॥ श्रीएकनाथमहाराजकृत
70.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय सत्तरावा ॥
देवभक्तांची आनंदस्थिती
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीरामे विनविता दशरथ । निश्चिये बाणला वचनार्थ ।
स्वये मानोनि कृतार्थ । जाला विरक्त सर्वस्वा ॥१॥
राज्यलोभ स्वर्गलोभ । पुत्रलोभ विषयलोभ ।
सांडूनि भुवनभोगलोभ । जाला निर्लोभ दशरथ ॥२॥
अहंता आणि ममता । लोकलोकांतरवार्ता ।
गमनागमन पै तत्वता । राया दशरथा पै नाठवे ॥३॥
नामरूपातीत । वर्णाश्रमधर्मातीत ।
जातिकुळगोत्रातीत । स्वये रघुनाथ जाणितला ॥४॥
श्रुति शास्त्रातीत । पूर्ण ब्रह्म रघुनाथ ।
राये करितांचि इत्यर्थ । स्वये तो अर्थ ठसावला ॥५॥
लक्षूं जाता गुणातीतता । स्वये ठसावे ते अवस्था ।
लाभे आपुली निजमुक्तता । गुणातीतता गुणांमाजी ॥६॥
यालागी मुमुक्षु सकळ । साधक जिज्ञासु प्रबळ ।
तेही सांडोनिया स्थूळ । मुक्त केवळ लक्षावा ॥७॥
सांडोनिया कपट । धूर्तवाद वटवट ।
संत सेविता निर्दुष्ट । निजमुक्ति स्पष्ट लाहिजे ॥८॥
पुढील कथानुसंधान । मधुरवचनेंकरून ।
दशरथ ब्रह्मसंपन्न । केला आपण श्रीरामे ॥९॥
दशरथाने लक्ष्मणला परमार्थोपदेश केला :
होवोनियां ब्रह्मसंपन्न । पुत्रस्नेह सांडोनि पूर्ण ।
परमार्थ पै लक्ष्मण । दशरथें आपण प्रबोधिला ॥१०॥
अविकळ रघुनंदन । सेविता कीर्ति पावन ।
पावला की अनवच्छिन्न । सुमित्र जाण यथार्थ ॥११॥
श्रीरामेंसी सुष्ठु मैत्री । करिता उद्धरली धरित्री ।
कीर्ति वानिजे सुरवरी । भजनधात्री झालासी ॥१२॥
सकळ झाला सिद्धार्थ । मानूं जाता कृतार्थ ।
ऐसा न मानावा इत्यर्थ । अभिमानग्रस्त पै होती ॥१३॥
अंतरंग निजभक्त । भजनधर्मे सावचित्त ।
मजहूनि आन नाही आप्त । ऐसे संचरत मानसी ॥१४॥
ऐसा भाव उपजे चित्ती । तेणे भजनाची होय शांती ।
धरी अहंकार उत्पत्ती । अधःपाती तो पावे ॥१५॥
यालागी साधुसंती । भजनीं न मानावी तृप्ती ।
पुन : पुन: रघुपती । सेवावा निश्चिती सर्वभावे ॥१६॥
तृप्ति न मानोनि भजनासी । अविचळ सेविता रामपायांसी ।
जन्ममरणाची गोष्टी कायसी । ब्रह्मत्व अंगासी स्वये ये ॥१७॥
जेथे नाही मीतूंपण । तये स्वरूपीं ठेवोनि मन ।
सर्वकाळी रघुनंदन । अनिमिष जाण सेवावा ॥१८॥
ऐसे सांगोनि सौमित्रासीं । स्वयेंचि सांगे जानकीसी ।
क्षोभ न मानावा मानसी । रामे दिव्यासी घेतलें ॥१९॥
पुत्रि वैदेहि मन्युस्तु नैव कार्यस्त्वयानघे ।
विशुद्धिरेषा सततं सर्वलोकेषु दर्शिता ॥१॥
सदुष्करमिदं पुत्रि तव चारित्र्यलक्ष्मणनम् ।
कृतं यत्तेन सुभगे यश: सत्यं भविष्यति ॥२॥
जानकीला दशरथाचा उपदेश :
विदेहाचे हृदयरत्न । वैदेही तुज अभिमान ।
देहभावाचा अणुरेण । सर्वथा जाण तुज नाही ॥२०॥
तेणे विदेहभावेंकरून । सर्वकाळ अनवच्छिन्न ।
त्वा सेविला रघुनंदन । कीर्ति पावन जगद्वंद्य ॥२१॥
देही नाही देहाभिमान । कर्मे नाही कर्माभिमान ।
विषयाच्या ठायी ममताभिमान । सर्व जाण ज्यासी नाही ॥२२॥
त्यासी करावया दहन । अग्नि बापुडे मशक कोण ।
हे करावया प्रकट चिन्ह । दिव्य संपूर्ण घेतलें ॥२३॥
विदेहत्वे मज भेटतां । अग्नि जाळू न शके सर्वथा ।
ऐसे कळावया समस्ता । श्रीरामे तत्वता घेतलें दिव्य ॥२४॥
तू रामाची निजशक्ती । प्रकाशावया आपली स्वरूपस्थिती ।
दिव्य घेतलें तुज हाती । कोप सर्वाथी न मानावा ॥२५॥
पुढे याहूनि उत्तरोत्तर । श्रीरामे ख्यात तुझे चरित्र ।
महत्त्व पावसी थोर । जगदुद्धार तुझेनी ॥२६॥
साधकीं साधावया निश्चिती । सौमित्र आणि सीता सती ।
अंगीकारिता याची स्थिती । साधक पावती श्रीरामा ॥२७॥
असो आचरणस्थिती । तुमचे वर्णिता गुणकीर्ती ।
स्वये उद्धरी रघुपती । .................. ॥२८॥
भक्तकीर्ती श्रवण करिता । भक्ता आधी उद्धरी श्रोता ।
जो सादरता । कथा ऐके ॥२९॥
त्याकारणें सर्वथैव । सर्वकाळ सर्वभाव ।
अनवच्छिन्न एकभाव । सर्वत्र राघव सेवावा ॥३०॥
ऐसे सांगता दशरथा । लोटांगण पै तत्वता ।
विनविती झाली दशरथा । जनकदुहिता स्वानंदे ॥३१॥
सीता व लक्ष्मण यांनी दशरथास लोटांगण घालून त्याचा आदेश शिरोधार्य मानला :
सौमित्रेंसहित सीता जाण । कर जोडोनि आपण ।
दशरथासी विज्ञापन । जनकनंदिनी करीतसे ॥३२॥
आज्ञापिले स्वामिनाथा । त्या आचरणी सामर्थ्यता ।
आम्हा कांही नांहीं सर्वथा । कर्ता करविता श्रीराम ॥३३॥
पार्थिवाची शरीरकृती । इंद्रियांची क्रियाशक्ती ।
मानसाची कल्पनावृत्ती । स्वये रघुपती वर्तवी ॥३४॥
बुद्धीचा निश्चयो पूर्ण । अहंकाराचें अहंपण ।
स्वये होवोनि रघुनंदन । करवी चळण आपणासी ॥३५॥
आमच्याठायीं क्रियाशक्ती । अणुमात्र नाही भूपती ।
अंतर्यामित्वें रघुपती । वर्तवी निश्चिती आमुतें ॥३६॥
जेंवी दारुयंत्र खांबावरी । विविधा परी नृत्य करी ।
ते सामर्थ्य त्याच्या शरीरी । तिळभरी असेना ॥३७॥
सूत्रधाराचेनि छंदें । सुखे नृत्य करी विनोदे ।
ताल संगती पदबंधे । अतिआनंदे कुसरी ॥३८॥
तेंवी आमुतें रघुपती । स्वतां चेतवी निजशक्ती ।
आमुच्याठायीं क्रियाशक्ती । अणुही चित्ती असेना ॥३९॥
पुढेंही कर्ता करविता । श्रीरामचि तत्वता ।
तो ठेवील ज्या सत्ता । राहणें सर्वथा वृपवर्या ॥४०॥
म्हणोनि घातले लोटांगण । दोन्ही कर संपुट जोडून ।
तेणे दशरथ सुखायमान । रघुनंदन संतुष्ट ॥४ १ ॥
विमाजमारथाय महानुभाव: श्रिया व संहृष्टतनुर्णुपोत्तमः ।
आमंत्र्य पूर्वी सहसीतया च जगाम देवप्रवरस्य लोकम् ॥३॥
नंतर दशरथाचे विमानातून स्वर्गारोहण व इतर देवांकडून श्रीरामांना प्रार्थना :
रामसौमित्रजानकीसीं । संतोषें अनुमोदोन तिघांसी ।
नाम स्मरत संतोषीं । निघे विमानेसी निजभुवना ॥४२॥
सूर्यप्रभेसम विमान । निजकांती देदीप्यमान ।
मोक्षश्रिया विराजमान । स्वये आपण दशरथ ॥४३॥
स्वये होवोनि ब्रह्मभूत । ब्रह्मानंदे डुल्लत ।
विमानी राजा दशरथ । निघे उपमत निजधामा ॥४४॥
दशरथ स्वर्गभुवन । करिता अमरादि देवगण ।
मस्तकांजली आपण । केले नमन श्रीरामा ॥४५॥
अति विनीत तत्वता । विनविते जाले श्रीरघुनाथा ।
बहुत काय बोलू आता । बंदिमोचनता तुवा केली ॥४६॥
येवढिया उपकारा उत्तीर्ण । व्हावया आमुचे तोंड कोण ।
आम्हा योग्य आज्ञापन । कांही आपण करावे ॥४७॥
प्रतियाते तु काकुत्स्थे महेंद्र पाकशासनः ।
अब्रवीत्परमप्रीतो राघवं प्रांजलिं स्थितम् ॥४॥
एतस्मिन् तव कि कार्यं करोमि त्वत्प्रिये स्थितः ॥५॥
देवमंडळी श्रीरामांकडे त्यांच्या सेवेची अपेक्षा करतात :
स्वामी नरवीरपंचानना । कलापति कमलनयना ।
आम्हा होवोनियां प्रसन्ना । बंदिमोचना तुवा केले ॥१४८॥
ऐसियांसीं आम्ही प्रसन्न । जालो म्हणो हेंचि दूषण ।
तथापि ऐकोनि विज्ञापन । कांही आज्ञापन करावे ॥ 1४९ ॥
जेणे सुख तुज उपजे । आम्ही लागों भजनवोजे ।
ऐसे कार्य विचारिजे । जे रघुराजें कृपाळुवे ॥५०॥
इंद्र वायु कुबेर चंद्र । अग्नि नैर्ऋत यमादि समग्र ।
लोटांगणी अति तल्यर । श्रीरघुवीर विनविला ॥५१॥
कांही आज्ञापी आम्हासी । म्हणोनि लागले चरणासीं ।
तेणे सुख श्रीरामासी । अति आवेशी उथळले ॥५२॥
परंतु श्रीरामांनीच त्यांना चरणवंदन करून देवांच्या कृपेचा महिमा गायिला :
अमरां देवोनि सन्मान । लोटांगणी रघुनंदन ।
विनविता जाला आपण । सावधान अवधारा ॥५३॥
स्वामी तुमचे कृपेस्तव । दुष्ट निर्दळिला दशग्रीव ।
तुमचे प्रसन्नतेचें वैभव । अति अपूर्व काय सांगूं ॥५४॥
तुमचेनि नामे स्वामिया । यम काळ लागती पाया ।
त्या तुम्हाते सोडवावया । कोण साह्या येवो शके ॥५५॥
स्वये करोनि लाघव । मारविला दशग्रीव ।
अधिष्ठाते तुम्ही सर्व । व्यर्थ राघव रूढवितां ॥५६॥
तुमची करणी समस्त । तुम्हीच उपकार मानित ।
प्रसन्न होवोनियां समस्त । मागा म्हणत मज स्वामी ॥५७॥
इतर सकळ पदार्थ । तुमच्या कृपें पूर्ण भरित ।
जो आपुलें निजसामर्थ्य । मागा म्हणत मज स्वामी ॥५८॥
जो आपुले निजसामर्थ्ये । अनंत कोटि रची ब्रह्मांडांतें ।
तेथे उठवावया वानरांते । श्रीरामांते अटक कोण ॥५९॥
महत्त्व द्यावया सुरवरा । श्रीरामासी कळवळा पुरा ।
म्हणोनि इंद्रदिकां सुरा । अत्यादरा प्रार्थित ॥६०॥
मम हेतोः परक्रांता गता ये यमसादनम् ।
ते सर्वे जीवित प्राप्य समुतिष्ठांतु वानराः ॥६॥
विरुजाग्निर्व्रणांश्चैव संपबन्नबलपौरुषान् ।
गोलांगूलांस्तथा ऋक्षान्द्रष्टुकाम: सुरेश्वरः ॥७॥
अकाले चापि पुष्पाणि मूलानि च फलानि च ।
नद्यश्व विमलास्तत्र तिष्टेयुर्यपत्र वानराः ॥८॥
श्रुत्व तु वचनं तस्य राघवस्य महात्मन: ।
महेंद्र: प्रत्युवाचेदं वचनं प्रीतिसंयुतमू ॥९॥
महानयं वरस्तात यस्त्वयोक्तो रघूत्तम ।
तद्युक्तमनुरूपं च कौसल्यानंदवर्धजन ॥१०॥
श्रीरामांची इंद्रादिक देवांना मेलेल्या वानरांना जिवंत करून भेट करवून देण्याची एकच प्रार्थना :
मिळोनिया सुरगण । सकळ जालेति प्रसन्न ।
तरी ऐका विनगण । सावधान अति प्रीती ॥६१॥
रावणासीं युद्ध करिता । वानरी वेंचिलें जीविता ।
ते उठवावे मागुती आता । स्वस्थावस्था निजशक्ती ॥६२॥
युद्ध करिता समरांगणीं । जाली वानरांची भंगाणी ।
धडें मुंडे विखुरली रणी । करचरणीं समवेत ॥६३॥
रीस वानर गोळांगुळ । रणी पडियेले बहळ ।
ते उठवोनिया तत्काळ । मज सफळ भेटवावे ॥६४॥
हेचि तुमची प्रसन्नता । पडलिया वानरा समस्ता ।
वेगे उठवोनि तत्वता । मज मागुती भेटवावे ॥६५॥
माझी मज वानरे । भेटती जेणे प्रकारे ।
तेंचि करावे दातारें । सर्व प्रकारें मज तुम्ही ॥६६॥
मज माझे वानरगण । तुम्ही भेटविल्या आपण ।
पावली सकळ संभावन । कृतकल्याण मी झालो ॥६७॥
:ऐसे विनविता रघुनंदन । विस्मित झाले सुरगण ।
पूर्णब्रह्म रघुनंदन । आच्छादोन राहिलासे ॥६८॥
त्याचा दास हनुमंत । चरित्र केले अत्यद्भुत ।
आवरणभेदीं समस्त । वानर मृत उठविले ॥६९॥
करिता श्रीरामाचे ध्यान । दृष्टी अमृत स्रवोन ।
उठविले वानरगण । अर्धक्षण न लागता ॥७०॥
तो येथे श्रीराम आपण । उठवावया वानरगण ।
प्रार्थितसे सुरगण । भाग्य कोण आमुचे ॥७१॥
ती विनंती म्हणजे देवांना महद्भाग्य वाटलें :
म्हणोनिया सुरपंक्ती । सहित तेथे अमरपती ।
मस्तकांजलि रघुपती । झाले विनंती पै करिते ॥७२॥
सकळजनचाळका । सकळलोक प्रतिपाळका ।
सुरवर संस्थापका । रघुकुळटिळका परियेसीं ॥७३॥
अवचटे नाम पडता कानी । यम तयासीं न पाहे नयनी ।
ते नाम जपतां अनुदिनी । यमदंडणी केंवी साहिती ॥७४॥
नामापासीं मुक्ति मुक्ती । नामे जन्ममृस्तु नासती ।
तुझ्या नामी नित्य विश्रांती । प्राणी पावती श्रीराम ॥७५॥
ऐवढे तुझे नाममहिमान । तो तू प्रत्यक्ष रघुनंदन ।
असतो बापुडे काळ कोण । हरिगण निवटाया ॥७६॥
तुझ्या नामाचे सामर्थ्य जरी अगाध असले तरी तुझी आज्ञा म्हणूनच आम्ही वानरांना जिवंत करू :
तथापि तुझे आज्ञापन । कोण करू शके आन ।
सकळ उठती वानरगण । अर्ध क्षण न लागता ॥७७॥
आज्ञेंप्रमाणें सकळ । सिद्धि पावेल अविकळ ।
सर्वकाळ फळ जळ । वानरदळ सुखमय ॥७८॥
अंगी न दिसे घाववण । नाठवे तया युद्धत्राण ।
सुषुप्ती उठे शयनींहून । तेंवी वानरगण उठतील ॥७९॥
म्हणोनि सरसावले सर्वही । निज अवयवांचे ठायी ।
प्रवेशोनि लवलाही । वानर पाही उठविले ॥८०॥
ठार झालेल्या वानरांना देवांनी जिवंत केले. अवयवांवरून वानरांत भांडणे :
अवयव भिन्न भिन्न झाले । करचरण बिघडविले ।
ते आपेंआप विहिले । लागो लागले जेथींचे तेथे ॥८१॥
पुच्छ उसळोनि देखा । लागों पाहे जंव एका ।
तंव दुजा करी आवांका । कोठे जासी देखा म्हणवोनी ॥८२॥
एकीकडे ओढी एक । दुजेकडे ओढिती अनेक ।
तिजा म्हणे उजू ओळख । ते पुच्छ देख पै माझे ॥८३॥
एकाचे तुटले चरण । ते स्वये उमगितां जाण ।
मध्यें:चि हिरोन ने आन । येर थोडआन पै राहे ॥८४॥
आपुले घ्यावया पै जाण । छिन्नपाद नाही आंगवण ।
श्वासोच्छवास घालोनि पूर्ण । थोटवोन पै राहे ॥८५॥
मस्तक उथळले रणभूमी । निज कबंध जंव आक्रमी ।
तंव ते पडे अति दुर्गमी । अति विषमीं पाडिजे ॥८६॥
केश धरोनि ओढी एक । कान धरोनि ओढी आणिक ।
शिर मध्येंचि लोंबें देख । एक एका वानरे ॥८७॥
एक म्हणती माझे शिर । दुजा म्हणे परता सर ।
तिजा म्हणताहे मर मर । आपपर नोळखसी ॥८८॥
एक एकाचा ओढी कर । एक एकाचें ओढी शिर ।
येरयेरांचे अपार । चरण सत्वर ओढिती ॥८९॥
वानरांची लीला पाहून श्रीरामादिक सर्वांना हसू आले :
येरयरांचें पुच्छ आंसुडिती । आपुलाले हढुंगी कोंदिती ।
ते देखोनि रघुपती । स्वये हांसती स्वानंदे ॥९०॥
सौमित्र आणि सीता सती । सुग्रीव जांबवंत मारुती ।
अंगदादि सकळ जुत्पती । अवघे हांसती गदगदा ॥९१॥
अकळ श्रीरामाचे चरित्र । शरण येवोनि सुरवर ।
स्वयेंचि उठविती वानर । आपुलें अंतर कळो नेदी ॥९२॥
ऐसा करिता गदारोळ । गात्रे सांधिलीं सकळ ।
घायवण न दिसे अळूमाळ । सैन्य सकळ उठविलें ॥९३॥
अंगी घाव न दुखतां । वणही न दिसे सर्वथा ।
सांडोनिया सुषुप्तावस्था । उठती तत्वता ऐसे जाले ॥९४॥
अव्यंग झालेल्या वानरांकडून श्रीरामांना प्रणिपात :
लाहोनि अविकळ शरीर । रामानामे अपार ।
देती किराणे वानर । येवोनि रघुवीर नमिताती ॥९५॥
श्रीराम देता आलिंगन । वानरा आनंद गहन ।
नाठवे तेथे निज स्मरण । घाववण नाठवे ॥९६॥
नाठवे वानरा वानरपण । नाठवे श्रीरामा रामपण ।
श्रीराम वोळला चिद्धन । स्वानंदपूर्ण वानरा ॥९७॥
प्रयासें सुटली मिठी । परी दोघा दोपणाची गोष्टी ।
अल्पही स्फुरेना पोटी । अकळ गोष्टी रामींची ॥९८॥
केव्हा मारिले दशवक्त्रें । केंव्हां उठविले रघुवीरे ।
दोन्ही नेणती वानरे । अकळ चरित्रें रामाची ॥९९॥
येरीकडे सुरगण । ब्रह्मादि त्रिनयन ।
सकळ लोकपाळ मिळोन । करिती विनवण श्रीरामाचे ॥१००॥
देवांकडून श्रीरामांची स्तुती व अयोध्येला जाऊन
सर्वांना सुखी करण्याची रामांना कळककीची विनंती :
बंदीमोचन करोनि वहिले ! । रावणमुखींचें काढिले ।
आम्हा स्वपदीं स्थापिले । सुखी केले श्रीरामा ॥१॥
अहंरावणग्रस्त । देहदरिद्रें पीडित ।
होतो बहुसाल कष्टत । केले निर्मुक्त तेथूनी ॥२॥
सुखी केले आम्हांसी । तैसेचि तुझ्या अंतरंगासी ।
वेगी जावोनि अयोध्येसी । सुखी सकळांसी करी स्वामी ॥३॥
मैथिलीं सांत्वयस्वैनामनुरक्तां यशस्विनीम् ।
भरतं भ्रातरं प्राज्ञं शत्रुघ्नं च महाबलम् ॥११॥
समेत्य पितृबब्दालं त्वं लालयितुमर्हसि ।
कृतकर्मा परिश्रान्तः सुख प्रप्रोतु लकष्मणः ॥१२॥
समाप्तवनवासस्त्वमामानमभिषेचय ।
एवमुक्त्वा समामंत्र्य रामं सौमित्रिणा सह ॥१३॥
विमानैः सूर्यसंकाशैर्जग्मुर्हष्टा: सुरा दिवम् ।
अभिवाद्य काकुस्थ: सर्वांस्तान्त्रिदशेश्वरान् ॥१४॥
हे तुझी निजशक्ती । साध्यी अनुरक्त महासती ।
केवळ तपाची तपोमूर्ती । तुझी ख्याती जिचेनि ॥४॥
समाधान दे सीतेसी । स्वये सुख द्यावे तिसी ।
तैसेंचि बंधु सौमित्रासी । अति प्रीतीसी सुख देई ॥५॥
अति कष्टला वनांतरी । अति प्रीती निराहारी ।
अनिमिष तुझी सेवा करी । ब्रह्मचारी नैष्ठिक ॥६॥
नेणे आहार सेजार । श्रीरामसेवेंसीं तत्पर ।
परी राक्षसांचा संहार । प्रताप साचार पै तुझा ॥७॥
अति कष्ट करोनि जाण । अत्यंत कष्टला लक्ष्मण ।
त्यासी द्यावे समाधान । प्रीति करून श्रीरामा ॥८॥
तैसेंचि भरतशत्रुज । श्रीरामभजनी प्रेमा पूर्ण ।
दृढव्रत तुजलागून । अनवच्छिन्न करिताती ॥९॥
तुझे वियोगें रघुनाथा । तुच्छ केली शरीरावस्था ।
सुखाची त्या शत्रुघ्नभरतां । श्रीरघुनाथा अत्यादरें ॥११०॥
समस्ताही तुझ्या माता । प्रधाना सुमंता ।
अयोध्याजना समस्ता । परमावस्था पै तुझी ॥११॥
पितृवत् प्रजापालन । स्वामी करावे आपण ।
आपणा करोनि अभिषिंचन । व्रतविसर्जन वनवासा ॥१२॥
देवगण स्वर्गाला निघाले :
ऐसे विनवोनि सुरगण । श्रीरामासी प्रदक्षिण ।
सकळी घालोनि लोटांगण । निजधामा आपण निघाले ॥१३॥
सूर्यप्रभेसमान । विमानी बैसोनि देदीप्यमान ।
श्रीरामाचे गुणवर्णन । करीत आपण निघाले ॥१४॥
वचनी श्रीरामवर्णन । मनी श्रीरामाचे ध्यान ।
सर्वा भूतीं रघुनंदन । देखता सुरगण सुखमय ॥१५॥
करिता रामकथाश्रवण । नित्य तृप्त सुरगण ।
श्रीरघुनाथें सुखसंपन्न । निजधामा आपण सुखे गेले ॥१६॥
येरीकडे श्रीरामचंद्र । राक्षसादि महावीर ।
वैरी निरसोनि समग्र । सकळांसी सुखी केले ! ॥१७॥
शरत्काळींचा निशाकर । सवेग निरसोनि घनाकार ।
निर्मळत्वें जे अंबर । अति परिकर शोभवी ॥१८॥
राक्षसमेघांचिया हारी । निरसोनि क्षणाभीतरीं ।
श्रीरामचंद्र सैन्यामाझारीं । अति कुसरी शोभत ॥१९॥
श्रीरामांकडून सीतेचे मृदु शब्दात सांत्वन :
जवळी बोलावोनि सीता गोरटी । हाती धरोनि हनुवटी ।
शांतवनाच्या मधुर गोष्टी । राम जगजेठी संबोखी ॥१२०॥
विषाद न मानावा सुंदरी । तुझे चरित्र जगदुद्धारी ।
जे दाविली भजनपरी । ते उद्धरी जगाते ॥२१॥
जिही देखिले तुझे चरित्र । ते उद्धरिले साचार ।
पुढे ऐकती उत्तरोत्तर । ते संसारपार पावती ॥२२॥
दिव्य घेता तुजपासी । उभयता निंद्य जगासी ।
ते चुकलें अनायासीं । कोप मानसी न मानवा ॥२३॥
जैंपासोनि वियोग तुझा । तैंपासोनि देह माझा ।
कांही केल्या नये काजा । एवढा तुझा वियोग ॥२४॥
सीतेच्या विरहाने काय स्थिती झाली ते श्रीराम सीतेला सांगून तिला प्रेमालिंगन देतात :
उदकपान पै करिता । घोटामाजी आठवे सीता ।
फळभोजन करू जाता । जनकदुहिता ग्रासीं दिसे ॥२५॥
जागृति स्वप्न सुषुप्तीं । सीतामय झाली वृत्ती ।
हे सांगितले असेल मारुती । बहुत किती अनुवादों ॥२६॥
म्हणोनिया अति प्रीती । आलिंगिली सीता सती ।
तंव सीतेमाजी रघुपती । निजस्थिती हारपला ॥२७॥
श्रीरामा नाठवे रामपण । तंव येरीकडे झाले आन ।
सदेह जानकी आपण । श्रीरामी जाण बुडाली ॥२८॥
श्रीराम - सीता एकींएक होऊन गेले :
लवणजळा होता भेटी । हरपती येरयेरा पोटी ।
तेंवी श्रीराम जगजेठी - । माजी गोरटी हरपली ॥२९॥
दोनी दीप एक होती । दोनीपण जावोनि एकदीप्ती ।
तेंवी सीता आणि रघुपती । एकचे शोभती देदीप्य ॥१३०॥
न होवोनिया दुजेपण । दोन्ही दोपणीं होती भिन्न ।
तेंवी सीता आणि रघुनंदन । आलिंगन सुटलें ॥३१॥
सुटोनिया आलिंगनीं । जानकीये श्रीरामचरणी ।
मौनेंचि मस्तक ठेवोनी । मधुर वाणी अनुवादे ॥३२॥
सीतेने लज्जित होऊन रामांना वंदन केले :
प्रीतींकरोनि लज्जान्वित । विनविती झाली रघुनाथ ।
अंतर्यामी तू निश्चित । कर्ता करविता तूंचि तू ॥३३॥
सकल इंद्रिया चाळकता । तुझेनि स्वामी रघुनाथा ।
अंतर्बाह्य तुझी सत्ता । कर्ता करविता तूंचि तू ॥३४॥
ऐसे बोलोनि सुंदरी । लोटांगण चरणावरी ।
घातले अतिथोरी । नामे वानरी गर्जिजे ॥३५॥
ते श्रीराम -सीतेचे प्रेममय मीलन पाहून सर्व सभेने
रामांचा जयजयकार करून नामसंकीर्तनानें आनंदोत्सव केला :
सुखमय सभा सकळ । बिभीषण सुग्रीव वानरदळ ।
रीस आणि गोळांगुळ । नामे प्रबळ गर्जती ॥३६॥
नामे कोंदला भूगोळ । नामे कोंदलें पाताळ ।
रामे संबोखिली जनकबाळ । आनंदकल्लोळ सकळांसी ॥३७॥
आनंदमय रघुपती । आनंदमय सीता सती ।
आनंदमय जुत्पती । सकळी रात्र क्रमियेली ॥३८॥
तंव उजळलें उखामंडळ । प्राची झाली पै निर्मळ ।
निजकर्मी लोक सकळ । अधिकारशीळ लागले ॥३९॥
दिशा चोखाळल्या समस्त । झाले पांथिक मार्गस्थ ।
सदाचारकर्मी प्रवर्तत । उद्धरण करित अग्निहोत्री ॥१४०॥
उपासक बैसले पूजनीं । योगी प्रवर्तले ध्यानी ।
उठले वैष्णव गजरेंकरोनी । नामसंकीर्तनीं गीतवाद्यें ॥४१॥
वानर उठले समग्र । करीत नामाचा गजर ।
भुभुःकारें गर्जे अंबर । प्रभाकर उगवला ॥४२॥
राक्षसराजा बिभीषण । निजानंदे परिपूर्ण ।
पूजावया रघुनंदन । पूजोपचार घेऊन पै आला ॥४३॥
तां रात्रिमुषितं रामं तथैव व्रतमास्थितम् ।
अब्रवीत्प्रांजलिर्वाक्यं जयं दृष्ट्वा बिभीषण: ॥१५॥
बिभीषण व त्याच्या स्त्रियांची वतसमाप्ती करण्याची रामांना विनंती :
वनवासाचें दृढवत । संपादावया सुरकार्यार्थ ।
धरिले होते अति नियत । तो कार्यार्थ साधिला ॥४४॥
मस्तकांजलि अति विनीत । लोटांगण घालोनि तेथ ।
बिभीषण शरणागत । श्रीरघुनाथ विनविला ॥१४५॥
निवटोनियां लंकानाथ । बंदी सोडविले समस्त ।
आता विसर्जावें व्रत । अत्यद्भुत धरिले जे ॥४६॥
सौमित्र गांजला अन्नेंवीण । उपवासी अति खिन्न ।
महासती जानकी जाण । अतिक्षीण पै झाली ॥४७॥
विसर्जावें वनवासव्रत । जटाबंधने करावीं मुक्त ।
लोटांगणी श्रीरघुनाथ । निजखीसमवेत नमियेला ॥१४८॥
बिभीषणाच्या स्त्रिया । पूजासामग्रीं घेवोनिया ।
पूजूं आलिया श्रीरघुराया । निजजायासमवेत ॥१४९॥
तिही घालिता लोटांगण । उचलोनियां रघुनंदन ।
अति प्रीतींकरोनि पूर्ण । समाधान दीधलें ॥१५०॥
सकळ झाले निष्कंटक । लंकेचें राज्य अलौकिक ।
निजपतीसहित देख । तुम्ही आवश्यक भोगावें ॥५१॥
रामांकडून बिभीषणाला वरदान :
म्हणोनि माथा ठेविला हात । जंववरी शशिभास्वत ।
गगनी असे वर्तत । तंव लेकेआत राज्य करी ॥५२॥
ऐसे देता वरदान । येरी माथा वंदिले चरण ।
विनविताहे बिभीषण । ते विज्ञापन मानावे ॥५३॥
परिस स्वामी श्रीराम । बिभीषण शरण आला तुम्हा ।
तेव्हांचि अक्षयी राज्य आम्हा । श्रीरामधर्मा विनटल्या ॥५४॥
शरण जातो श्रीरामासी । अक्षयी राज्य बिभीषणासी ।
अक्षयी चुडेदान आम्हांसी । तुझे तुजपासी काय सांगूं ॥५५॥
लोटांगण श्रीरघुनाथा । विनविताति लंकेशवनिता ।
बहुत कष्टली सती सीता । अभ्यंगार्था आज्ञापीं ॥५६॥
बिभीषणें त्याच रीती । विनविला श्रीरघुपती ।
स्वामी परिसावी विनंती । व्रतसमाप्री करावी ॥५७॥
ऐसे प्रार्थितां बिभीषण । संतोषला रघुनंदन ।
मृदु मंजुळ वचन । भक्तशांतवन करीतसे ॥५८॥
एकाएकी मधुरवाणी । धर्मशास्त्रार्थ नीतिवचनीं ।
श्रीरामे बिभीषणालागोनी । लंकाभुवनी पाठविला ॥५९॥
एकाएकी जनार्दनी । धन्य कथा रामायणी ।
धन्य भाग्याची मांडणी । ऐकता श्रवणी रामथा ॥१६०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे । युद्धकांडे एकाकारटीकायां
देवभक्त आनंदयोगो नाम सप्ततितमोऽध्यायः ॥७०॥
॥ ओव्या १६० ॥ श्लोक १५ ॥ एवं १७५ ॥
