वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ३. अरण्यकाण्ड - अध्याय २३ › २. विराध राक्षसाचा वध

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088079 · अभंग क्र. २

2.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अरण्यकाण्ड

॥ अध्याय दुसरा ॥
विराध राक्षसाचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

अत्री आश्रमात श्रीरामांचे आगमन :

अतिऋषि वसे जेथ । आतुरविश्रांतिपर्वत ।
तेथे आला श्रीरघुनाथ । समवेत स्त्रीबंधू ॥१॥
देखोनि अत्रीचे चरण । श्रीरामे घातले लोटांगण ।
ऋषीनें दिधले आलिंगन । समाधान ध्येयध्याना ॥२॥
सीता आणि लक्ष्मण । दोघीं घातले लोटांगण ।
दृढ मस्तकी धरले चरण । सुखसंपन्न ऋषि जाला ॥३॥
श्रीरामे अति उल्हासता । अनसूयाचरणीं ठेविला माथा ।
अत्रि म्हणे श्रीरघुनाथा । तुझी हे माता पुरातन ॥४॥

अनसूया व सीतेची भेट, सीतेचे अभिनंदन :

ऐकोनि अत्रीचें वचन । सौमित्रे वंदिले तिचे चरण ।
सीतेनें घातले लोटांगण । दिधले आलिंगन अनसूये ॥५॥
सीतेसी देखतांचि दृष्टी । अनसूयेसी सुखानंद पोटी ।
धन्य धन्य तू गोरटी । पतिसन्निष्ठी पतिव्रता ॥६॥
तुझे अंगी बाळपण । पतिच्या व्रता अनुलक्षून।
चरणचालीं वनाभिगमन । तू संपूर्ण पतिव्रता ॥७॥
पतीचें वचन नुल्लंघिता । जे अनुसरे पतीच्या व्रता ।
तेचि सती पतिव्रता । ते तू सीता सभाग्य ॥८॥
ऐसी करोनिया स्तुती । उचलोनियां दोही हाती ।
आलिंगिली अति प्रीती । सतिया सती स्वानंदे ॥९॥
जाणोनि सीतेचे हृग्दत । अनसूयां जाली कृपायुक्त ।
आपुलें पतिव्रतेचें व्रत । सीतेसी देत स्वानंदे ॥१०॥

सीतेला पतिव्रता व्रत व दिव्यवस्त्र समर्पण :

देवोनि पतिव्रतेचें व्रत । अनसूया उल्हासयुक्त ।
दिव्य वस्त्रे अंगरागयुक्त । स्वानंदे देत ते ऐका ॥११॥

अब्रवीच्चापि सकलं हर्षं सीते करोम्यहम ।
इदं दिव्यांबरं माल्यं वस्त्रमाभरणानि च ॥१॥
अंगरांग च वैदेहि महार्हं च विलेपनम् ।
मया दत्तमिदं सीते तव गात्राणि शोभयेत् ॥२॥

अनसूया कृपायुक्त । सीतेसी दिव्य वस्त्रे नेसवीत ।
आणि दिव्य चंदनें चर्चित । माळा घालित दिव्यसुमनी ॥१२॥
सीतेचे पुरवावया कोड । घातला ताडाचा पै तोड ।
अहर्निशी पडेल उजेड । सरली चाड शशिसूर्यां ॥१३॥
तोडाचिया दिव्यदीप्ती । शशिसूर्य खद्योत होती ।
अनसूयेची निजख्याती । पतिसामर्थ्य अत्यभ्दुत । स्वये अर्पित सीतेसी ॥१५॥
माझिया दिव्यवस्त्रांची थोरी । मळिन नव्हेती परिचारीं ।
जाऊ नेणती रजकद्वारीं । निजतेजाकारीं निर्मळ ॥१६॥

उटी व सुमनमालेचे दान :

