आता येथे झाली जीवा स
2800.
आता येथे झाली जीवा संवसाटी । होते तैसे पोटी फळ आले ॥१॥
आता धरिले ते नो सोडी चरण । सापडले धन निजठेवा ॥धृपद॥
आता हा अळस असो परता दुरी । नेदावी ते उरी उरो काही ॥२॥
आता याचा मज न व्हावा विसर । भरोनि अंतर राहो रूप ॥३॥
आता लोकलाज नयो येथे आड । बहु झाला गोड ब्रम्हरस ॥४॥
तुका म्हणे आता जन्म हा सफळ । अंतरी गोपाळ स्थिरावला ॥५॥
अर्थ :
आता मी जीवावरच उदार झालो आहे त्यामुळे माझ्या हृदयामध्ये जे फळ मला अपेक्षित होते ते फळ मला मिळाले आहे. माझ्या हृदयामध्ये होते ते तुमचे चरण ते मला आता प्राप्त झाले आहे त्यामुळे तो नीज ठेवा मला सापडला आहे मी आता तो सोडणार नाही. आता भजन करण्यासाठी माझ्या मध्ये जो आळस होता तो मी बाहेर काढून टाकला आहे तो आता माझ्या हृदयात बाकी उरू देणार नाही. देवा आता मला तुझ्या रूपाविषयी कधीही विसर पडू नये तुझे रूप माझ्या अंतरंगात मध्ये अगदी ठासून भरून राहिले पाहिजे. आता मला गोड असा ब्रम्हरस मिळाला आहे त्यामध्ये लोक लज्जाआड येऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात आता माझ्या अंतरंगात मध्ये गोपाळला स्थिरावला आहे त्यामुळे माझा जन्म सफल झाला आता.
