वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ५. सुन्दरकाण्ड - अध्याय ४२ › ३२. महासागराकडे परत प्रस्थान

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088241 · अभंग क्र. ३२

32.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय बत्तिसावा ॥
हनुमंताकडून रावणाचे गर्वहरण

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लक्ष्मणाकडून पुढील वर्णनाचे वाचन

श्रीराम होवोनि सावचित । लक्ष्मणासी स्वये सांगत ।
पुढारा वाची ब्रह्मलिखित । अनुचरित कपीचें ॥१॥
राक्षसदांतांचिया रासी । पाडोनि केलिया रणभूमीसी ।
पुढे काय केले लंकेसी । ते मजपासी परिसवी ॥२॥
ऐकोनि श्रीरामाची गोष्टी । सुग्रीवासी आल्हाद पोटी ।
हर्षल्या वानरांच्या कोटी । कथाकसवटी ऐकावया ॥३॥
वानरांच्या निजकोडी । सभा बैसली परवडी ।
हनुमंताची प्रतापप्रौढी । अति आवडी ऐकावया ॥४॥
हनुमंताची प्रतापकीर्ती । वाचिता लक्ष्मणा परम प्रीती ।
अनुलक्षोनि श्रीराममूर्ती । पत्र प्रयुक्ती वाचित ॥५॥

इंद्रजिताचा पाडाव करून हनुमंत आपली शेपटी आवरून बसला

झाडोनि इंद्रजिताचा पादाडा । करोनि सैन्याचा नितोडा ।
काढोनि कपिपुच्छाचा वेढा । हनुमान गाढा बैसला ॥६॥
पुढती करावया रण । कोण कोण धाडी रावण ।
त्यांचे करावया निर्दळण । सावधान बैसला ॥७॥

त्याचे उरलेले सैन्य रावणला सर्व वृत्त निवेदन करते

गेला देखोनि हनुमंत । मीस करून वीर समस्त ।
आणिक घायाळ कुंथत । नगराआंत निघाले ॥८॥
वीरी घेतलें घायवारे । रावणाचे सभेमाझारें ।
म्हणती पळा रे पळा रे । रणी वानरे मारिजेल ॥९॥
रावण बापुडे ते किती । युद्धी नाटोपे मारूती ।
सेनानी सैन्य नेलें भस्मांतीं । करील शांति लंकेची ॥१०॥
समस्त सैन्या केली बोहरी । बोंब सुटली घरोघरी ।
कळकळती नगरनारी । लंकापुरी आकांत ॥११॥
समरीं रावणाची थोरी । चोरोनियां परनारी ।
केली राक्षसांची बोहरी । महामारी वानरे ॥१२॥
रणी रावण मरता । लंकालोक स्वस्थ होता ।
करविलें इंद्रजिताच्या घाता । रणी हनुमंता खवळोनी ॥१३॥
करिता अखयाचा कैवार । रणी मारविला ज्येष्ठ कुमर ।
बोंब करिता निशाचर । दशवक्त्रा हडबडिला ॥१४॥

इंद्रजिताचा ठाव नसल्याने त्याविषयी मनात कुशंका

इंद्रजित मेला किंवा जीत । कोणी न सांगती मात ।
तेणे गजबजिला लंकानाथ । केला रणघात वानरे ॥१५॥
इंद्रजित मारिला रणी । तरीच मारिल्या वीरश्रेणीं ।
तो जरी असता सावधानी । कपि कैसेनि मारिता ॥१६॥
शोधू जावे जरी रणासीं । राक्षस भिती कपिपुच्छासी ।
भूतीं भक्षिलें प्रेतांसी । तेथे कायसी ओळखी ॥१७॥

रावणाचा शोक व ब्रह्मदेवास पाचारण

रणी निमाला ज्येष्ठ सुत । रावण मुखी धूळ घालित ।
दाही मुखी शंख करीत । आक्रंदत अति दुःखे ॥१८॥
दुःखे गडबडा लोळे । केश सुटले मोकळे ।
अश्रु स्त्रवती विशंती लोळे । पिटी कपालें अति दुःखे ॥१९॥
इंद्रजिताचा केला घात । रणी नाटोपे हनुमंत ।
वानरी न चले पुरूषार्थ । लंकानाथ अति दुःखी ॥२०॥
ब्रह्मयाने सांगितले मजपासीं । गळा बांधोनि वानरासी ।
इंद्रजित आणील तुजपासी । असत्य त्यासी केंवी आले ॥२१॥
पाचारोनि चतुरानन । त्यासी पुसे दशानन ।
इंद्रजित आणील कपि बांधोन । ते तू वचन करी सत्य ॥२२॥

व त्याचे वचन सत्य करण्याचा आग्रह :

