
तेणे अधर्म दाटली । धरा अतिशये क्षोभली ।
सकुळ समाप्ति केली । रावण धुळीं मेळविला ॥७७॥
रावण विश्वद्रोही होता, सीताराम ही निमित्तमात्र :
एका क्षोभली जनकबाळी । सर्वथा न घडे हेही बोली ।
विश्वद्रोहाची इंगळी । समूळ मूळी पडिलासे ॥७८॥
ब्राह्मणांचे वृत्तिहरण । स्वधर्माचें विच्छेदन ।
बंदीं घातले सुरगण । विरोध पूर्ण त्रैलोक्या ॥७९॥
मुख्य ध्येय श्रीशंकर । ज्याचेनि सकळ दुस्तर ।
निरसोनि पाविजे परात्पर । जो सुखसार निजभक्ता ॥८०॥
त्याचे ठायी उन्मादता । सेव्यासेव्य न विचारिता ।
भोगू मागे स्वामीची कांता । गुरु तल्पगता रावण ॥८१॥
रावणाने पार्वतीची अपेक्षा केल्यामुळेच तिने रावणाचे भस्म केले :
उमा क्षोभली अति क्रोधेंसी । सकुळसैन्यपुत्रेंसीं ।
भस्म केले रावणासी । बोल आम्हांसी न ठेवावा ॥८२॥
देवद्रोही ब्रह्मद्रोही । विश्वाचा तो विश्वद्रोही ।
जगद्गुरु शंकराचापाही । गुरुद्रोही रावणा ॥८३॥
सकळ पापांहूनि विशेषतां । मुख्य पाप गुरुतल्पगता ।
सकुळ तेणे पावला घाता । जाण तत्वता कैकसी॥८४॥
बिभीषणाच्या पुण्याईची थोरवी राम वर्णितात:
निजपापेंकरोनि पूर्ण । जावा अधःपाता रावण ।
शुद्ध धर्मात्मा बिभीषण । तेणे तो जाण उद्धरिला ॥८५॥
बंधूच्या सख्यत्वें पूर्ण । श्रीशंकरे कृपा करून ।
केला निष्पाप रावण । अपराधी पूर्ण जाणतांही ॥८६॥
रावणाची सगर्वता । कळो आली पै समस्ता ।
क्रोधे हाणितल्या ज्यासी लाता । तेणेंचि तत्वता उद्धरिले ॥८०॥
सावध ऐके कैकसी । धन्य धन्य तुझी कुसी ।
बिभीषणाते प्रसविलीसी । सकळ कुळासी उद्धरण ॥८८॥
रावणाच्या पापे त्वरित । नरका जावे कुळासहित ।
धन्य भाग्याचा हा हरिभक्त । सकळ कुळ निश्रित उद्धरिले ॥८९॥
दोहींची स्थिती निश्चिती । प्रत्यक्ष दिसे हातोहाती ।
असत्पुत्रे नरकप्राप्री । उद्धारगती सत्पुत्रें ॥९०॥
रावणाचेनि दुराचरणें । जग निंदी मातेकारणें ।
बिभीषणाचेनि साधुपणें । जनें वानणें तुजलागीं ॥९१॥
कुलं पवित्रं जनजी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन ।
अपारसंवित्सुखसागरेस्मिन् लीनं परे ब्रह्मणि यस्य चेतः ॥१॥
कृतार्थ माता कोणती ? :
हरिभक्त ब्रह्मसंपन्न । ज्याच्या कुळी होय उत्पन्न ।
तेणे सकळ कुळ पावन । ब्रह्मसंपन्न पै होत ॥९२॥
हरिभक्त जन्मे जिचे कुसीं । अवघे त्रैलोक्य वंदी तिसी ।
ते प्रत्यक्ष घडले कयाधूसीं । झाली जगासी अतिवंद्य ॥९३॥
प्रल्हाद नुपजतांचि पूर्वी । नारद मानी सर्वभावीं ।
बंदिमोचन इंद्रादि देवीं । प्रसूति भावी ऐकता ॥९४॥
