वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ४०. अंतिम महासंग्राम

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088143 · अभंग क्र. ४०

40.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय चाळिसावा ॥
लक्ष्मणाला सावध केले

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

इंद्रजित वधाने वानर सैन्याला व देवादिकांना हर्ष :

रणी पाडूनि इंद्रजित शूर । विजयी झाला सौ‍मित्र ।
हर्षे उपरमती वानर । जयजयकार करोनी ॥१॥
इंद्रजित पडतांचि रणपाडीं । तेचि काळी तेचि घडी ।
बिभीषणा हर्षकोडी । जोडिला जोडी आल्हाद ॥२॥

पतितं रावणिं ज्ञात्वा सा राक्षसमहाचमूः ।
वध्यमाना प्रदुद्राव हरिभिर्जितकाशिभिः ॥१॥
केचिल्लंकामभिमुखं प्रविष्टा वानरार्दिताः ।
समुद्रे पतिताः केचित्केचिच्छैलान्समाश्रिताः ॥२॥
हतमिन्द्रजितं दृष्ट्वा शयानं धरणीतले ।
जहर्ष शक्रो भगवान्सह सर्वैर्महर्षिभिः ॥३॥
जगाम निहते तस्मिन्‍राक्षसे पापकर्मणि ॥४॥

रणी पडता इंद्रजित वीर । राक्षसांचे महाभार ।
वानरी त्रासितां अपार । निशाचर पै पळती ॥३॥
धाके धाके राक्षसकोडी । धरिली समुद्राची थडी ।
एक पळाले लंकापहाडीं । पर्वती दडी देती एक ॥४॥
पडिल्या देखोनि इंद्रजितासी । अति उल्हास पै इंद्रासी ।
उल्हास सुरनरसिद्धांसी । आल्हादेंसी नाचती ॥५॥
मारिता इंद्रजिता महापाप्यासी । परम सूख सदाशिवासीं ।
अति उल्लास ब्रह्मयासीं । वंशज दुष्टासी मारिता ॥६॥
दश दिशा विधूमवंता । सुप्रसन्न उगवे सविता ।
निर्मळ जळे वाहती सरिता । सुख समस्ता सौ‍मित्रे ॥७॥
सौ‍मित्राची आंगवण । स्वये वानिती शिवगण ।
स्वर्गी वानिती सुरगण । वानरगण भूतळीं ॥८॥
रणी लाहोनि निजविजया । उभवोनि पुच्छाचिया गुढिया ।
वानर नाचती सुखोर्मिया । उभवोनि बाह्या रामनामे ॥९॥
रामनामगीत गात । विजयमुखें नृत्यान्वित ।
वानर स्वानंदे डुल्लत । रणी गर्जत हरिनामे ॥१०॥
रणी विजयाचा उत्साहो । देखोनि वानरांचा लवलाहो ।
सौ‍मित्र महाबाहो । काय स्वयमेव बोलत ॥११॥

रुधिरक्लिन्नगात्रस्तु लक्ष्मणः शुभलक्षणः ।
बभूव हृष्टस्तं हत्वा शत्रुजेतारमाहवे ॥५॥
ततः स शरभं वीरं जांबवंतई च वीर्यवान् ।
संनिपत्य महातेजास्तांश्च सर्वान्वनौकसः ॥६॥

व्यथित लक्ष्मणाचा आदेश :

