देवाची ते खूण आला ज्
2609.
देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा संसारासी ॥१॥
देवाची ते खूण करावे वाटोंळे । आपणा वेगळे राहो नेदी ॥धृपद॥
देवाची ते खूण गुंतो नेदी आशा । ममतेच्या पाशा शिवो नेदी ॥२॥
देवाची ते खूण करावे तोंडाळ । आणिक सकळ जग हरी ॥३॥
देवाची ते खूण झाला ज्यासी संग । त्याचा झाला भंग मनुष्यपणा ॥४॥
देवाची ते खूण गुंतो नेंदी वाचा । लागो असत्याचा मळ नेदी ॥५॥
देवाची ते खूण तोडी मायाजाळ । आणि हे सकळ जग हरी ॥६॥
पहा देवे तेचि बळकाविले स्थळ । तुक्यापे सकळ चिन्हे होती ॥७॥
अर्थ :
ज्याच्या ह्दयरुपी घरामध्ये देव आला आहे त्याची ओळखण्याची खूण म्हणजे त्याच्या संसारावर दगड पडत असतो त्याचे वाटोळे होते. देवाने त्याच्या भक्ताचे वाटोळे करावे आणि त्याच्या भक्ताला त्याचेपासून वेगळे राहू देऊ नये हीच त्याच्या कृपेची खरी खूण आहे. देवाची प्राप्तीची खरी खूण म्हणजे त्याचा भक्त आशापाशात गुंतत नाही आणि ममतेचे जाळे त्याला शिवत नाही. देवाची प्राप्तीची खूण म्हणजे देवाचा भक्त आपल्या मुखाने नेहमी हरीचेच नाम घेतो आणि संपूर्ण जगच हरीरुप करुन सोडतो. देवाच्या प्राप्तीची खूण म्हणजे ज्याला देवाचा संग झाला तो मनुष्य न राहता स्वत: देवच झाला म्हणजेच त्याच्या मनुष्यपणाचा भंगच झाला. देवाच्या प्राप्तीची खूण म्हणजे देवाचा भक्त आपल्या वाणीने हरीचेच नाम घेतो आणि भवसागरातील मायीक पदार्थांचे वर्णन करण्यात गुंतत नाही व असत्याचा मळ आपल्या वाणीला लावून घेत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, लोक हो पाहा देवाने माझे देहरुपी स्थळच बळकावले आहे आणि जे काही चिन्ह मी तुम्हाला देवप्राप्तीचे सांगितले ते सर्व माझ्या ठिकाणी आहेत.
