॥ श्रीएकनाथमहाराजकृत
38.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय अडतिसावा ॥
बिभीषणाला लंकाप्रदान व राज्याभिषेक
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
मारूतीच्या वचनाने श्रीरामांचा संतोष :
बिभीषणाचा वृत्तांत । समूळ सांगे हनुमंत ।
तेणे तुष्टला श्रीरघुनाथ । उल्लासत स्वानंदे ॥१॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । संतोषला रघुनंदन ।
सुग्रीवादि वानरगण । त्यांप्रति आपण धर्म सांगे ॥२॥
सद्भावेंसी संपूर्ण । अथवा कपटें आलिया शरण ।
त्यासी नाही सर्वथा मरण । सत्य भाषण हे माझे ॥३॥
शरणागताला केव्हांही अभयच, रावण जरी आला तरीही त्याला अभय मिळेल :
माझा करावया घात । शरण आलिया लंकानाथ ।
त्यासीही माझा अभयहस्त । जाणा निश्चित कपि सर्व ॥४॥
शरणागतापासाव मरण । आम्हांसी सर्वथा नाही जाण ।
हेंही माझे सत्य भाषण । वानरगण तुम्ही जाणा ॥५॥
शरणागतासीं क्रोधानळी । जो कोणी उचलील आंगोळी ।
त्याची करीन मी होळी । शरजाळी वर्षोनी ॥६॥
जो कोणी माझा शरणागत । त्यासी जेणे लाविला हात ।
त्याचा मी करीन घात । निश्चितार्थ हा माझा ॥७॥
श्रीराम कृपेचा कल्लोळ । श्रीराम शरणागतवत्सल ।
श्रीराम तो दीनदयाळ । प्रेमाप्रांजळ श्रीराम ॥८॥
श्रीराम स्वानंदे गर्जत । बिभीषण तो शरणागत ।
त्यासी माझा अभयहस्त । आणा त्वरित भेटीसीं ॥९॥
ऐसे बोलता रघुनाथ । सुग्रीवासहित हनुमंत ।
उडालें पै आकाशात । जुत्पतियुक्त स्वानंदे ॥१०॥
देखोनिया वानरजात । पुढती बोले रघुनाथ ।
शरण आलिया लंकानाथ । अभयहस्त त्या माझा ॥११॥
शरण आलिया सर्वथा । बिभीषणाहून अधिकता ।
सुखी करीन लंकानाथा । जाण तत्वता वानरेशा ॥१२॥
रावण अथवा बिभीषण । दुष्ट नष्ट हो दुर्जन ।
मज आलिया शरण । अभयदान त्या माझे ॥१३॥
जो भीतसे शरणागता । मरणभय ज्याचे चित्ता ।
जय न पावे तो सर्वथा । जाण तत्वता कपिराजा ॥१४॥
ज्याचे पोटी सभयता । कैसे निर्भय शरणागता ।
तसे नाही श्रीरघुनाथा । निःशंकता निर्भय ॥१५॥
बिभीशणाला आणवून त्यास अभय व त्याचे स्वागत :
ऐकोनि श्रीरामाचे वचन । अवघे विस्मित वानरगण ।
गाढी श्रीरामाची आंगवण । निधडा पूर्ण निःशंक ॥१६॥
श्रीरामचित्तीं नाही चिंता । मरणभय नाही रघुनाथा ।
हाचि शरण्य शरणागता । ऐसे समस्ता मानले ॥१७॥
ऐसा श्रीराम समर्थ । अवघे अति प्रीती बोलत ।
जेथे बिभीषण शरणागत । तेथे समस्त पातलें ॥१८॥
देखतांचि बिभीषण । सुग्रीवे दिधले आलिंगन ।
