न लगती मज शब्दब्रम्ह
3080.
न लगती मज शब्दब्रम्हज्ञान । तुझिया दर्शनावाचूनिया ॥१॥
म्हणऊनि तुझे करितो चिंतन । नावडे वचन आणिकाचे ॥धृपद॥
काय ते महत्वे करावी मान्यता । तुज न देखता पांडुरंगा ॥२॥
तुका म्हणे तुज भेटल्यावाचूनि । न राहे त्याहून होइन वेडा ॥३॥
अर्थ :
देवा मला तुझ्या दर्शनावाचून शाब्दिक ब्रम्हज्ञान लागत नाही. म्हणूनच तर मी तुझे सारखे चिंतन करतो मला तुझ्या चिंतनावाचून इतर कोणाचेही बोलणे व कोणतेही बोलणे आवडत नाही. हे देवा पाडूरंगा अरे मला तुझे दर्शनच जर झाले नाही तर मग मला लोकांमध्ये कितीही मान्यता असली किंवा कितीही महत्व असले तरी ती मान्यता काय करावी ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझे दर्शन झाल्यावाचून मी तर काही राहणार नाही, राहणार नाही हे सोड पण तुझे जर मला दर्शन झाले नाही तर मी वेडाच होईन.