लक्ष्मणाचे शुभ लक्षण । विकळ जाहलिया प्राण ।
न सांडून रणांगण । शत्रु संपूर्ण निर्दाळिला ॥१२॥
अवघे ऐका सावचित्त । रामप्रतापें रणाआंत ।
म्या मारिला इंद्रजित । स्वये सांगत सौ‍मित्र ॥१३॥
इंद्रजित मारिला शौर्यवृत्तीं । ते तंव नव्हे माझी शक्ती ।
श्रीरामप्रतापयुक्ती । स्मरणानुवृत्तीं निर्दाळिला ॥१४॥
श्रीराम माझे बळाचें बळ । श्रीरामबळे शौर्यशीळ ।
इंद्रजिताचे शिरकमळ । छेदिलें समूळ श्रीरामसत्वें ॥१५॥
घालोनि श्रीरामाची शपत । म्या मारिला इंद्रजित ।
ऐसे लक्ष्मण सांगत । चांचरी जात विकळत्वें ॥१६॥
रणी भिडतां निशाचरा । बाणी खिळलें सौ‍मित्रा ।
सर्वांगी रुधिरधारा । तेणे शरीरा विकळत्व ॥१७॥
तिन्ही बाण रुतले कपाळीं । ते भेदले ब्रह्मांडमूळी ।
बाणी खिळिल्या रोमावळी । तेणे महाबळी विकळांग ॥१८॥
शरभ जांबवंत कपिगण । युद्धी निवारोनि जाण ।
पाचारोनि बिभीषण । काय लक्ष्मण सांगत ॥१९॥
मी घायवट सर्व शरीरी । सर्वांग निथळे रुधिरी ।
प्राणांत मज देखिल्यावरी । राम पोटी सुरी घालील ॥२०॥
यालागी पूर्वसूचनेवरी । सुग्रीवसंज्ञानुकारीं ।
शस्त्रे काढवावीं दूरी । पुढे वानरी जाऊनी ॥२१॥
संतोषावया श्रीरामचंद्र । देवोनि इंद्रजिताचे शिर ।
पुढे धाडावे वानर । अति चतुर बोलके ॥२२॥
वानावी माझी वाढीव । करावी माझी भाटीव ।
संतोषलिया राघव । सस्त्रें सुग्रीव काढील ॥२३॥

लक्ष्मणाला मूर्च्छा :

हे अंतीचे माझे वचन । तुम्ही करावे सावधान ।
ऐसे बोलता लक्ष्मण । मूर्च्छापन्न स्वये पडला ॥२४॥
झांकले दोन्ही नयन । खुंटले वदते वदन ।
ते देखोनिया बिभीषण । वानरगण अति दुःखी ॥२५॥
सखा अंतरला लक्ष्मण । वानर करिती शंखस्फुरण ।
दुःखीं फुटे बिभीषण । अवघे जण लोळती ॥२६॥
कोण कोणा आश्वासील । कोण कोणा संबोखील ।
अवघ्या समान कळवळ । अति तळमळ वानरा ॥२७॥
तंव बोलिला जांबवंत । साधिला सौ‍मित्रे कार्यार्थ ।
मध्ये ओढवला अति अनर्थ । गडबडित अति दुःखी ॥२८॥

हनुमंताचा शोक, आज्ञा :