बिभीषण भाग्या संपूर्ण । वानरगण वानिती ॥१९॥
नलनीळादि समस्त । अंगद आणि जांबवंत ।
अवघे आलिंगन देत । भाग्यवंत बिभीषण ॥२०॥
देखतांचि हनुमंता । उल्लास बिभीषणाच्या चित्ता ।
त्याच्या चरणी ठेवोनि माथा । सप्रेमता सद्गदित ॥२१॥
माता पिता बंधु भगिनी । तूंचि सखा मजलागूनी ।
तुजवांचोनि त्रिभुवनी । आन कोणी असेना ॥२२॥
रावणाची संपूर्ण कथा । सांगितली त्या हनुमंता ।
स्वराज्य सुह्रद त्यजोनि माता । शरण रघुनाथा मी आलो ॥२३॥
ऐसे सांगतांचि गोष्टी । हरिखें बाष्प दाटें कंठी ।
सुखस्वानंदें जडोनि मिठी । पडिला सृष्टी मूर्च्छित ॥२४॥
त्यासी मूर्च्छित पडता । उल्लास हनुमंताचे चित्ता ।
उचलोनियां स्वानंदता । उल्लासता आलिंगी ॥२५॥
अंगा अंगस्पर्शन । हनुमंतासी आलिंगन ।
तेणे पावला समाधान । सुखसंपन्न बिभीषणा ॥२६॥
कृपेने बोले हनुमंत । बिभीषणा तू भाग्यवंत ।
तुज तुष्टला श्रीरघुनाथ । कृपावंत कृपाळु ॥२७॥
चार प्रधानांसह बिभीषणाची शरणागती :
श्रीरामे बोलाविलें भेटी । वेगे चाला उठाउठी ।
म्हणोनि धरिला बाहुवटी । वानरा पोटी आल्हाद ॥२८॥
भेटवावया श्रीरघुपती । बिभीषणासी धरोनि हाती ।
वेगे उठिला मारूती । वानरपंक्तीसमवेत ॥२९॥
श्रीरामनामाचा गजर । करित चालिले वानर ।
नामे उचंबळिला सागर । नामे अंबर दुमदुमलें ॥३०॥
भेटावया शरणागता । बाहु स्फुरती श्रीरघुनाथा ।
आलिंगावया अति शीघ्रता । श्रीरामचित्ता आल्हाद ॥३१॥
शुभ चिन्हें डोळे लवती । हरिखें अष्टांगे थरकती ।
शरणागता श्रीरामप्राप्ती । आल्हाद चित्ती भेटीचा ॥३२॥
अवलोकावया शरणागता । नेत्रपल्लव न हालता ।
येणे उल्लांसें श्रीरघुनाथा । उत्कंठता भेटावया ॥३३॥
येरीकडे हनुमंत । धरोनि बिभीषणाचा हात ।
सुग्रीवादि कपि समस्त । आले गर्जत हरिनामें ॥३४॥
देखता श्रीरामदर्शन । बिभीषण घाली लोटांगण ।
देखता श्रीरामदर्शन । बिभीषण घाली लोटांगण ।
मस्तकी धरिता त्यांचे चरण । आपणा आपण विसरला ॥३५॥
विसरला यौवराज्य संपत्ती । विसरला स्त्रीपुत्रसंतती ।
विसरला राक्षसजाती । श्रीराममूर्ती देखता ॥३६॥
विसरला जीवित्व जीव । विसरला देह अहंभाव ।
विसरला शिवत्व शिव । श्रीराघव देखता ॥३७॥
साधकांच्या ब्रह्मापर्णासारखीच ही शरणागती :
राम देखतांचि दृष्टी । विसरला व्दंव्ददुःख त्रिपुटी ।
विसरला स्वदेहेंसी सृष्टी । आनंदकोटी श्रीरामा ॥३८॥
ऐसियापरी बिभीषण । श्रीरामासी अनन्य शरण ।
स्वये घालिता लोटांगण । समाधान पावला ॥३९॥
मन बुद्धि चित्त अभिमान । साधु राखे सावधान ।
तैसेचि चौघेही प्रधान । आणिले शरण श्रीरामा ॥४०॥
धर्मार्थ काम मोक्ष पूर्ण । साधक करी ब्रह्मार्पण ।
तैसे चवघेही प्रधान । आणिले शरण श्रीरामा ॥४१॥
साधनचतुष्ट्यसंपत्ती । साधून ब्रह्मार्पण करितीं ।
तैशाच सजीव चारी मुक्ती । केले शरणार्थी श्रीरामा ॥४२॥
ऐसियापरीं बिभीषण । अनन्यभावें लोटांगण ।
श्रीरामे उचलोनि आपण । आलिंगन दिधले ॥४३॥
लवणजळा होय भेटी । तैसी दोघा पडली मिठी ।
विराले येरयेरांचे पोटी । आनंद सृष्टी न समाये ॥४४॥
दोनी दीप मेळविल्या ज्योती । दोनी मिळोनि एक होती ।
तैसे आलिंगिता रघुपती । अव्दैतस्थिति बिभीषणा ॥४५॥
जेंवी अलंकारें आपण । सुवर्णा दिधले आलिंगन ।
ऐसिया स्थिती रघुनंदन । भेटला आपण बिभीषणा ॥४६॥
ऐसे देवोनि आलिंगन । श्रीराम बोलिला गर्जोन ।
सखा माझा तू पूर्ण । जीव प्राण तू माझा ॥४७॥
जेंवी जळी मिळाली साखर । स्वये विरोनि होय नीर ।
साखरें उदक केले मधुर । तेंवी श्रीरामचंद्रबिभीषण ॥४८॥
श्रीरामाचे पूर्णपण । भक्ती बिंबलें संपूर्ण ।
भक्तिभावाचे गोडपण । बिंबले पूर्ण श्रीरामी ॥४९॥
ऐसियापरी दोघे जण । पूर्ण पावोनि समाधान ।
हरिखेजोनि बिभीषण । काय आपण बोलत ॥५०॥
बिभीषणाचे अभिवचन :
राक्षस मारावयाची निजख्याती । मुख्य मुख्य धुरा रणी पडती ।
तैसी सांगेन मी युक्ती । रणसमाप्ती राक्षसा ॥५१॥
दुर्गी रिघावया झडझडां । युक्ति जाणे मी गाढा ।
परी ते न चले वानरांपुढां । उडोनि कडा चढतील ॥५२॥
सवेग करोनिया उड्डाण । दुर्गीं रिघतील वानरगण ।
तेथे माझी युक्ति कोण । मूर्खपण पै माझे ॥५३॥
सुटल्या श्रीरामाचे बाण । समेरूसिंधूंसीं मरे रावण ।
तेथे माझी युक्ती कोण । मूर्ख पूर्ण मी एक ॥५४॥
ऐसे बिभीषणे सांगता । कृपा उपजली रघुनाथा ।
अभयहस्त ठेवोनि माथा । होय बोलता ते ऐका ॥५५॥
ऐसे बोलता बिभीषण । संतोषला श्रीरघुनंदन ।
पुढती दिधले आलिंगन । तुष्टमान स्वये जाला ॥५६॥
बिभीषणासी लंकापती । अभिषेकावया श्रीरघुपती ।
सिंधुजळ सिंचनार्थीं । लक्ष्मणाप्रतीं स्वये सांगे ॥५७॥
त्याला लंकेचे राज्य देऊन राज्याभिषेक केला :
तीर्थोदक प्रयागोदक । चतुःसमुद्रींचें उदक ।
वानरी आणिले आवश्यक । श्रीरघुकुळटिळकनिजाज्ञा ॥५८॥
व्याघ्रचर्म पै आसन । सप्तमृत्तिका कुशोदक ।
औंदुबरी पीठ अति सुटंक । लंकाभिषेक बिभीषणा ॥५९॥
घडासहित सोनकेळीं । घडी घडघडित नारळी ।
वानर हाणिती सुखसमेळी । पुष्पें फळी अभिषेका ॥६०॥
दशाननासी न वधितां । बिभीषणासी अभिषेकिता ।
