अनंता जीवांची तोडिली
2801.
अनंता जीवांची तोडिली बंधने । मज काळे येणे कृपा कीजे ॥१॥
अनंत पवाडे तुझे विश्वंभरा । भक्तकरुणाकरा नारायणा ॥धृपद॥
अंतरीचे कळो देई गुह्य गुज । अंतरी ते बीज राखेन मी ॥२॥
समदृष्टी तुझे पाहेन पाउले । धरीन संचले हृदयांत ॥३॥
तेणे या चित्ताची राहील तळमळ । होतील शीतळ सकळ गात्रे ॥४॥
तुका म्हणे शांति करील प्रवेश । मग नव्हे नाश अखंड तो ॥५॥
अर्थ :
देवा अनेक जीवांचे बंधन तू तोडले आहेत तसेच तूझी कृपा यावेळी माझ्यावर कर. नारायणा विश्वंभरा भक्त करुणाकरा अशी तुझे अनंत पवाडे प्रसिद्ध आहेत. देवा तुझ्या अंतकरणातील गुप्त ज्ञान मला कळू दे मग बीज मी माझ्या अंतःकरणात राखण करून ठेवीन. देवा तुझे समचरण मी माझ्या दृष्टीने पाहिन व तेच मी माझ्या हृदयात साठवून ठेवीन. देवा त्यामुळे माझ्या चित्ताची तळमळ शांत होईल आणि माझे सर्व इंद्रिये शितल होतील. तुकाराम महाराज म्हणतात असे जर झाले तर माझ्या चित्त मध्ये शांती नांदेल आणि त्याचा कधीही नाश होणार नाही.