उटी धुतां ओहळेना जाण । देही दिव्य चंदनाचें महिमान ।
करिता अभ्यंगमर्दन । सुगंधपण उडेना ॥१६॥
दिव्य सुमनांची माळा । सुकों नेणे कदाकाळा ।
नित्य टवटवीत गळा । सुपरिमळा मघमघित ॥१८॥
सीते सावध परिसेयीं । तू माझा प्रसाद पावलीसी ।
तुज भय नाही राक्षसांपासीं । निःशंक होसी निर्भय ॥१९॥
वियोग जालिया रघुनाथा । वियोग न बाधी तुझिये चित्ता ।
पूर्वापर पूर्वकथा । होय सांगता श्रीराम ॥२०॥
म्हणोनि हात ठेविला माथा । अनसूयें अनुग्रहिली सीता ।
तोचि उपदेश पावोनि तत्वता । सुखस्वानंदता सीता जाली ॥२१॥
अनसूया महापतिव्रता । पुढे पाहूनिया कार्यार्था ।
वधावया लंकानाथा । कृपेनें सीता अनुग्रहिली ॥२२॥
श्रीराम सौमित्र सीता । देखोनि उल्हास अत्रीच्या चित्ता ।
पर्वापार पूर्वकथा । होय सांगता श्रीराम ॥२३॥

अनसूया महाभागा तापसी धर्मचरिणी ।
दशवर्षसहस्त्राणि यया तप्तं महातपः ॥३॥
दशवर्षाष्यनावृष्ट्या ढग्धे लोके निरंतरम् ।
यथा मूलफले सृष्टे जान्हवीव प्रवर्तिता ॥४॥

अनसूयेची पूर्वकथा :

अनसूया महापतिव्रता । त्पस्विनी अति वृद्धता ।
चंद्रकिरणांसम शोभे माथा । पतिधर्मार्था अनुकूळ ॥२४॥
न रिघतां गिरिकंदरी । बैसोनियां घरच्या घरी ।
दहा सहस्त्र वर्षैवरीं । इचिया तपाची थोरी अगाथ ॥२५॥

दहा हजार वर्षे उग्र तपश्चर्या :

घरचे घरी कोण तप । ऐसा पुसावया करिसी संकल्प ।
ऐक त्या तपाचे स्वरुप । अति निष्पाप सांगेन ॥२६॥
कोणाची न करी असूया । यांलागीं नांवे अनसूया ।
काम क्रोध लोभ न बाधी जया । ते रघुवर्या महातप ॥२७॥
तपे करकरोनि तापस । कोपे केले अतिशये कर्कश ।
दंडमुंडन वृथा वेष । पडली ओस तपश्चर्या ॥२८॥
काम क्रोध तिसरा लोभ । सांडणे हे तप दुर्लभ ।
ते घरचे घरी जाले सुलभ । अति निर्लोभ अनुसया ॥२९॥

अनसूया का म्हणतात :

जेथे लोभ तेथे असूया । निर्लोभ तेथे अनसूया ।
याचे नाम तपश्चर्या । जाण रघुवर्या निश्चित ॥३०॥
नुल्लंघणें पतिवचनासी । हे परम तप स्त्रियांसी ।
ते दहा सहस्त्र वर्षें इयेसी । अनसूयेसी फावलें ॥३१॥
उल्लंघितां पतीचे वचन । पतिव्रतांसीं पडिले खान ।
नाही सामर्थ्य ना समाधान । स्त्रीपुरुष श्वानप्राय वसवसती ॥३२॥
दहासहस्त्र वर्षेपर्यंत । माझा नुल्लंघी वचनार्थ ।
तेणे तपें हे समर्थ । ऐक सामर्थ्य इयेचें ॥३३॥

अवर्षणकालात सर्वांचे रक्षण :