आम्ही तंव तुझी संतती । तुझेंनि वरदे दाटुगे क्षिती ।
मज भेटवी पुत्रसंतती । चरण तदर्थीं वंदिले ॥२३॥
इंद्रजिताच्या निजवृत्तांता । तुझेनि नाणवे गा दूता ।
करितो कपि राक्षसघाता । त्यासी सर्वथा न वंचवे ॥२४॥
मीच जावोनि अशोकवना । इंद्रजिताची विवंचना ।
समूळ जाणोनिया मना । मग दशानना सांगेन ॥२५॥
इंद्रजित मेला किंवा जीत । ग्लानीं पुसें लंकानाथ ।
वानरे गांजिला अत्यद्‌भुत । आहे तो गुप्त म्हणे ब्रह्मा ॥२६॥

ब्रह्मदेव मारूतीला भेटून त्याला पाशबद्ध होण्यास सांगतो

ऐसे सांगोनि लंकापती । वना आला प्रजापती ।
ब्रह्मा देखोनि मारूती । घातले क्षिती लोटांगण ॥२७॥
कपि पुसे ब्रह्मयाप्रती । ऐसी आवडी आहे चित्ती ।
तुकोनि रावणाची शक्ती । करावी ख्याती लंकेसी ॥२८॥
ब्रह्मा सांगे हनुमंतासी । इंद्रजित तुझेनि भयेंसीं ।
लपालासें विवर प्रदेशीं । मी त्यापासी जातसें ॥२९॥

राक्षसाच्या हातून केव्हाही बांधला जाणार नाही असे मारूतीचे स्पष्ट उत्तर

इंद्रजिताचे करसंपुटीं । ब्रह्मपाश मानोनि कंठी ।
यावे रावणाचे भेटी । लंकात्रिकूटीं कंदनार्थ ॥३०॥
कपि म्हणे इंद्रजिताचे हातें । सर्वथा न मानी पाशबंधातें ।
ब्रह्मदेवा तुझेनि हाते । ब्रह्मबंधातें मानीन ॥३१॥

इंद्रजिताला स्वतः व रावणाविषयी चिंता

ब्रह्मा म्हणे ऐसेंचि घडे । माझेनि हातें वाडेकोडें ।
हनुमंत पाशबंधनी पडे । रावणापुढे न्यावया ॥३२॥
रणी वानरा देवोनि पाठी । पळतां विवरा संकटीं ।
इंद्रजितासी चिंता मोठी । लागली पोटी धुकधुक ॥३३॥
रणी गांजिलें माकडे । काय मुख दावूं रावणापुढें ।
इंद्रजित खळखळां रडे । अति सांकडें ओढवले ॥३४॥
रणी मज येते मरण । तरी पावतों कृतकल्याण ।
वांचल्याचें फळ कोण । काळे वदन तिही लोकी ॥३५॥
इंद्रजित नावाची हे ख्याती । तिही लोकी माझी किर्ती ।
कीर्ती तेचि झाली अपकीर्ती । रणी मारूती नाटोपे ॥३६॥
कपि केवळ पालेखाइर । आम्ही निधडे महावीर ।
रणी न जिंकवे वानर । लज्जा थोर मज माझी ॥३७॥
काळे वदन लज्जानुवृत्ती । मरण न ये मज वरदोक्ती ।
इंद्रजित पडता चिंतावर्तीं । तंव ब्रह्मोक्ती आठवली ॥३८॥

ब्रह्मदेवाचे स्मरण व आगमन :

गळा बांधोनि मारूती । इंद्रजित आणील लंकेप्रती ।
स्वमुखें बोलिला प्रजापती । तो मज प्रत्यय यावा की ॥३९॥
पाचारावया चतुरानन । रणी नुरेचि सेवकजन ।
माझा वांचलासे प्राण । विवरी दडोन राहिलों ॥४०॥
धाडावया नाही सेवकजन । बाहेर निघतां आपण ।
रोकडे कपिपुच्छे मरण । करी रूदन इंद्रजित ॥४१॥

इंद्रजित ब्रह्मदेव संवाद :

माझे पित्याच्या पित्याचा पिता । कैसेनि भेटेल विधाता ।
ऐसी इंद्रजित करी चिंता । तंव आला अवचिताळ परमेष्टी ॥४२॥
डोळा देखतांच परमेष्टी । इंद्रजित धीर धरी पोटी ।
समूळ सांगे युद्धगोष्टी । केले कष्टी वानरे ॥४३॥
रणी गांजिलो मारुती । तो बांधवे माझे हाती ।
ऐसी स्वामीची पूर्वोक्ती । कृपामूर्ति सत्य कीजे ॥४४॥
असत्य नव्हे ब्रह्मवचन । नारदे सांगितले आपण ।
कपीसी ब्रह्मपाशबंधन । कृपा करोन मज द्यावे ॥४५॥

त्या ब्रह्मपाशात मारुती बांधला जाईना

मज दिधल्या पाशबंधन । तेव्हा रणरंगी गर्जोन ।
ब्रह्मपाशीं कपि बांधोन । मग श्लाघेन वाटिवा ॥४६॥