अवघ्या सांगे हनुमंत । सौ‍मित आज्ञा करा समस्त ।
यासी घेवोनि जावे तेंथ । श्रीरघुनाथ वंदावया ॥२९॥
मी तंव न ये रामापासी । मज निरविलें सौ‍मित्रासीं ।
रणी मारवोनि त्यासी । काय रामासी मुख दावू ॥३०॥
बळी देवोनि लक्ष्मणासी । रणी मारिले इंद्रजितासी ।
पूर्ण जहालों अपेशी । काय रामासी मुख दावूं ॥३१॥
बळीं दिधले सौ‍मित्रासी । हे यश मिरवूं अति श्लाघ्यतेसीं ।
अपेशकाळिमा अली मुखासी । काय रामासी मुख दावूं ॥३२॥
मरों जाता न ये मरण । धिक् चिरंजीवपण ।
मज न जाळी हुताशन । समुद्र मग्न मज न करी ॥३३॥
मरण न ये पर्वतपातें । न चले शस्त्राचा आघात ।
विष घेतल्या न ये अंत अपेशवंत मी एक ॥३४॥
अपेशे गांजिलों मी मोठां । पडल्या पडल्या येथे करंटा ।
वाळोनि होईन खराटा । परी त्या वाटा मी न ये ॥३५॥
तंव बोलिला बिभीषण । भाक देवोनि आपण ।
आणून मारविला लक्ष्मण । अपेशी पूर्ण मी जालो ॥३६॥
अपेश बैसलें माझे माथा । काही चालेना पै आता ।
केंवी मुख दावूं रघुनाथा । मरणावस्था मज आली ॥३७॥
अपेश बैसलें दारुण । वांचल्याचे फळ कोण ।
अवश्य सांडीन मी प्राण । बिभीषण अनुवादे ॥३८॥
ऐकोनि क्षोभला हनुमंत । येथे मतरां शरणागत ।
प्राण सांडील रघुनाथ । ऐसा अनर्थ न करावा ॥३९॥
जाहल्या सौ‍मित्राचा घात । वांचो न शके रघुनाथ ।
मरतांचि शरणागत । सद्यःप्राणांत श्रीरामा ॥४०॥
लक्ष्मणाचे आज्ञापन । आम्ही करु अवघे जण ।
मीही येतो गा आपण । रघुनंदन वंदावया ॥४१॥
देऊनि इंद्रजिताचे शिर । गुढिया उभवोनि सत्वर ।
पुढे धाडावे वानर । अति चतुर ते कोण ॥४२॥
तंव बोलिला बिभीषण । इंद्रजिताचे शिर घेऊन ।
पुढे जाईन मी आपण । रघुनंदन उल्लासा ॥४३॥
बिभीषण निशाचर । घेवोनि इंद्रजितांचें शिर ।
गुढिया उभवोनि वानर । अति सत्वर निघाले ॥४४॥
मागील जे का वानरवीर । उचलोनियां सौ‍मित्र ।
अंगीचा सलों न देता शर । अति अरुवार चालती ॥४५॥

अथाचचक्षे धर्मात्मा राघवाय बिभीषणः ।
छिन्नमिंद्रजितः शीर्ष लक्ष्मणेन महात्मना ॥७॥
निवेदयित्वा रामाय तस्थौ हृष्टो बिभीषण ॥८॥

श्रीरामांपुढे इंद्रजिताचे शिर ठेवून बिभीषणाचे कथन :

पुढे येवोनि बिभीषण । वंदूनि श्रीरामाचे चरण ।
लक्ष्मणाचे रणांगण । सांगे आपण ते ऐका ॥४६॥
सप्तावरणें दुर्धर वाट । करोनि सौ‍मित्रे सपाट ।
उघडोनिया यज्ञवाट । झाला प्रविष्ट होमस्थानी ॥४७॥
इंद्रजित होम करित । कुंडी निगाला साश्व रथ ।
उडी घालोनि हनुमंत । इंद्रजित आंसुडिला ॥४८॥
कर्म न होता समाप्त । उठविला इंद्रजित ।
बिभीषण घेवोनि आला येथ । त्या माझा घात करु धांवे ॥४९॥
पाठीसी घालोनि शरणागत । सौ‍मित्र आला युद्धाआंत ।
त्यासी देखोनि इंद्रजित । साशंकित स्वये झाला ॥५०॥
विवर सांडोनिया कपटी । गेला मेघाचिये पृष्ठीं ।
मग हनुमंते उठाउठी । सौ‍मित्र जगजेठी तेथे नेला ॥५१॥
सौ‍मित्र निधडा वीर शूर । अचुक संधानी दुर्धर ।
वारू सारथी रहंवर । बाणी सत्वर छेदिले ॥५२॥
बाणी बाणनिवारण । शत्रीं शस्त्रनिराकरण ।
दोघे योद्धे विचक्षण । रण प्रवीण संग्रामी ॥५३॥
अचुक सौ‍मित्राचा हात । उभय भुजां करोनि घात ।
सवेंचि केला शिरःपात । ते शिर येथ आणिलेंसे ॥५४॥
बिभीषण अति चतुर । आणून इंद्रजिताचे शिर ।
ठेविले श्रीरामासमोर । देखोनि वानर बुजाले ॥५५॥
धन्य सौ‍मित्र आतुर्बळी । बाण भेदले कपाळीं ।
हेमपिच्छाची मुंडावळी । शिरासीं बांधिली रणरंगी ॥५६॥
मिशा मुर्डिवा विशाळा । दाढा विका विक्राळा ।
बाण भेदले कपाळा । कपाळीं टिळा गोरोचनाचा ॥५७॥
देखोनि हरिखला राघव । बिभीषणसंज्ञा सुग्रीव ।
शस्त्रसामग्री नेली सर्व । अतर्क्य लाघवविन्यासें ॥५८॥
लक्ष्मणाचे बळ दुर्धर । देखोनि इंद्रजिताचे शिर ।
ऐकोनि बिभीषणउत्तर । हर्षे रघुवीर अनुवादे ॥५९॥