दहा वर्षे अनावृष्टी । दुर्भिक्ष पडिले इया सृष्टी ।
तृण नाही पृथ्वीचे पोटी । वृथा गोष्टी तेथे कैंची ॥३४॥
ते काळी फळमूळयुक्त । इणें वांचविले जन समस्त ।
परांडमुख नव्हे अहोरात्र । जन संतृप्त फळामूळी ॥३५॥
गौतम पेरी प्रातःकाळी । माध्यान्हीं आणोनि दे साळी ।
तेणे अहल्याबाळीं । ऋषिमंडळी वांचविली ॥३६॥
गौतमें वाचविले ब्राह्मण । इणें वाचविले वर्णावर्ण ।
पशुपक्षी सूकर श्वान । तृप्तिभोजने अनुद्वेगें ॥३७॥
जंव जंव मागते येती द्वारासी । तंव तंव उल्हास अनसूयेसी ।
तृप्ति देता समस्तांसी । अहर्निशी उल्हास ॥३८॥
वृक्ष नाही पृथ्वीसीं । तरी पुरवी फळमूळांसीं ।
अगाध सामर्थ्य इयेपासीं । द्विजदेवांसी अतर्क्य ॥३९॥
जेंवी प्रवाहो गंगाजळा । तैसे पुरविले फळमूळां ।
इचिया सामर्थ्याची कळा । अतर्क्य सकळा द्विजदेवां ॥४०॥

ब्रह्मा, विष्णू, महेश कसोटी घेण्यास येतात :

अवर्षणीं तृप्तिभोजन । द्यावे हे इचें व्रत संपूर्ण ।
एकोनि तिन्ही देव आपण । इचें छळण करु आले ॥४१॥
ब्राह्मणवेषें याज्चा करुन । इचें घेऊनियां वचन ।
म्हणती नग्न होवोनि आपण । इच्छाभोजन द्यावे आम्हा ॥४२॥
ऐकोनि त्यांची वचननोक्ती । शंका नाही इचे चित्ती ।
हो म्हणत स्वानंदस्थितीं । ऐक रघुपति विनोद ॥४३॥

जलप्रोक्षणाने तिघेही देव बालक झाले :

माझे चरणतीर्थ घेवोन । त्यांसी केले अभिषिंचन ।
तंव ते तिन्ही बाळके जाली जाण । अति अज्ञान षाण्मासिक ॥४४॥
मग होवोनियां नग्न । पायांवरी अभ्यंगून ।
तिघां देवोनि स्तनपान । करी परियंदण पालखी ॥४५॥

देव-स्त्रियांची केविलवाणी स्थिती :

लक्ष्मी सावित्री पार्वती । तिघी समर्थ्ये विवादती ।
त्यांसी दावावया इची स्थिती । तिन्ही मूर्ती छळू आल्या ॥४६॥
पुढिलासी करु जाता छळण । छळिताचि छळे आपण ।
निन्ही देवा आले बाळपण । अति अज्ञान स्वये जाले ॥४७॥
दश मासांची अहोराती । अनसूयेनें केली निश्चिती ।
तत्काळ तिहींची प्रसूती । अपत्यप्राप्ती पावले ॥४८॥
अतिशये भोगिती आपत्ती । यालागी अपत्य म्हणती ।
स्वविष्ठा स्वये चिवडिती । ते बाळत्क्प्रती तिन्ही देवा ॥४९॥

देव – स्त्रियांनी अनसूयेची प्रार्थना करुन पतिराजांची मुक्तता केली :

लक्ष्मी सावित्रई पार्वती । देखोनी तिघी कुसमुसती ।
पति अडकले अनसूयेहातीं । सामर्थ्य तीप्रति चालेना ॥५०॥
जैसे सूर्यापुढें खद्योत । तैया तिघी जाल्या गर्वहत ।
अनसूयेसी लोटांगण घालित । पति मिर्मुक्त करी माये ॥५१॥
ती म्हणे पुसावे ऋषीप्रती । त्या मग येती काकुळती ।
ऋषीराया कृपामूर्ती । पतिनिर्मुक्ति सांगावी ॥५२॥
अनसूया पतिव्रताशिरोरत्‍न । माझे लाहोनि आज्ञापन ।
तिघांचे हारोनि अज्ञान । केले सावधान सुखरुप ॥५३॥
केले अनसूयेचें स्तवन । तिघे पुत्र जाले जाण ।
अत्रिगोत्रीं उत्पन्न । ब्रह्मा आपण चंद्र जाला ॥५४॥

