आशापाश सोडोनि देई ।
3163.
आशापाश सोडोनि देई । संतासीं तू शरण जाई । चौर्याशींचें भय नाही । प्राणिया तुज ॥१॥
आवडी धरी संतसंग । कामक्रोधा होय भंग । षडवैरीयां मार्ग । मोकळाची ॥२॥
संतसंग धरतां चित्ती । उपाधी ते सर्व तुटती । भावे होय मोक्षप्राप्ती । क्षणमात्रें ॥३॥
नाही आणीक साधन । संतसंगतीवांचून । शरण एका जनार्दन । संतसंग धरी ॥४॥