बिभीषणवचः श्रुत्वा हर्षव्याकुललोचनः ।
बिभीषणं पुरस्कृत्य हनूमंतं च राघवः ॥९॥
जांबवंतं ससुग्रीवं सभाज्य च वनौकसः ।
शूरमिक्ष्वाकुशार्दूलं समाश्वासयतानुजम् ॥१०॥
रामचंद्रसमो भ्राता लक्ष्मणं शुभलक्ष्णम् ।
उपवेश्य तमुत्संगे परिष्वज्य सुपीडितम् ॥११॥
पीडितं सायकैर्दृष्ट्वा दुःखितो राघवस्तदा ।
दुःखहर्षयुतो रामः स मूर्च्छित इवाबभौ ॥१२॥

लक्ष्मणाची स्थिती ऐकून श्रीरामांना मूर्च्छा :

देखोनि इंद्रजिताचे शिर । ऐकोनि बिभीषण‍उत्तर ।
सौ‍मित्रप्रताप अति गंभीर । तेणे रघुवीर हरिखला ॥६०॥
लक्ष्मण योद्धा अति गहन । तेणे हरिखला रघुनंदन ।
वर्षे स्वानंदजीवन । संतप्त जन निववावया ॥६१॥
बाप कृपाळु रघुनाथा । बिभीषण हनुमान जांबवंता ।
अनुक्रमे आलिंगितां । वानरा समस्ता आल्हाद ॥६२॥
अवघी केला नमस्कार । अद्यापि का न ये सौ‍मित्र ।
ऐसे पुसतां श्रीरामचंद्र । झाले चरित्र ते एके ॥६३॥
बाणी जर्जर सर्व शरीरी । सौ‍मित्र उचलोनियां वानरी ।
घालिता श्रीरामाचे मांडीवरी । नाही शरीरी चेतना ॥६४॥
इंद्र वंदी ज्याचे बळासी । ऐसिया सबळ सौ‍मित्रासी ।
बाणी खिळिले सर्वांगांसी । पाहे चौपासी श्रीराम ॥६५॥
तीन बाण हे कपाळीं । रुतले ब्रह्मांडीच्या मूळी ।
बाणी भेदल्या रोमावळी । बाणजाळी खिळिलासे ॥६६॥
रणी विंधिता शरधारीं । रिती जागा अंगावरी ।
नाही उरली तिळभरी । शरीं शरीरी खिळिला ॥६७॥
इंद्रजितमरणें सुखोद्‍भूत । सौ‍मित्रदुःखें दुःखित ।
रघुनाथ ऐसा हर्षशोकान्वित । पडे मूर्च्छित श्रीराम ॥६८॥
श्रीराम पडता मूर्च्छापन्न । गजबजिला बिभीषण ।
हडबडिले वानरगण । करिती रुदन अति दुःखे ॥६९॥
दोघे पढियंते पूर्ण । येरयेरा जीव प्राण ।
सौ‍मित्रदुःखें रघुनंदन । झणी हा प्राण सांडील ॥७०॥
मूर्च्छित पडता रघुनंदन । सुग्रीव आणि बिभीषण ।
मिळोनिया वानरगण । करीती रुदन अति दुःखे ॥७१॥
एक निमाला रणरंगी । दुजा निमतो तयालागीं ।
काय करावे या प्रसंगी । वानरांअंतरीं अति चिंता ॥७२॥
सौ‍मित्रातें आलिंगून । श्रीराम पडिला मूर्च्छापन्न ।
सवेंच चेतना लाहोन । सावाधान स्वये जाला ॥७३॥

