हरीचिया भक्ता नाही भ
3058.
हरीचिया भक्ता नाही भयचिंता । दुःखनिवारिता नारायण ॥१॥
न लगे वाहणे संसारउद्वेग । जडो नेदी पाग देवराया ॥धृपद॥
असो द्यावा धीर सदा समाधान । आहे नारायण जवळीच ॥२॥
तुका म्हणे माझा सखा पांडुरंग । व्यापियेले जग तेणे एके ॥३॥
अर्थ :
हरीभक्तांचे दु:ख निवारण सदासर्वकाळ नारायण करत असतो त्यामुळे भक्तांना कोणत्याही प्रकारचे भय किंवा चिंता नसते. हरीच्या भक्तांना संसाराविषयी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज पडत नाही हा देवराव भक्तांना कोणत्याही प्रकारचा दोष लागू देत नाही. हा नारायण सदासर्वकाळ आपल्याजवळच असतो त्यामुळे आपल्या अंत:करणामध्ये नेहमी धीर आणि समाधान असू दयावे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो ज्याने सर्व जगच व्यापले आहे तो पाडूरंग माझा सखा आहे.