जेथे राहती भगवद्भक्त । ते भूमंडळ होय पुनीत ।
कीर्तनसुखें डुल्लत । जग उद्धरत ज्यांचेनि ॥९५॥
वाग्गद्गदा द्रवते यस्य चित्तं रुदत्यभीक्ष्णं हसति क्वचिच्च ।
विलज्ज उद्गायति नृत्यते च मद्भक्तियुक्तो भुवनं पुनाति ॥२॥
भगवद्भक्ताची लक्षणे :
ज्याचेनि भूमडळ पावन । ऐक त्या भक्ताचें लक्षण ।
स्वये बोलिला भगवान । जडउद्धरण ज्याचेनि ॥९६॥
आनंदें करिती हरिकीर्तन । नामे सर्व गर्जे गगन ।
श्रोतिया वक्तयाचें अंतरक्षाळण । न लागता क्षण पै होय ॥९७॥
क्षाळलेनि अंतरे । परमानंद अंतरी भरे ।
चित्त चित्तपणा विसरे । न देखे दुसरे जगामाजी ॥९८॥
जगाचे ठायी विषमता । चित्तपणें भासे चित्ता ।
तेणे श्रवण कीर्तन करिता । स्वये भगवंता रातले ॥९९॥
तेणे अंतर सुखावे तत्वता । विषम जगामाजी पाहता ।
बुडाली विषमाची वार्ता । चिदाभासता सर्वत्र ॥१००॥
जेथे दुजेपणाचें भान । तेंचि लाजेसीं आयतन ।
हारपलें द्वैतभान । लज्जा पूर्ण निमाली ॥१०१॥
उन्मत्ताचे परी जाण । निर्लज्ज करी कीर्तन ।
तेणे कीर्तने सदा आपण । करी नर्तन तालच्छंदें ॥१०२॥
मद्यरसाने संसार विरण्यापेक्षा ब्रह्मरसाने देहातीत होणे केव्हाही चांगले :
जो मोले घेऊनि मद्यासी । स्वये होय विषयविलासी ।
तो विसरे देहभावासी । द्वैत त्यासी भासेना ॥१०३॥
उन्मादरस विचित्र । मेळवूनी केले एकत्र ।
त्याचा एवढा बडिवार । क्षणे संसार विसरवी ॥१०४॥
सकळ रसाचे रसपान । जे गोडियेमाजी होती निमग्न ।
तो ब्रह्मरस सेविलिया जाण । संसारभान केंवी उरे ॥१०५॥
ऐसे ब्रह्मरसमहायोगे । जगी मद्भक्त दाटुगे ।
कळिकाळाते जिणोनि वेगे । नामबळें जग उद्धरती ॥१०६॥
एवढे भक्ताचें महिमान । तो तुझा पुत्र बिभीषण ।
भगवद्भजनें अति पावन । जंग उद्धरणे याचेनि ॥१०७॥
हरिभक्तांची नाममाळा । प्रातःस्मरणीं स्मरतां अबळा ।
महापातकांचा पाळा । एके हेळां भस्म होत ॥१०८॥
बलिर्बिभीषणो भीष्म प्रल्हादो नारदो ध्रुव: ।
षडैते वैष्णवा ज्ञेयाः स्मरणं पापनाशनम् ॥३॥
महाविष्णूचें वरद ऐसे । भक्तस्मरणें पाप नासे ।
तुझे भाग्य उत्कट कैसे । पुत्र बैसे भक्तओळी ॥१०९॥
ऐसे मातेचे शांतवन । स्वये करी रघुनंदन ।
येरी घालोनि लोटांगण । करी विनवण स्वामीचें ॥११०॥
ऐके स्वामी रघुनंदन । तुझ्या निजभजनें सकळ कल्याण ।
भजनास्तव कुसवा धन्य । धन्य संतान तुझेनि ॥१११॥
धन्य रावण कुंभकर्ण । तुवा निजहस्ते विंधोनि बाण ।
पुत्रां दिधले सायुज्यसदन । भाग्य कोण त्याहूनी ॥११२॥
एकल्या न देता मुक्ती । उद्धरिली सकुळ संतती ।
अगाध रामभजनाची ख्याती । राक्षसा मुक्ति हटेंतटें ॥११३॥
विरोधे पावले मुक्तीसी । न कळे भजे त्या काय देसी ।
काय वानू बिभीषणासी । म्हणोनि चरणांसी लागली ॥११४॥
उठोनिया वेगेंसीं । श्रीरामे धरिली हदयेंसीं ।
धन्य धन्य ते कैकसी । श्रीराम भजनासीं विनटली ॥११५॥
कैकसी- रामभेटकथा क्रौंचरामायणातील आहे :
श्रोते विषम मानिती पोटी । मूळी देखिली नाही दृष्टी ।
कैकसी श्रीरामाची भेटी । नवी गोष्टी हे कैंची ॥११६॥
तरी ज्याचे पोटी असेल आशंका । तेणे क्रौंचरामायण पहावे देखा ।
तेथील हा भाव निका ॥ असेल ठाउका ज्ञात्यांसी ॥११७॥
तरी शरण येता रामासीं । माता तुष्टली बिभीषणासीं ।
श्रीरामी प्रेमा कैकसीसी । तेणे भेटीसीं सुचविलें ॥११८॥
अनंत कथा रामायणी । शतकोटि वदली वाल्मीकाची वाणी ।
सकळ कथा आलोडोनी । कोणी शोध न करू शके ॥११९॥
माझे लोटांगण तत्वता । कोप न मानावा श्रोतां ।
एका जनार्दनी वक्ता । तोचि वावयार्था चाळिता ॥१२०॥
असो आता परिहारता । सैराट करी रामकथा ।
पावनकरी श्रोतां वक्ता । नित्यमुक्तता श्रीरामे ॥१२१॥
यालागी श्रोतेजन । आप्त इतर परिपूर्ण ।
त्यांसी-माझे लोटांगण । क्षमा आपण करावी ॥१२२॥
श्रीरामे पावन श्रोता । श्रीरामे पावन वक्ता ।
श्रीरामकथा अनुमोदितां । उद्धरी तत्वता श्रीराम ॥१२३॥
पुढील कथानुसंधान । सवडी पाहोनि पूर्ण ।
सांडूनि श्रीरामअंकासन । जनकनंदिनी ऊठली ॥१२४॥
होता इतर संवादासीं । उठता नयेचि जानकीसीं ।
उच्छ्रंखळता नाही तिसी । मर्यादेशी मंडन ॥१२५॥
रामांच्या अनुज्ञेने सीता लक्ष्मणाचे चरणवंदन करून त्याची क्षमा मागते :
भेटावया सौमित्रासी । आज्ञा पुसोनि राघवासी ।
जवळी येवोनि वेगेंसी । लागली चरणांसी अति प्रीती ॥१२६॥
क्षमा करावी निश्चित । मी तुझे निजअपत्य ।
नेणतां दोघांचें महत्त्व । वचन दुरुक्त बोललें ॥१२७॥
श्रीरामाचा जिवलग । त्यासी छळितां सवेग ।
महापापिणी निजडाग ४ । मज सवेग लागला ॥१२८॥
महापाप ते अल्प । भक्तच्छळण ते वज्रपाप ।
निरय भोगिजे आकल्प । नाही अल्प उद्धार ॥१२९॥
तेणे पापें त्वरित । मज धरोनिया लंकानाथ ।
वेगे नेले लंकेआंत । श्रीरघुनाथ अंतरला ॥१३०॥
नित्यछळण रावणाचे । राखण क्रूर राक्षसींचें ।
खाऊ गिळू त्यांचे । दुर्ग लंकेचे सभोंवतें ॥१३१॥
सकृत् छळिता लक्ष्मण । पूर्ण क्षोभला रघुनंदन ।
नित्य रावणाचे छळण । सोसलें पूर्ण षण्मास ॥१३२॥
श्रीराम भक्तांचा अंकित । श्रीराम भक्तांचा विक्रीत ।
