आळी करावी ते कळते बा
1383.
आळी करावी ते कळते बाळका । बुझवावे हे का नेणा तुम्ही ॥१॥
निवाड तो तेथे असे पायापाशी । तुम्हा आम्हाविशी एकेठायी ॥धृपद॥
आणीक तो आम्ही न देखोंसे जाले । जाणावे शिणले भागलेंसे ॥२॥
तुका म्हणे तुम्हा लागते सांगावे । अंतरीचे ठावे काय नाही ॥३॥
अर्थ :
हट्ट करणे हे हट्टी बालकाचे काम आहे तुम्ही आमची आई आहात आणि आम्ही तुमचे हट्ट करणारे लेकरे आहोत त्यामुळे देवा आमचे हट्ट पूर्ण करावे हे तुम्हाला समजत नाही काय देवा ? तुमच्या आमच्या संबंधाविषयी जो काही निकाल लागणार आहे तो तुमच्या पाया जवळच लागणार आहे. देवा तुमच्या वाचून इतर कोणालाही आम्ही पाहत नाही आणि कोणाला पहावेसे वाटत देखील नाही. तुमचे हे बालक भागले आहे शिणले आहे हे तुम्ही का जाणून घेत नाही ? तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला हे सर्व सांगावे लागेल काय तुम्हाला आमच्या अंतःकरणातील भक्तीभाव माहित नाही काय ?