दत्तात्रेय अवताराची उत्पत्ती, त्यांचा आशीर्वाद :

रुद्र दुर्वास जाला कोपाग्नी । विष्णू जाला दत्तात्रेय मुनी ।
ते हे श्रीरामा तुझी जननी । जुनाट जुनी अनसूया ॥५५॥
ते हे तुझी आदिमाता । सत्य मानी श्रीरघुनाथा ।
इचे चरणी ठेवितां माथा । तुम्हा निर्भयता वनवासी ॥५६॥
अनसूया परम पतिव्रता । इणें अनुग्रहिली सीता ।
तुम्हासि वनवासी असता । भय सर्वथा असेना ॥५७॥
ज्या या पावाल भयासी । तेथे तेथे निर्भय तुम्हांसी ।
ज्या ज्या पावाल अपेशासी । अपेशीं यशी जगद्वंद्य ॥५८॥
तिघें राहोनि त्रिरात्र । फळमूळांचा अति आदर ।
देखोनि सीतेचा निर्धार । सुख अपार अनसूयेसी ॥५९॥

अत्री ऋषींच्या अनुज्ञेने श्रीराम तेथून पुढे जातात :

अभिनंदोनि अत्रिऋषी । नमस्कारोनि अनसूयेसी ।
श्रीराम निघाला दंडकारण्यासी । राक्षसांसी अंतक ॥६०॥
ऋषिआश्रम वनसमेळीं । अग्निहोत्राची नव्हळी ।
पाहता यागाची शुद्ध शैली । श्रीराम वनस्थळी विचरत ॥६१॥

भयविव्हल करणारे विराधवन :

कोठे त्रिरात्र कोठे पंचरात्र । कोठे वस्ती सप्तरात्र ।
कोठे राहोनि एकरात्र । गमनीं तत्पर श्रीराम ॥६२॥
तंव पुढे देखिले दुर्गम वन । पळती गज सिंह व्याघ्र हरिण ।
ससे साळ्या वृक जंबुकगण । घेवोनि प्राण पळताती ॥६३॥
सिंह मारावे गजथाट । ते का पळती एके वाट ।
व्याघ्र फोडिती हरिणकंठ । ते का समसगट पळताती ॥६४॥
श्रीराम म्हणे लक्ष्मणासी । महभ्दय दिसे श्वापदांसी ।
विसरोनियां वैरभावासी । अति आक्रोशी पळताती ॥६५॥

विराधाकडून सीताहरण :

यांसी भयाचें काय कारण । ऐसे विचारिता रघुनंदन ।
तंव विराधें धांवोन । सीता हरण पै केले ॥६६॥
पुढे श्रीरामलक्ष्मण । सीता मागे होती आपण ।
सीतेचे देखोनि सुंदरपण । विराधें हरण तत्काळ केले ॥६७॥
सीता धरोनि दोही हाती । बैसविली अंकाप्रती ।
मी होईन तुझा पती । चिंता चित्ती करु नको ॥६८॥
तू अप्सरा की खेचरी । वनदेवता की सुरेश्वरी ।
भाग्ये सांपडलीस हो सुंदरी । सुखें माझ्या घरी नांदावे ॥६९॥
तुजसारिखी सुंदर । जरी रिघसील माझे घर ।
गजमुक्ताफळांचे अलंकार । उत्तम शृंगार तुज करीन ॥७०॥
मज जोडली सुंदर कांता । उल्हास राक्षसाचे चित्ता ।
परी त्यासी शंकेना सीता । श्रीरघुनाथाचेनि बळे ॥७१॥
श्रीरामाच्या बाणांपुढें । विराध राक्षस केवळ बापुडे ।
मज नेईल कोणीकडे । मरण रोकडें पावेल ॥७२॥
वन अत्यंत गूढ गहन । पुढे गेले श्रीराम लक्ष्मण ।
त्यांसी विराध न देखे आपण । सीता दोघे जण न देखती ॥७३॥

