वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(नाटाचे अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079769 · अभंग क्र. ४०१५

4015.
(नाटाचे अभंग)
विठ्ठल आमचे जीवन । आगमनिगमाचे स्थान ।
विठ्ठल सिद्धीचे साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥१॥
विठ्ठल कुळीचे दैवत । विठ्ठल वित्त गोत चित्त ।
विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥२॥
विठ्ठल विस्तारला जनी । सप्त ही पाताळे भरूनी ।
विठ्ठल व्यापक त्रिभुवनी । विठ्ठल मुनिमानसी ॥३॥
विठ्ठल जीवाचा जिव्हाळा । विठ्ठल कृपेचा कोवळा ।
विठ्ठल प्रेमाचा पुतळा । लावियेले चाळा । विश्व विठ्ठले ॥४॥
विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता ।
विठ्ठलेविण चाड नाही गोता । तुका म्हणे आता नाही दुसरे ॥५॥

अर्थ :
विठ्ठल आमचे जीवन आहे वेदशास्त्रांच्या उत्पत्तीचे स्थान विठ्ठल आहे सर्व सिद्धींचे प्राप्ती करून घेण्याचे साधन विठ्ठल आहे आणि ध्यानविसावा देखील विठ्ठल आहे विठ्ठल आमचे कुलदैवत आहे आणि विठ्ठलच आमचे वित्त, चित्त, गोत आहे. विठ्ठलच धर्म-अर्थ-काम-मोक्ष असून त्यांचे पुण्यही तोच आहे त्यामुळे तर मला त्याच्याच गोष्टी आवडतात विठ्ठलच सर्व लोकांमध्ये विस्तारलेला आहे असून सप्त पाताळात तोच भरून आहे. विठ्ठलच सर्वत्र व्यापक आहे त्रिभुवनात आहे व मुनी जनांच्या मनातही तोच आहे. विठ्ठल जीवाचा जिव्हाळा असून विठ्ठल कृपा करण्याविषयी अतिशय कोमल आहे. विठ्ठलच प्रेमाचा पुतळा असून त्याचाच चाळा त्याने सर्व विश्वाला लावलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाच आई, बाप, चुलता आहे व विठ्ठलच भाऊ - बहीण आहे. विठ्ठला वाचून मला दुसरे कोणतेही गण गोत आवडत नाही एवढेच नाही तर विठ्ठला वाचून मला कोणीही नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग