आनंदे कीर्तन कथा करी
2999.
आनंदे कीर्तन कथा करी घोष । आवडीचा रस प्रेमसुख ॥१॥
मज या आवडे वैष्णवाचा संग । तेथे नाही लाग कळिकाळाचा ॥धृपद॥
स्वल्प मात्र वाचे बैसलासे निका । राम कृष्ण सखा नारायण ॥२॥
उच्चांरिता मज दुजे वाटे लाज । उपदेशे काज आन नाही ॥३॥
तुका म्हणे मन रंगलेसे ठायी । माझे तुझ्या पायी पांडुरंगा ॥४॥
अर्थ :
आता मी हरी किर्तन व कथा आनंदाने व हरीचा घोष करुन करत आहे कारण त्यामध्ये माझ्या आवडीचा प्रेमसुखरस आहे. मला या वैष्णवाचा संगच फार आवडतो कारण तेथे कळीकाळाला प्रवेशच मिळत नाही. अतिशय सोपा असलेला रामकृष्ण नारायण हा मंत्र माझ्या जीभेवर अतिशय चांगल्या प्रकारे बसला आहे. अहो या मंत्रावाचून दुसरा उच्चार देखील करताना मला लाज वाटते आणि या मंत्रावाचून दुसरा उपदेश करण्याचेही मला काही कारण राहिलेले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाडूरंगा तुझ्या पायाच्या ठिकाणी माझे मन रंगले आहे.