रामस्मरणाने सीता निर्भय :

अनसूयें अनुग्रहिली सीता । तीस भय नाही सर्वथा ।
ते स्मरे श्रीरघुनाथा । धाव कृपावंता श्रीरामा ॥७४॥
ऐकता श्रीरामस्मरण । राक्षस जाला कंपायमान ।
म्हणे नको करु स्मरण । वचन तीक्ष्ण मज बाधी ॥७५॥
ऐसे ऐकोनि सीतेचे वचन । परतले श्रीराम लक्ष्मण ।
परी गूढ गहन महावन । सीतादर्शन नव्हे त्यासी ॥७६॥
लक्ष्मण कोपला उभ्दट । बाण सोडोनि घनदाट ।
वन छेदोनि केले सपाट । देखिला पापिष्ठ विराध ॥७७॥

ददर्श गिरिशृंगाभं पुरुषादमवस्थितम् ।
वक्रनासं विरुपाक्षं विकृतं घोरदर्शनम ॥५॥

लक्ष्मणाकडून अरण्य साफ होताच विराधाने रामलक्ष्मणांना दर्शन :

राक्षस देखिला अति क्रूर । पर्वतोपम महाथोर ।
वक्र नासिक वक्र वक्त्र । कपाटोदर दुर्धर्ष ॥७८॥
अष्ट महासिंहाचीं मढी । शूळीं खोंचोनि खांदी कावडी ।
मृग व्याळ चितळे बापुडीं । मारी कोडी श्वापदांच्या ॥७९॥
सदंत गजांचीं शिरे । गजचर्में थबथबिती रुधिरें ।
मारोनि पंच पंच व्याघ्रें । खांदी क्रूरें वाहिजेती ॥८०॥
जिव्हा तांबडी लखलखित । नेत्र दिसती अति आरक्त ।
भूंतां करावया अंत । सवे धांवत वनासी ॥८१॥

सरामं लक्ष्मणं दृष्ट्वा सीतां च शुभलक्षणाम् ।
अभ्यधावत्सुसंकुद्धो लेलिहान इवांतकः ॥६॥

विराधें देखोनि श्रीराम लक्ष्मण । मग सीतेसी पुसे हे दोघे कोण ।
श्रीराम भर्तार दीर लक्ष्मण । माझी सोडवण करु आले ॥८२॥
मग तो म्हणे तू माझी कांता । तुज तंव न सांडीं सर्वथा ।
या दोघांसी मी भक्षीन आता । तू काही चिंता करु नको ॥८३॥
ऐसे बोलोनिया देख । विकट देवानियां हाक ।
धांवोनि श्रीरामासन्मुख । काय तो मूर्ख बोलत ॥८४॥

विराधाकडून श्रीरामाचा अधिक्षेप :

तुम्हांसवे सुंदर सीता । ते तंव जाली माझी कांता ।
तुम्हांसी मी न मारी आता । पळावें जीविता वांचवोनी ॥८५॥
तुम्ही म्हणाल युद्ध करीन । तरी मी क्षणार्धे मारीन ।
तुमचे रुधिर प्राशीन । मांसभक्षीन स्वानंदे ॥८६॥
अरे मी विराध महाबळी । वसताहें ये वनस्थळी ।
तुम्ही दोघे मूर्ख समूळी । जे भार्यासमेळी आलेती ॥८७॥
तुम्हा दोघा तापसपण । तरी का वाहता धनुष्यबाण ।
तुम्ही कोठील कोणाचे कोण । हे मज संपूर्ण सांगा ॥८८॥