उपलभ्य ततः संज्ञां लक्ष्मणं समुदैक्षत ।
मूर्घ्नि चैनमुपाघ्राय रामः शूरमुपागतम् ॥१३॥
कृतं परमकल्याणं कर्मेदं दुष्करं त्वया ।
अद्य मन्ये हते पुत्रे रावणं निहतं युधि ॥१४॥
निरमित्रः कृतोस्म्यद्य निर्यास्यति हि रावणः ।
बलव्यूहेन महता श्रुत्वा पुत्रं निपातितम् ॥१५॥
त्वया लक्ष्मण नाथेन सीता च पृथिवी च मे ।
न दुष्प्रापा हते तस्मिन्शक्रजेतरि चाहवे ॥१६॥

शुद्धीवर आल्यावर श्रीरामांचा शोक व प्राणत्यागाची तयारी :

संज्ञा पावोनि रघुनंदन । घायीं जर्जरित लक्ष्मण ।
देखोनिया विगतप्राण । करी रुदन अति दुःखे ॥७४॥
निकुंबळे जावोनि आपण । इंद्रजित मारोनि दिधला प्राण ।
ते कल्याण तेंचि अकल्याण । मज तुजवीण सौ‍मित्रा ॥७५॥
ऐकोनि इंद्रजिताचे मरण । निर्वाणयुद्धा येईल रावण ।
त्यासी कोणे करावे रण । तुजवीण सौ‍मित्रा ॥७६॥
बारा वर्षे निराहारी । राहोनिया ब्रह्मचारी ।
मारुन दिधला माझा वैरी । तरी मजवरी का रुसलासी ॥७७॥
बारा वर्षे वनवासी । म्या नाही पुसिले आहारासी ।
तेणे मजवरी रुसलासी । लागोनि पायांसी बुझावूं ॥७८॥
इंद्रजितासी उठाउठी । रणी केली त्वा संवसाठी ।
तुजवीण जगजेठी । मी ये सृष्टी वांचेंना ॥७९॥
निकुंबळे धाडिला एकला । तेणे धरिला त्वा अबोला ।
बंधुस्नेहें आक्रोशिला । आक्रंदला श्रीराम ॥८०॥
दुर्धर इंद्रजिताचे मरण । ते त्वा साधिले करोनि रण ।
रणांगणी दिधला प्राण । ते अकल्याण मज केले ॥८१॥
करोनि इंद्रजिताच्या घाता । तवां निर्मुक्त केली सीता ।
वसुधा वश्य केली माझ्या हाता । सत्य तत्वातां सुबंधो ॥८२॥
सीता सुंदर महासती । कोणे भोगावी वसुमती ।
तुजवीण ऊर्मिलापती । प्राण निश्चिती त्यागीन ॥८३॥
अनंत अपराध मजपाशीं । तेणे मजवरी रुसलासी ।
चरण झाडिन मी केंशी । उकसाबुकसीं स्फुंदत ॥८४॥
धांव पावगा सौ‍मित्रा । साद से का सहोदरा ।
माझिया दुःखा दुर्धरा । महावीरा निवारी ॥८५॥
केउता गेलासी सुबंधु । अद्यापि का ने देसी सादु ।
करिता श्रीरामासी खेदु । दुःखबाधु समग्रां ॥८६॥
तुजवीण मी अनाथ । तुजवीण मी हताहत ।
तुजवीण निजजीवित । त्यागीन निश्चित सौ‍मित्रा ॥८७॥
तुजवीन मी प्रभाहीन । तुजवीण मी हीन दीन ।
तुजलागीं त्यजीन प्राण । सत्य जाण सौ‍मित्रा ॥८८॥
राया दशरथाची आण । तुजवीण मी त्यागीन प्राण ।
ऐसे बोलोनि रघुनंदन । घातले आसन प्राणांता ॥८९॥
देवोनि सौ‍मित्रा आलिंगन । चुंबोनियां त्याचे वदन ।
श्रीरामे त्यागावया प्राण । घातले आसन प्राणांता ॥८९॥
देवोनि सौ‍मित्रा आलिंगन । चुंबोनियां त्याचे वदन ।
श्रीरामे त्यागावया प्राण घातले आसन प्राणांत ॥९०॥