भक्ता सबाह्य श्रीरघुनाथ । नित्य नांदत सर्वदा ॥१३३॥
म्हणोनिया यथार्थ । जेणे पूजिले रामभक्त ।
तेणे पूजिला रघुनाथ । उपचारयुक्त षोडश ॥१३४॥
घृतप्लुतअवदानीं । भक्त सुखावले भोजनी ।
तेणे षड्रसें करोनी । केला रघुनंदनी नैवेद्य ॥१३५॥
जेणे विरोधिले रामभक्त । तेणे विरोधिला रघुनाथ ।
अमूर्त होवोनियां मूर्त । क्षणे घात करी त्याचा ॥१३६॥
दुर्धर आयुधे अलोलिक । सुदर्शन गदादिक ।
अक्षयी भाते कोदंड देख । रघुकुळटिळक वागवीं ॥१३७॥
भक्तविरोधी दारुण जाणा । तोचि वैरी रघुनंदना ।
त्याच्या करावया हनना । करी प्रेरणा शस्त्रांची ॥१३८॥
प्रल्हादाची विरोधितां । मरण पावला त्याचा पिता ।
भगवद्भक्तांचा द्वेष करिता । विघ्नघाता वरपडा होय ॥१३९॥
इतरांच्या कायशा गोष्टी । सौमित्र छळिलियासाठीं ।
राम लागोनि माझे पाठी । क्षणे दिक्पटीं लाविले ॥१४०॥
रामसेवेलागीं तत्वता । वनवास घेतला माथा ।
ते नायके श्रीरामकथा । ऐसी अवस्था मज झाली ॥१४१॥
भक्तद्वेषी महापापिणी । अंतरले रघुनंदनी ।
ते उपसाहावें म्हणोनी । लोटांगण घातले ॥१४२॥
सौमित्रचरणीं माथा । ठेवोनिया जनकदुहिता ।
उकसाबुकसी स्फुंदतां । अति अवस्था पै झालीं ॥१४३॥
लक्ष्मणाचे सीतेस वंदन व स्वतःचे दोषदिग्दर्शन :
ते देखोनि सुमित्रानंदन । घालोनि सीतेसी लोटांगण ।
अश्रुपूर्ण झाले नयन । करी रुदन अट्टाहास्थें । १४४ ॥
तुझेनि वियोगें तत्वता । अति अवस्था रधुनाथा ।
अंगीकारोनि पिशाचता । होय हिंडता वनोवनीं । १४५ ॥
एवढिया विघ्नासी कारण । मुख्य माझे अधैर्यपण ।
न साहवेचि एक वचन । महापापी पूर्ण मी एक । १४६ ॥
सीता लाविली दिक्पटीं । राम पाडिला अति संकटीं ।
विवरद्वारा उठाउठी । नेती जगजेठी बांधोनी ॥१४७॥
दुर्दशा श्रीरघुपती । मारावया उभा करिती ।
दैवे पातला मारुती । राक्षसपंक्ती निवटिल्या ॥१४८॥
संदिसे तेथोनि निघतां बाहेरी । सवेंचि युद्धमहामारी ।
रावणेंसीं जुंझारी । शरधारीं वर्षती ॥१४९॥
आणीक सांगों ते किती । शरबंधनी रघुपती ।
विसंज्ञ पडिला क्षिती । हेही ख्याती पै माझी ॥१५०॥
रावणे केले तुझे छळण । श्रीरामासी दृढ बंधन ।
इतुकियासी मूळ मी पापी पूर्ण । सत्य जाण जानकिये ॥१५१॥
ऐसे परस्पर दोघें जण । येरयेरांचा गळा धरून ।
निजापराधी अति उद्विग्न । करिती रुदन अट्टाहास्यें ॥१५२॥
तंव आश्चर्य झाले तेथ । श्रीरामचरण अवचित ।
दृष्टि पडता निश्चित । शोक समस्त निमाला ॥१५३॥
घालोनिया लोटांगण । विनविता झाला लक्ष्मण ।