श्रीरामाचे उत्तरः

मग त्यासी सांगे श्रीराम आपण । धनुष्यें गांजिला रावण ।
ते भंगिले वाहोनि गुण । तो मी जाण श्रीराम ॥८९॥
सुबाहूचा घेतला प्राण । मारीच उडविला संपूर्ण ।
ताटिका वधिली निजबाणें । तो मी जाण श्रीराम ॥९०॥
एकवीस वेळी धरित्री । जेणे भार्गवे केली निःक्षत्री ।
तोही लाजविला शौर्यैकरी । तो मी निर्धारी श्रीराम ॥९१॥
सूर्यवंशीचा विख्यात । श्रीराम दाशरथी काकुत्स्थ ।
करावया राक्षसांचा अंत । वना निश्चित मी आलो ॥९१॥
सीता माझी निजवधू । आणि लक्ष्मण माझा धाकटा बंधू ।
तू कोण राक्षससंबंधू । मूळानुवादू मज सांगे ॥९३॥

विराधाची दर्पोक्ती, लक्ष्मणाचे शरसंधान :

तंव राक्षस म्हणे श्रीरघुनाथा । जगाद नामे माझा पिता ।
शतरदा माझी निजमाता । विराध मी तुमच्या घाता करीन ॥९४॥
ऐसे ऐकता वचन । लक्ष्मण क्षोभला दारुण ।
धनुष्यी वाहोनिया गुण । तीक्ष्ण बाण सोडिले ॥९५॥
कंकपत्री । सुवर्णपुंख चौधारी ।
भेदले राक्षसाचे जिव्हारी । तेणे तो भारी क्षोभला ॥९६॥
घ्यावया लक्ष्मणाचा प्राण । शूळ सोडिला गर्जोन ।
श्रीरामे विंधिला बाण । मध्येंच जाण तोडिला ॥९७॥

श्रीरामबाणाने विराध विद्ध :

सवेंचि श्रीरामे पै जाण । विराधासी पाचारुन ।
रुक्मपुंख सोडिला बाण । अति तीक्ष्ण धगधगीत ॥९८॥
विराधा झांपडी पडिली तेणे । मागे पळणे का पुढे होणें ।
नाठवे करणे न करणे । येणे जाणे खुंगले ॥९९॥

विराधाला आत्मबोध :

श्रीरामबाणाची लखलख । विराधासी एकाएक ।
पाडोनि ठेले जी ठक । क्रिया निःशेष विसरला ॥१००॥
विसरला राक्षसधर्म । विसरला युद्धसंभ्रम ।
विसरला क्रियाकर्म । घाये निर्भ्रम विराध केला ॥१॥
श्रीरमाचा निजबाण । घेवोनि आला श्रीरामस्मरण ।
धाके निमाला देहाभिमान । गर्भबंधन धेवोनी ॥२॥
ऐसी हृदयशुद्धि देखोन । हृदयी भेदला श्रीरामबाण ।
बोध पावोनि संपूर्ण । राक्षसें प्राण सोडिला ॥३॥
धन्य श्रीरामाचा बाण । लागलां राक्षसें सोडिला प्राण ।
बोधा पावला संपूर्ण । तेंचि निरुपण अवधारा ॥४॥

उवाच रामं संहृष्टः प्रांजलिश्चीलतेंद्रियः ।
कौसल्या सुप्रजास्तात रामस्त्वं विदितो मया ॥७॥
वैदेही च महाभागा लक्ष्मणश्च महारथः ।
अभिशापादहं घोरां प्रविष्टो राक्षसीं तनुम् ॥८॥

विराधकृत रामस्तुती :