हनुमंताची गर्जना :

ते देखोनि हनुमंत । खवळला काळकृतांत ।
स्वये येवोनि गर्जत । काय सांगत श्रीरामा ॥९१॥
मी सेवक असता जाण । कोण मारुं शकेल लक्ष्मण ।
तू का वृथा त्यजिसी प्राण । आंगवण पाहे माझी ॥९२॥
यमें नेलिया लक्ष्मणासी । धुळी मेळवीन यमासी ।
शीक लावीन कळिकाळासीं । सौ‍मित्रासी नेतांचि ॥९३॥
इंद्र चंद्र वरुण कुबेर । मुख्य करोनि दिवाकर ।
त्यांचेनि न मारवे सौ‍मित्र । मारिल्या समग्र निर्दळीन ॥९४॥
सौ‍मित्र नेलिया कैलासासीं । तेथून मी आणींन त्यासी ।
जरी नेला वैकुंठासीं । ख्याती करीन ते ऐका ॥९५॥
उभे करोनिया भगवंतासी । झाडा घेईन वैकुंठासीं ।
ओळखोनि सौ‍मित्रासी । तुझा तुजपासी आणीन ॥९६॥
नेलिया क्षीरसागरासीं । झाडा घेईंन शेषापासीं ।
उलथोनि नारायणासी । सौ‍मित्रासी आणीन ॥९७॥
सौ‍मित्र शेषावतार बळी । अडकल्या नारायणातळीं ।
तोही उलथोनि तत्काळी । तुझा तुजजवळी आणीन ॥९८॥
पृथ्वी मिनली पृथ्वीसी । आप मिनले आपासीं ।
तेज मिनले तेजासीं । प्राण वाय़ूसी मीनला ॥९९॥
आकाश मिनले आकाशासीं । चैतन्य मिनले चैतन्यासीं ।
कैंचा सौ‍मित्र आणिसी । मूर्ख म्हणसी वानर ॥१००॥
ऐसाही आणीन लक्ष्मण । तरी मी तुझा सेवक जाण ।
तुझे करिता नामस्मरण । अटक कोण मजलागी ॥१॥
तुझ्या नामाचेनि बळे । कळिकाळाची शक्ति गळे ।
संसार आपभये पळे । मोक्ष मावळे मिथ्यात्वे ॥२॥
नामस्मरण परम धर्म । नाम निर्दळी कर्माकर्म ।
नमा केवळ परब्रह्म । पुरुषोत्तमहरिकीर्ती ॥३॥
दाटुगें तुझे नामस्मरण । नामबळें लक्ष्मण ।
तुझा तुजपासी आणीन । तेंही लक्ष्मण अवधारी ॥४॥
पृथ्वी दमिली पृथूनीं । मीही दमीन मेदीनी ।
सौ‍मित्राचें शरीर अवरी । जंव आणोनि मज अर्पी ॥५॥
आर्पी आपत्व तंव शोधीन । सौ‍मित्रा निजजीवन ।
आणोनियां गा आपण । मदर्प्ण जंव करी ॥६॥
निजतेजाच्या आवेशी । तेज दमीन तेजासीं ।
सौ‍मित्राच्या निजतेजासी । जंव मजपासीं ते अर्पी ॥७॥
माझा निजपिता पवन । त्याचेंही करीन शोषण ।
लक्ष्मणाचा निजप्राण । जंव आणून मज अर्पीं ॥८॥
दंडणें न लगे आकाशासी । सहज प्रवेश आकाशी ।
ध्यानी धरोनि चैतन्यासी । आणीन जीवकळा चेतना ॥९॥
जावया देहींचा जडपणा । तेज निजप्राणा चेतवी ॥११०॥
धरोनि चेतनेचा हात । प्राण प्रवेश देहाआंत ।
तंव तंव देही देहवंत । सावचित्त होय जीव ॥११॥