अवघे वानर म्हणती मिथ्या । युक्ती रघुनाथा आठवली ॥६१॥
श्रीरामांच्या आज्ञेने हनुमंताने प्रतिलंका निर्माण केली :
श्रीरामा म्हणे हनुमंता । लंका देखिली तुवा तत्वता ।
समुद्रतीरी करी आता । यथार्थता मज दावी ॥६२॥
एकोनि श्रीरामाचे वचन । हनुमान घाली लोटांगण ।
समुद्रतीरी आपण । करी निर्माण लंकेचें ॥६३॥
भोंवता समुद्रपरिघ देखा । सव्य निकुंबळा मागे पडलंका ।
मध्ये निर्माण केली लंका । ध्वजपताका शोभती ॥६४॥
गडप्रवेश अति अवघड । चोरव्दारें मारे गूढ ।
विकट यंत्रें मारक दृढ । भरले अगड बहुजळें ॥६५॥
महाव्दारासंमुख । गुप्तत्वे मारक घातक ।
हुडे अग्नियंत्रांचे भडक । पारिखें कटक मारावया ॥६६॥
उलट लोटा अतर्क्य घात । पारखे वीर ठायी पडत ।
ऐसा मार दुर्गाआंत । दावी हनुमंत गडभागें ॥६७॥
फांजी पौळी निघोड कडे । दुर्धर मार दोहींकडे ।
ढळो नये मागेंपुढे । दावी निवाडे हनुमंत ॥६८॥
रचिली लंकेची आकृती । तीपुढे तुच्छ अमरावती ।
राजमंदिरें शोभती । टके झळकीत पताका ॥६९॥
माडिया गोपुरे सातखणी । उपर्यां उपरीं नवखणीं ।
घरोघरी पै दुखणीं । लंकाभुवनीं अपार ॥७०॥
राणिवसा शोभायमान । त्याहीमाजी अशोकवन ।
तेथे सीतेसी निर्बंधन । संरक्षण राक्षसी ॥७१॥
एकवस्त्रें अति दीन । मळिन केश कंपायमान ।
ऐसियें सीतेते देखोन । रघुनंदन मूर्च्छित ॥७२॥
बिभीषण चवके चिंत्तें । उपडोनियां हनुमंते ।
तेचि लंका आणिली येथे । अति विस्मये विस्मित ॥७३॥
लंका देखतांचि पुढे । तवके उडालीं माकडें ।
दुर्धर दुर्गाचें पै हुडे । उड्डाण पडे माघारे ॥७४॥
अवघे करा आंगवण । शोधोनि काढा रे रावण ।
ऐसे भुलले वानरगण । केले विंदाण हनुमंते ॥७५॥
सावध पाहे रघुनंदन । तंव वाळूचें केले लंकाभुवन ।
हनुमंते शोभायमान । समसमान लंकेसी ॥७६॥
ऐसे स्वये दुर्ग देखोन । विस्मयो पावला लक्ष्मण ।
अंगद सुग्रीव आपण । विस्मयापन्न होऊन ठेले ॥७७॥
देखोनि हनुमंताची लंका । टक पडिले ब्रह्मादिका ।
ब्रह्मांड करिता ब्रह्मा देखा । पाहे टकमका विस्मित ॥७८॥
हनुमंताचे मिथ्या रचन । ब्रह्मादिका दिसे प्रमाण ।
ऐसे देखोनि विंदाण । सुखसंपन्न श्रीराम ॥७९॥
यापरी लंका देखोनि दृष्टी । उल्लास श्रीरामाचे पोटी ।
हनुमंताची पाठी थापटी । हरिख सृष्टी न समाये ॥८०॥
रावणाचा वध होईंपर्यंत ही प्रतिकृती राहील. ती लंका बिभीषणाजवळ गहाण :
श्रीराम बोलिला आपण । मारोनि रावण कुंभकर्ण ।
मुख्य लंका देईन दान । सत्य जाण बिभीषणा ॥८१॥