बाणे भेदिले जिव्हार । वाहती रुधिराचे पूर ।
विकळ पडता शरीर । हर्षे निर्भर विराध ॥५॥
भेदतां श्रीरामाचा बाण । विकळेंद्रिय चलितप्राण ।
घाये पावला संपूर्ण । दुःखनिर्दळण श्रीरामवाणें ॥६॥
घाव लागता व्हावे दुःख । दुःख जावोनि पावला सुख ।
विराला जाला परम हरिख । बाणे अलोलिक सुखी केले ॥७॥
धन्य धन्य हे श्रीराममूर्ती । धन्य धन्य हे बाणाची सुखशक्ती ।
धन्य धन्य हे सीता सती । स्पर्शे निर्मुक्ति राक्षसत्वा ॥८॥
लक्ष्मणे कोपोनि उभ्दट । घोरारण्य केले सपाट ।
माझ्या मोक्षाची ते वाट । केली निर्दुष्ट सौमित्रे ॥९॥
जो का करी शुद्ध मित्र । त्यासी म्हणती सौमित्र ।
लक्ष्मण सुमित्र साचार । निशाचर मी सुखी केलों ॥११०॥
मी राक्षसा अति अपवित्र । श्रीरामबाणें केलों पविर ।
मज वंदिती सुरनर । सुखी साचार केलों बाणे ॥११॥
बाणी कैंचा सुखसंभ्रम । बाणी सुखरुप श्रीराम ।
बाणी सबाह्य श्रीराम परम । सुखसंभ्रम तेणे मज ॥१२॥
शापे राक्षसतनु अधम । त्या शापाचें करोनि भस्म ।
श्रीरामे केले परम । निजात्मधाम ठाकावया ॥१३॥
जन्ममरणाचा महाधाक । घाये फोडील निःशेख ।
जिता मरता नाही दुःख । ऐसे निजसुख दिधले श्रीरामे ॥१४॥
कैंचा शाप तू येथे कोण । ऐसा श्रीरामे पुसिला प्रश्न ।
तेही विषयींचें निरुपण । समूळ कथन अवधारी ॥१५॥

अभिशापादहं घोरां प्रविष्टो राक्षसीं तनुम् ।
तुंबुरुर्नाम गंधर्वः शप्तो वैश्रवणेन वै ॥९॥
प्रसाद्यमानश्च मया सोSव्रर्वान्मां महायशाः ।
यदा दशरथी रामस्त्वां वधिष्यति संयुगे ॥१०॥
तदा प्रकृतिमापन्नोभवान्सवर्गं गमिष्यति ।
इति वैश्रवणो राजा रंभासक्तं शशाप ह ॥११॥

पूर्ववृत्तांत, शाप, उःशाप सांगून विराध गंधर्वलोकी जातो :

धनद कुबेर तू जाणसी । तेणे पाचारिलें गावयासी ।
मी तुंबरु आसक्त रंभेसीं । मद्यपानेंसीं उन्मत्त ॥१६॥
बळे मज नेलें तेथ । देखोनिया मदगर्वित ।
तू राक्षस होसी उन्मत्त । घोर वनांत अघोरा ॥१७॥
शाप ऐकता अद्भुत । मी जालो भयभीत ।
लोंटांगण घालोनि तेथ । उःशापार्थ प्रार्थिला ॥१८॥
श्रीराम सीता लक्ष्मण । वनवासा जाता जाण ।
तू करिसी सीताहरण । युद्ध दारुण होईल ॥१९॥
लागता श्रीरामाचा बाण । तू तत्काळ सांडिसी प्राण ।
तेव्हा जावोनि शापबंधन । निजात्मभुवन पावसी ॥१२०॥
ऐसी उःशापाची निजकथा । ते आजि जाली तत्वता ।
तुझा बाण लागता श्रीरघुनाथा । अलौकिकता सुखप्राप्ति ॥२१॥
तुझ्या बाणाची होता भेटी । अहं कोहं सोहं त्रिपुटी ।
छेदोनियां उठाउठी । स्वानंदपुष्टीं सुखी केले ॥२२॥
लागतांचि तुझा निजबाण । माझे निवटिले जन्ममरण ।
शाप बापुडे ते कोण । सुख संपूर्ण पावलों ॥२३॥
जे जाहली सुखप्राप्ती । त्यासी कधी नव्हे विकृती ।
कल्पांती नव्हेचि च्युती । ऐसी सुखप्राप्ती श्रीरामबाणें ॥२४॥
मज उःशापें गंधर्वप्राप्ती । गंधर्वदेहीं करिता वस्ती ।
मज बाधेना देहअहंकृती । ऐसी नित्यमुक्ति श्रीरामबाणें ॥२५॥

