चालली ते यात्रा गेली
2266.
चालली ते यात्रा गेली द्वारकेसी । करूनि स्नानासी नगरामध्ये ॥१॥
पहावया घर दुकान हुंडीचे । न दिसे हो साचे तत्क्षणी ॥२॥
सायंकाळ पडला सांपडेना कोठे । प्राणासी संकट देणे आले ॥३॥
देश दूर झाला नसे खर्ची कांही । देहपात पाही करीन आता ॥४॥
करूनि नेमासी प्राण ते द्यायासी । समीप तीर्थासी केले असे ॥५॥
ऐसा भाव देव पाहूनि त्वरित । आला हूडकीत तीर्थाजवळी ॥६॥
हुंडी कोठे आहे नरसी मेहत्याची । रुपये साठींची तिनशे वरी ॥७॥
रणछोड आहे नाम माझे पाही । रुपये ते घेई देतो तुज ॥८॥
ऐकता वचन संतोषला मनी । धरिले चरणी प्रेमभावे ॥९॥
धन्य धन्य तूंरे पाहता मजला । घेऊनि द्रव्याला आलासीरे ॥१०॥
देउनी रुपये दर्शन दाविले । जगविख्यात केले मेहत्यासी ॥११॥
करूनि यात्रेसी जुनागडा आला । भावे हो वंदिला मेहता तो ॥१२॥
म्हणे तुजयोगे झाले मज पाही । दर्शन ते ठायी रणछोडा ॥१३॥
ऐकतांच वाणी प्रेम मनी भरे । धरिले चरण त्वरे तयाचे हो ॥१४॥
नामा ऐसा देव ऋणी भक्ता । पुरवित होता सर्व ठायी ॥१५॥