सुषेणाचे आगमन :

वांचवावया लक्ष्मण । सांडून स्थूळ लिंग कारण ।
हनुमान करु पाहे उड्डाण । तेंव सुषेण तेथे आला ॥१२॥
हनुमंता तू परोपकारी । आणिला होता द्रोणागिरी ।
दिव्यौषधी तयावरी । त्या म्या गृहीं संग्रहिल्या ॥१३॥
पर्वतावेगळ्या औषधी जाण । न राहती अर्ध क्षण ।
घालिता श्रीरामपादकण । ओषधी संपूर्ण थांबल्या ॥१४॥
त्यांचा रस देता जाण । सावध होईल लक्ष्मण ।
ऐसे बोलता सुषेण । रघुनंदन सुखावे ॥१५॥
ऐकता हनुमंताची कथा । परम सुख रघुनाथा ।
आलिंगिला जीवापरता । उल्लासतां स्वानंदे ॥१६॥

स तं भ्रातरमश्वास्य परिष्वज्य च राघवः ।
रामः सुषेण मुदितः समाभाष्येदमब्रवीत् ॥१७॥
सशल्योऽयं महाप्राज्ञ सौ‍मित्रिर्मित्रनंदनः ।
यथा भवति निःशल्यस्तथा त्वं कर्तुमर्हसि ॥१८॥
विशल्यकरणी नाम वने हिमवतः शुभा ।
लक्ष्मणाय ददौ नस्यं सुषेणः परमौषधिम् ॥१९॥
स तस्या गंधामाघ्राय विशल्यः समपद्यत ।
तथा निर्वेदनश्चैव संरुढव्रण एव च ॥२०॥

लक्ष्मण व्हावया सावधान । श्रीरामे जे केले रुदन ।
ऐसे नव्हे ते अमृतपान । स्वानंदजीवन संतप्ता ॥१७॥
अश्रु तेंचि अमृतपन । आलिंगन तेंचि विशल्यकरण ।
करसंस्पर्शें करी निर्व्रण । कृपाळु पूर्ण श्रीराम ॥१८॥
निजभक्तांची जे जे व्यथा । नानापरींच्या नानावस्था ।
निवारण श्रीरघुनाथा । पुढील कथा अवधारा ॥१९॥

श्रीरामांच्या आज्ञेने सुषेणाच्या दिव्यौषधीने लक्ष्मण सावध होतो :

सावध व्हावया लक्ष्मण । रामे पाचारोनि सुषेण ।
शल्या विशल्या ओषधी जाण । देववई आपण साक्षेपे ॥१२०॥
शल्या शल्य फेडी संपूर्ण । विशल्या घाय बुजी आपण ।
अंगीचे हरपती व्रण । ते सुवर्ण जाण दिव्यौषधी ॥२१॥
अंगीचें कानपोनि व्रण । सुवर्णा करी सुवर्णवर्ण ।
ऐशिया दिव्यौषधी जाण । दे सुषेण सौ‍मित्रा ॥२२॥
शल्या विशल्या देता जाण । शल्यें विरालीं संपूर्ण ।
हर्षे निर्भर अंतःकरण । सावध होय सौ‍मित्र ॥२३॥
ओषधी देता सुवर्ण । कानपोनि अंगीचे व्रण ।
शरीर जाले सुवर्णवर्ण । उठला लक्ष्मण स्वानंदे ॥२४॥
पूर्विल्यापेक्षा जाण । शक्ति पावोनि शतगुण ।
साटोपे उठिला लक्ष्मण । रणी रावण दंडावया ॥२५॥

बिभीषणमुखानां च सुहृदां राघवाज्ञया ।
तामोषधि महाबाहुः सुषेणः प्रददौ तदा ॥२१॥

लक्ष्मण जालिया सावधान । बिभीषण सुग्रीव रघुनंदन ।
पाचारोनि सुषेण । सांगे आपण ते ऐका ॥२६॥
लक्ष्मणासवें वानर वीर । घायीं जाले अति जर्जर ।
ओषधी देवोनि सत्वर । करी समग्र सावध ॥२७॥
ऐसे सांगता रघुवीर । असंख्यात कपि वानर ।
सुषेणे अपरिमित ऋक्षवीर । केले समग्र सावध ॥२८॥
अपरिमित ऋक्षवीर । असंक्यात कपि वानर ।
बिभीषणाचे निशाचर । घायीं जर्जर अमित ॥२९॥
धन्य सुषेण वैद्यरावो । वेंचून ओषधींचा संग्रहो ।
अंगी व्रण न दिसे घावो । सकळ समुदावो सुखी केला ॥१३०॥
गेला क्लेशश्रमेंसी स्वेद । गेली शल्यबाधा गेला खेद ।
सकळ वीरांसी आल्हाद । परमानंद श्रीरामे ॥३१॥
पूर्विल्या बळापेक्षां जाण । प्रताप आला पै चौगुण ।
उपमिती आंगवण । गडगर्जन हरिनामें ॥३२॥
रामनामाचा गजर । वानरी केला भुभःकार ।
संतोषला श्रीरामचंद्र । विशल्य वीर देखोनी ॥३३॥
जैसे अमरां अमृतपान । तैशा वानरा ओषधी जाण ।
करितांचि अवघ्राण । सुखसंपन्न स्वानंदे ॥३४॥
सुखी झाला लक्ष्मण । सुखी झाला बिभीषण ।
सुखी झाले वानरगण । सुखसंपन्न सुग्रीव ॥३५॥
सुखी देखोनि सौ‍मित्र । सुखावला श्रीरामचंद्र ।
तेणे संतोषें वानर । हर्षे निर्भर नाचती ॥३६॥
इंद्रजित मारोनि दुर्धर । विजयी झाला सौ‍मित्र ।
वानरी करोनि जयजयकार । हर्षे निर्भर नाचती ॥३७॥
किशुकवृक्ष उचलोनियां । उभवोनि पुच्छाग्री गुढिया ।
वानर नाचती लवलाह्या । श्रीरामरायाचेनि धर्में ॥३८॥
एका जनार्दना शरण । स्वानंदे उठला लक्ष्मण ।
तेणे संतोषला रघुनंदन । कथा पावन श्रीरामे ॥३९॥
इंद्रजिताची निजकांता । सुलोचना पतिव्रता ।
तिच्या सतीत्वाची कथा । सावधानता अवधारा ॥१४०॥
रामे सत्या सत्ववृत्ती । रामे भक्ता भुक्ती मुक्ती ।
राम वैरियां परमगती । नामे त्रिजगती पावन ॥१४१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
लक्ष्मणसावधानीकरणं नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४०॥
ओंव्या ॥१४१॥ श्लोक ॥२१॥ एवं ॥१६२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग