अनंताचे मुखी होसील ग
2610.
अनंताचे मुखी होसील गाइला । अमुप विठ्ठला दास तुम्हा ॥१॥
माझे कोठे आले होईल विचारा । तरीच अव्हेरा योग्य झालो ॥धृपद॥
सर्वकाळ तुम्ही असा जी संपन्न । चतुरा नारायण शिरोमणि ॥२॥
तुका म्हणे ऐसे कलियुगींचे जीव । तरी नये कीव बहुपापी ॥३॥
अर्थ :
हे विठ्ठला या सृष्टीमध्ये तुझे वर्णन करणारे तुझे अनंत भक्त असतील आणि तुझे अनंत दासही असतील. त्यामुळेच हे विठ्ठला एवढ्या भक्तांमध्ये माझा विचार तरी तुम्हाला कसा होईल आणि तेथे माझे कोठे स्थान आहे त्यामुळेच माझा अव्हेर तुमच्याकडून झाला हेही बरेच झाले. हे नारायणा तुम्ही सर्व काळ संपन्न आहात आणि सर्व चतुरांचेही शिरोमणी तुम्ही आहात. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा या कलियुगामध्ये खूप लोक पापी आहेत त्यामध्ये मीही एक आहे त्यामुळेच तुला यांची कीव येत नाही दया येत नाही.