मानू नको याचे दूषण । रघुनंदन लाघवी ॥१५४॥
मूळ प्रेरणा देणारे श्रीराम आहेत, असे सांगून सीतेचे सांत्वन :
पूर्ण त्याचे मनोगत । राक्षस प्रबळले बहुत ।
त्यांचा करावया घात । विंदान येथ रचियेलें ॥१५५॥
सर्वांतर्यामी श्रीरघुनाथ । सकुळ लाघव त्याचे येथ ।
तेणे संचरोनि हदयांत । उभयवृत्त संपादिलें ॥१५६॥
तुझे छळणबुद्धीसीं कारण । मुख्य परमात्मा रघुनंदन ।
माझ्या अधैर्यासीं मूळ पूर्ण । तोचि जाण जानकिये ॥१५७॥
शब्दे हाय वर्ण नाही होत । शब्दे प्राण नाही जात ।
शब्दे नव्हे देहपात । हे मी जाणत सर्वदा ॥१५८॥
तेणे म्या आपण । तुज शब्दासाठी जावे सोडून ।
हे माझे अधैर्य नव्हे जाण । केले विंदाण श्रीरामे ॥१५९॥
अति दुरात्मा रावण । केले सकळांचे अवरोधन ।
त्यासी वधावया जाण । करविले छळण तुजकरवीं ॥१६०॥
श्रीरामशक्ती तत्त्वता । ते तू बोलसी छळणवार्ता ।
त्यासी मूळ श्रीराम कर्ता । विषाद सर्वथा न मानावा ॥१६१॥
म्हणोनि घातले लोटांगण । वंदिले जानकीचे चरण ।
मजवरी कृपा करावी पूर्ण । विषाद आपण न मानवा ॥१६२॥
ऐसी परस्परें विनवण । करिती येरयेरांची आपण ।
तेणे विस्मित बिभीषण । वानरगण विस्मित ॥१६३॥
लाघव करोनि अद्मुत । निजापराधें पाया पडत ।
आपण साक्षी होवोनि तेथ । चरित्र पाहते दोघांचें ॥१६४॥
श्रीराममहिमा :
स्मरतां श्रीरघुनाथ । महापातकी उद्धरत ।
यांचा अपराध किती तेथ । नित्यमुक्त श्रीरामे ॥१६५॥
श्रीरामे पावन वक्ता । श्रीरामे पावन श्रोता ।
श्रीरामे पावन कथा । जगदुद्धारता श्रीरामे । १६६ ॥
श्रीरामे पावन वदन । श्रीरामे पावन श्रवण ।
श्रीरामे कर पावन । करिता पूजन चराचर ॥१६७॥
करिता श्रीरामाचे ध्यान । श्रीरामे पावन होय मन ।
श्रीरामे चित्त पावन । करिता चिंतन रामाचे ॥१६८॥
सांडूनि प्र्पंचआथी । श्रीरामी निश्चये धरिता बुद्धी ।
तेथे झाली विपरीत विधी । स्वये समाधी होवोनि ठाके ॥१६९॥
तेथे अभिमानाचे चिन्ह । स्वयेंचि पालटे आपण ।
सांडोनिया देहाभिमान । स्वये रधुनंदन होऊनि ठाके ॥१७०॥
अगाध श्रीराममहिमान । मनचि होवोनि उन्मन ।
चित्त होय चैतन्यघन । बुद्धि ते जाण समाधी ॥१७१॥
अह तेंचि आपण । होवोनि ठाके सोहं पूर्ण ।
एका जनार्दना शरण । लाघवी पूर्ण श्रीराम ॥१७२॥
पुढे अयोध्येचे गमन । श्रीरामाचे अभिषिंचन ।
सुरस कथा अति गहन । श्रोती अवधान मज द्यावे ॥१७३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
सौमित्रिजानकसिमाधानं नाम द्विससतितमोऽध्याय ॥७२॥
॥ ओंव्या १७३ ॥ श्लोक ३ ॥ एवं १७६ ॥