मुख्य लंका देईन जंव दान । तंव हे हनुमत्कृत लंका जाण ।
तुजपासी म्या दिधली गहाण । सोडवण रावणांतीं ॥८२॥
बहुत दिन न ठेवी गहाण । आम्हा तुम्हा वाइणी हेचि जाण ।
निर्दळोनियां रावण । सोडावण पै इची ॥८३॥
लंकेहूनिही देखा । कोटि गुणें या मोल अधिका ।
माझ्या हनुमंताची लंका । ते तुजदेखतां डुलों नेदीं ॥८४॥
प्रीति प्रेम ज्ञान धन । तुज यथेच्छ देईन जाण ।
हनुमंतलंका सोडवीन । सत्य जाण बिभीषणा ॥८५॥
ऐकोनि श्रीरामाचे उत्तर । संतोषोनियां वानर ।
अवघे करिती जयजयकार । सुखनिर्भर सौमित्र ॥८६॥
हनुमंतलंका अद्दापवरी । आहे समुद्राचें तीरीं ।
काळ धाके जतन करी । भया भारी हनुम्याचे ॥८७॥
राज्याभिषेकाची सामग्री । सिद्ध केलीं वानरी ।
सौमित्रे घेवोनि करी । अभिषेक करी बिभीषणा ॥८८॥
श्रीरामाज्ञा लाहोन । बिभीषणा राज्याभिषिंचन ।
करिता झाला लक्ष्मण । वानरगणसमवेत ॥८९॥
राज्यपट अभिषिंचन । अंगदासुग्रीवासमान ।
बिभीषणासी सिंहासन । रामवरदानप्रयोगें ॥९०॥
बिभीषणासी लंकादान । श्रीरामे दिधले संतोषोन ।
ते देखोनि वानरगण । आल्हांदें पूर्ण हरिखलें ॥९१॥
जयजयकाराचा गजर । करितें जाले वानरवीर ।
श्रीरामनामाचा उच्चार । तेणे अंबर गर्जलें ॥९२॥
श्रीराम निजभक्तकृपाळु । श्रीराम शरणागतवत्सळु ।
श्रीराम प्रेमळ प्रांजळु । दीनदयाळ श्रीराम ॥९३॥
साधु स्वामी श्रीरघुनाथ । साधु बिभीषण शरणागत ।
साधु साधु तो हनुमंत । स्वामिकार्यार्थसाधक ॥९४॥
जैसा राजा श्रीरघुपती । तैसा सुग्रीव वानरपती ।
तैसाचि बिभीषण लंकापती । केला निश्चिती श्रीरामे ॥९५॥
विकल्प न धरोनि चित्ती । शत्रुबंधु तो शरणार्थी ।
आपणासमान पदप्राप्ती । दिधली निश्चिती श्रीरामे ॥९६॥
शरणागता संरक्षणें । शेखी आपणासमान करणे ।
हे कर्तव्य श्रीराम जाणे । अनन्याकारणें कृपाळु ॥९७॥
न जिंकितां दशानन । बिभीषणासी लंकादान ।
श्रीरामकीर्ति अति पावन । दीनोद्धारणा श्रीराम ॥९८॥
कीर्ति वानिजे सुरगणी । कीर्ति वानिजे ऋषिजनीं ।
कीर्ति वानिजे वानरगणी । कीर्ति पावन तिहीलोकीं ॥९९॥
सत्य बंधु बिभीषण । कर्ता एक रघुनंदन ।
त्यासी जालिया अनन्यशरण । जन्ममरण त्या कैंचें ॥१००॥
एकाजनार्दना शरण । पुढे गोड अति निरूपण ।
सागरी तरतील पाषाण । सेतुबंधन अवधारा ॥१०१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडें एकाकारटीकायां
बिभीषणलंकाराज्याभिषेको नाम अष्टत्रिंशत्तमोऽध्यायः ॥३८॥
॥ ओव्या १०१ ॥ श्लोक १५ ॥ एवं संख्या ११६ ॥