विराधोक्ति

तव प्रसादामुन्क्तोSहमभिशापात्सुदारुणात् ।
भुवनं स्वं गमिष्यामि स्वस्ति तेSस्तु महाभुज ॥१२॥
अध्यर्धयोजने तात महर्षिःसूर्यसन्निभः ।
इतो वसति धर्मात्मा शरभंगः प्रतापवान् ॥१३॥
तं शीघ्रमभिगच्छ त्वं स ते श्रेयोSभिधास्यति ॥१४॥

ऐसे बोलोनि आपण । श्रीरामासी केले नमन ।
तंव विराधासी विमान । देदीप्यमान उतरले ॥२६॥

जातेवेळी विराध श्रीरामांना शरभंग ऋषींच्या आश्रमात जाण्यास सांगतो :

राक्षसदेह सांडोनि क्षिती । विराध बैसता विमानाप्रती ।
श्रीरामाचे वसतीची स्थिती । गमनोक्ती सांगत ॥२७॥
येथोनिया अर्धयोजन । शरभंग वसे तपोधन ।
तपस्तेजें देदीप्यमान । तेथे आपण अवश्य जावे ॥२८॥
तो तुम्हा वनवासाची गती । सांगेल वनवासाची स्थिती ।
तुझेनि त्यासी निजमुक्ती । जाण निश्चिती श्रीरामा ॥२९॥

श्रीरामाचे आगमन होणार म्हणून शरभंगाने सत्यलोकाला जाण्याचे नाकारले :

इंद्र आला शरभंगापासीं । त्यासी न्यावया सत्यलोकासी ।
तो राहिलासे तुझे भेटीसी । सत्यलोकासी नवचोनी ॥१३०॥
श्रीराम दंडकारण्या आला । तेणे विराध मारिला ।
तुझा प्रताप जाणोनि भला । असे राहिला भेटीसी ॥३१॥
श्रीरामाच्या भेटीपुढें । सत्यलोक ते बापुडे ।
ऐसे ज्ञान त्यासी धडफुडें । भेटीचे चाडें तिष्ठत ॥३२॥
मज सुखी केले राक्षसासी । तैसेचि सुखी करी शरभंगासी ।
विराधें सांगोनि श्रीरामासी । पुढती तिघांसी वंदिले ॥३३॥
मग बैसोनि विमानी । प्रवेशला निजान्मभुवनीं ।
श्रीरामचरित्र देखोनी । विस्मित मनी सुरवर ॥३४॥
मग करिती जयजयकार । वर्षती सुमनांचे संभार ।
विराध वधोनि दुर्धर । श्रीरामचंद्र निजविजयी ॥३५॥
विराधाचें घोर वन । तेथे रिघो शके कोण ।
तोही तारिला विंधोनि बाण । कृपाळु पूर्ण श्रीराम ॥३६॥
एकाजनार्दना शरण । जाले विराधउद्धरण ।
पुढे शरभंगाचे दर्शन । कथा पावन अवधारा ॥३७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
। विराधवधो नाम द्वितीयोSध्यायः ॥२॥
॥ ओंव्या १३७ ॥ श्लोक १४ ॥ एवं १५१ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग