अनिर्वाच्य ब्रह्म नि
322.
अनिर्वाच्य ब्रह्म निगम म्हणती | विणले वेवादती अठरा साही ॥१॥
ते हे पुंडलिके चोहांटा उभे केले | भावे भुलविले पंढरीये ॥२॥
घ्या रे घ्या रे तुम्ही कैवल्याचे पीक | देतो पुंडलिक सकळ जीवा ॥३॥
जे उपनिषदांचे मथित जे साराचे यथार्थ | तो हा पंढरीनाथ प्रगट जगी ॥४॥
हरिहर विरंची त्रिमूर्ती पै हाची | माउली दीनांची लोभापर ॥५॥
जो श्रवणांचा श्रवण नयनांचा नयन | ज्ञानाचा दर्पण द्रुष्ट होय ॥६॥
आदिमध्यअंती व्यापक सर्वांभूती | तो हा आला व्यक्ति भक्तिभावे ॥७॥
सच्चिदानंद आनंदघन परिपूर्ण | कारण महाकारण प्रभा हाचि ॥८॥
चित्ता चेतविता बुध्दीते पाळिता | मनादि चाळिता इंद्रियांसी ॥९॥
तो या चराचरा जिवलग सोईरा | म्हणोनि अनुसरा पांडुरंगा ॥१०॥
नामा म्हणे काया वाचा मने त्यांचे | नाम जपा कैचे जन्ममरण॥११॥
