संत बोधलेबावा
2255.
संत बोधलेबावा
धामणगांवामध्ये माणकोजी बोधला । आवडे देवाला प्राणाहुनी ॥१॥
विठोबाचे नामी रंगले हे मन । मिळाले जीवन सिंधुमाजी ॥२॥
आवडीने केला त्याणे अंगिकार । कृपेचा सागर पांडुरंग ॥३॥
गुणदोष त्याचे न पाहे चक्रपाणी । बोलिले पुराणी व्यासादिक ॥४॥
सत्य हेंचि असे सांगतो प्रमाण । भावे करा ध्यान विठोबाचे ॥५॥
तैसा बोधराज प्रेमळ हा भक्त । भावे आठवीत देवाजीसी ॥६॥
रात्री शेतामाजी करीत रक्षण । गात नारायण आवडीने ॥७॥
राळरास त्याच्या सासर्याचा गांव । त्याची याची सींव एक असे ॥८॥
तयाचिया घरी हांसी कुणबीण । करीत रक्षण शेतामाजी ॥९॥
बोधराज भावे आळवीत देव । हांसीचिया जीवा सुख वाटे ॥१०॥
विठोबाचे नामी वेधलेंसे मन । आली ती शरण बोध राजा ॥११॥
म्हणे बापा मज द्यावा उपदेश । तोडावा हा फांस संसाराचा ॥१२॥
हांसीचा तो भाव जाणुनी पवित्र । सांगितला मंत्न त्रिअक्षरी ॥१३॥
विठ्ठल हे नाम अहोरन ध्याई । मग तुला नाही भय चिंता ॥१४॥
हरिदिनि व्रत करी एकादशी । जागर कथेसी करीत जावा ॥१५॥
हांसीचिया मना झाला तो आनंद । भावे हा गोविंद आळवी ती ॥१६॥
चालवीत व्रत नेम एकादशी । जागर कथेसी धामणगांवी ॥१७॥
बोधराज भक्त भाविक प्रेमळ । कीर्तन रसाळ आवडीचे ॥१८॥
श्रवणासी ते येती गांवीचे ते लोक । वाटतसे सुख तयालागी ॥१९॥
भवर गांवीचे कीर्तनास आले । त्यांत काय झाले एक एका ॥२०॥
मार्गी चालतांना सर्पदंश झाला । तेचि वेळा गेला प्राण त्याचा ॥२१॥
सांगात्यांनी तेव्हा विचार करुनी । आणियेला त्वरे कथेमाजी ॥२२॥
बैसविले त्यासी भिंतीसी टेकुनी । करिती श्रव्ण हरिकथा ॥२३॥
नामामृत भावे वाढीत बोधला । घ्यारे सर्वत्नांला सांगतसे ॥२४॥
करावी पुरती तुम्ही सांठवण । जगी हे भरूनि उरलेंसे ॥२५॥
स्वर्ग मृत्युलोकी असे तो पाताळी । आणिला जवळी पुंडलीके ॥२६॥
समपदी कटी ठेऊनिया कर । उभे विटेवर राहिले ते ॥२७॥
तयाची हे गोडी बोधल्या संपडली । तेचि म्या वाढिली तुम्हांपुढे ॥२८॥
श्रवणद्वारे तुम्ही जेवा सावकाशा । होईल उल्हास माझे जीवा ॥२९॥
नामघोष तुम्ही वाजवावी टाळी । होईल हे होळी पातकांची ॥३०॥
श्रोते बोलताता तेव्हा बोधल्यास । करा उपदेश या गृहस्थासी ॥३१॥
वाजवीना टाळी करीना भोजन । कांहो याने मौन्य धरियेले ॥३२॥
बोधराज करी त्यासी विनवणी । बोला चक्रपाणी आवडीने ॥३३॥
कथेलागी तेव्हा येती आनंदाने । कांपे तया भेणे कळीकाळ ॥३४॥
सांडूनि अहंता यावे कीर्तनासी । तेणे हृषिकेशी संतोषतो ॥३५॥
म्हणेनिया कोणी न करावा आळस । बोलावा उल्हासे पांडुरंग ॥३६॥
ऐकोनिया ऐसे तेव्हा नारायण । परतविला प्राण तेचि वेळा ॥३७॥
कथेमाजी जे का बैसविले प्रेत । ते आनंदे नाचत नामघोषे ॥६८॥
समजले तेव्हा श्रोत्या त्या सकळा । महिमा आगळा हरिनामाचा ॥३९॥
बोधल्यासी तेव्हा श्रुत झाली मात । उठविले प्रेत पांडुरंगे ॥४०॥
प्रेमअश्रु बोधल्याचे डोळा । पाळिसी तू लळा पांडुरंगा ॥४१॥
जाणूनि अंतर होसी साहाकारी । लज्जा त्वा श्रीहरि राखियेली ॥४२॥
बाळकाचे बोल मातेसी आवड । पुरवीत कोड आनंदाने ॥४३॥
समजले मज आता विठाबाई । काय उतराई होऊ तुज ॥४४॥
बोधल्यासी बोले विठोबा सांवळा । आवडी प्रेमला तुई मज ॥४५॥
आनंदे जागर होत एकादशी । किर्तनांत हांसी होती तेव्हा ॥४६॥
हांसीचे ते धनी विभक्त ते झाले । विकरा घातिले हांसीलागी ॥४७॥
हांसीलागी तेव्हा श्रुत झाली वार्ता । खेद करी चित्ता आपुलिया ॥४८॥
काय जन्मांतर कैसे हे प्राक्तन । स्वामीचे चरण अंतरती ॥४९॥
बोधराज माझी पांडुरंग मूर्ती । वाटेल ही खंती त्याचि मज ॥५०॥
होऊनिया श्रमी धामणगांवा गेली । वार्ता सांगितली बोधराजा ॥५१॥
बाबा तुम्ही आता द्यावे मज मोल । श्रुत तेव्हा केले ममताईसी ॥५२॥
जाणूनि अंतर राळेरास आला । मेहुण्यास बोले बोधराज ॥५३॥
हंसिसी विकिता म्हणूनि ऐकिले । सांगा इचे मोल काय आता ॥५४॥
येरू म्हणे हांसी देऊ आणिकासी । देऊ ना तुम्हासी बोलू नका ॥५५॥
हांसीलागी तेव्हा श्रुत झाली वार्ता । खेद करी चित्ता आपुलिया ॥५६॥
बोधराज तेव्हा श्रुत झाली वार्ता । सांगतो देवासी नेतील तुजा ॥५७॥
सांगूनिया ऐसे धामणगांवा गेले । तो हांसीलागी आले गिर्हाईक ॥५८॥
पंचवीस होन केले तिचे मोल । लिहून घेतले खरिदखत ॥५९॥
द्रव्य घातियेले तयाच्या पदरांत । तो आले अकस्मात् पांडुरंग ॥६०॥
हांसे तुललागी बोलावी बोधला । शब्द हा ऐकिला सर्वत्रांनी ॥६१॥
हांसी आणि मूल तेव्हा जाले गुप्त । केला हा वृत्तांत पांडुरंगे ॥६२॥
बोलाविता हांसी न दिसे तयाला । कज्जा तो लागला दोघांजणा ॥६३॥
भांडत हे गेले तेव्हा दिवाणांत । सांगती वृत्तांत दोघेज्ण ॥६४॥
फजीत होऊनि तेव्हा दरबारी । दिल्हे ते माघारी द्रव्य त्याचे ॥६५॥
संताचे नायके नाडला तो खर । दोहींकडे थार नाही त्यासी ॥६६॥
संतांसी शरण असे दास नामा । अखंडित प्रेमा त्याचे नामी ॥६७॥
