जळो अगी पडो खान । ना
1478.
जळो अगी पडो खान । नारायण भोगिता ॥१॥
ऐसी ज्याची वदे वाणी । नारायणी ते पावे ॥धृपद॥
भोजनकाळी करिता धंदा । म्हणा गोविंदा पावले ॥२॥
तुका म्हणे न लगे मोल । देवा बोल आवडती ॥३॥
अर्थ :
मी भोक्ता आहे असे म्हणणे आगीत पडून जळून जावो, दूर कोठेतरी घाणीत पडो कारण भोक्ता हा केवळ नारायणच आहे. अशी ज्याची वाणी वदत असते म्हणजे असे जो कोणी म्हणतो की नारायण सर्व भोक्ता आहे त्याचे सर्व भोग नारायणच भोगत असतो. जेवण करताना किंवा कोणताही धंदा करताना मी जे काही करतो ते सर्व गोविंदाला पावले असे म्हणा मग आपोआपच गोविंदाला ते सर्व काही प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात हरीची भक्ती करताना कोणत्याही प्रकारचे मोल द्यावे लागत नाही केवळ सर्व भोग हरीला अर्पण आहे असे म्हणा मग सर्व कर्म त्याला आपोआप अर्पण होते व तेच त्याला आवडते.
