ऐसे वदोनि पांडुरंगें
1023.
ऐसे वदोनि पांडुरंगें|समस्तांसी वस्त्रे दिली अंगें|देऊनि भूषणे अनेगें| रत्नमुक्ताफळे अलंकार॥१॥
धन्य जन्मले भूमंडळीं|कीर्तनी नाचती गदारोळी|ते विष्णुसन्निध सर्वकाळीं|ऐसे वनमाळी बोलिले॥२॥
राही रुक्मिणी सत्यभामा| विचारिती पुरुषोत्तमा|बहुत अगाध येथिंचा महिमा| भूमीवरी वैकुंठ॥३॥
म्हणे विठोजी जंववरी धरा| तंववरि समाधि स्थिरा|हरिकीर्तन करिती सैरा| चतुर्भुज होईल॥४॥
हे शिवपीठ शिवाचें|हेंचि पूर्वस्थान अगस्तीचें|जाणोनि जन्म जाले चौघांचे| सर्व क्षेत्रांची आदिभूमि॥५॥
पूर्वापार युगायुगीं|अनेक पुण्ये घडले यागीं|तपे तपिन्नले महायोगी| तो हा अळंकापुरी ठावो॥६॥
येथे रामकृष्ण कथा| जो करील सर्वथा| तो पुढे पवेल व्यथा| भवबंधापासुनी सुटेल॥७॥
सप्तद्वीप नवखंड|आणि अवघे गणिता ब्रह्मांड॥त्याहूनि हे हो उदंड|पुण्य जोडेल नामें॥८॥
ऐसे उत्तमोत्तम थोर|सकळ जीवांचे माहेर|नाम घेता थरती चराचर| दिला वर रुक्मिणीवरें॥९॥
नामा म्हणे देवराव| महिमा सांगतसे भाव|धन्य अळंकापुरी गांव|आदि ठाव वरिष्ठ॥१०॥
