चौर्यांयशीं भोगितां
3162.
चौर्यांयशीं भोगितां । दुःख न सरे सर्वथा । संतसमागम घडता । दुःख नासे तात्काळ ॥१॥
नको गुतूं या संसारी । पडसी काळाचे आहारीं । संतसमागम धरी । तै यातना चुकती ॥२॥
मागे बहुतांचा उद्धार । संतीं केलासे साचार । तोचि हा धरी निर्धार । संतसंग सर्वदा ॥३॥
एका जनार्दनी शरण । संतसंग सुलभ जाण । भोळ्याभाविकांक तारण । समागम संतांचा ॥४॥