इंद्रजिताने फेललेला पाश मारूती झुगारतो

विरिंचि देता पाशबंधन । इंद्रजित मोकली कपि लक्षोन ।
वानरासी ब्रह्मपाशबंधन । सर्वथा जाण बांधीना ॥४७॥
हरिवरदान हरवरदान । बांधूं न शके ब्रह्मबंधन ।
पाश गेले पै तुटोन । निर्बंधन मारूती ॥४८॥
पाशाचिया अनुवृत्ती । रणी खवळला मारूती ।
मरण मज असेल पुढती । इंद्रजिताचे चित्ती चळकांप ॥४९॥
इंद्रजिते ब्रह्मपाश घालिता । ते न लगती हनुमंता ।
माझा रणधर्म गेला वृथा । जघन्यता मज आली ॥५०॥
माझी अस्त्रशक्ती शस्त्रशक्ती । ब्रह्मपाश ब्रह्मशक्ती ।
अवघी वृथा केली मारूतीं । राक्षसपंक्ती केवी चाले ॥५१॥
ब्रह्मपाश वृथा जाय । आणीक अस्त्रे करिती काय ।
वानरी न चालती उपाय । आला अपाय राक्षसा ॥५२॥
ब्रह्मयाने दिधली खोटी शक्ती । यालागी न धरवे मारूती ।
इंद्रजित कोपला ब्रह्मयाप्रती । तुझी दुष्टमति आम्हांवरी ॥५३॥
रावणे विभागिलें वेदांसीं । त्याचा राग तुझी मानसी ।
निर्दाळावया राक्षसांसी । बुद्धि सांगसी हनुमंता ॥५४॥
तू आमुची मूळमूर्ती । आम्ही तुझी ब्रह्मसंतती ।
आम्हांसी देवोनि खोटी शक्ती । कपिहाती मारविसी ॥५५॥।

ब्रह्मदेवाचा इंद्रजितावर दोषारोप :

ब्रह्मा म्हणे तू विकल्पमूर्ती । ब्रह्मद्वेषीं ब्रह्मघाती ।
तुझी नातळे ब्रह्मशक्ती । केंवी मारूती बांधवें ॥५६॥
ब्रह्मानुवादाचें उत्तर । गळा बांधोनि वानर ।
इंद्रजित आणील महावीर । ते साचार करी वाक्य ॥५७॥
ब्रह्मा म्हणे इंद्रजिताप्रती । माझे पाश दे मज हाती ।
गळा बांधोन देईन मारूती । लंकेप्रती न्यावया ॥५८॥
इंद्रजित म्हणे ब्रह्मयासी । म्या मोकलिले ब्रह्मपाशासी ।
हनुमंते बांधोनि राखिलें पुच्छी । म्या तुम्हांसी काय द्यावे ॥५९॥

ब्रह्मदेव मारूतीला विनवून पाशबद्ध करितो

ऐकोनि इंद्रजिताचे वचन । ब्रह्मा जाला हास्यवदन ।
कपीस ब्रह्मपाशबंधन केले । विंदान ते ऐका ॥६०॥
ब्रह्मा सांगे गा हनुमंता । तुज न लागे पाशबंधता ।
माझ्या सत्यवचनार्था । ब्रह्मपाशता मानावी ॥६१॥
एकोनि ब्रह्मयाचें वचन । हनुमान घाली लोटांगण ।
तुझेनि बोले देईन प्राण । पाशबंधन ते किती ॥६२॥
ऐसे बोलोनि हनुमंत । पाशबंधनी पडे मूर्च्छागत ।
धरणीवरी निश्चेष्टित । धुकधुकीत भयभीत ॥६३॥
ब्रह्मपाशीं हनुमंत । पडिला देखोनि निश्चेष्टित ।
परी तो बंधमोक्षातीत । नित्य निर्मुक्त श्रीरामे ॥६४॥

ते पाहून राक्षसांना आनंद व मारूतीवर सर्वांचे प्रहार

जेंवी रवि थिल्लरांत । मूर्ख मानिती थिल्लरस्थ ।
तेंवी कपि ब्रह्मपाशांत । बांधिला हनुमंत राक्षसी ॥६५॥
हनुमान बांधिला ब्रह्मपाशांत । विजयी वीर इंद्रजित ।
निशाणे त्राहाटिलीं लंकेआंत । लंकानाथ आल्हादे ॥६६॥
ब्रह्मयाने बांधिला हनुमंत । परी ब्रह्मबंधासीं अतीत ।
देखोनि धाके इंद्रजित । करील अनर्थ लंकेसी ॥६७॥
क्षितितळी निचेष्टित । पडिला देखोनि हनुमंत ।
राक्षस धांवोनि समस्त । त्यासी बांधीत वेलवाखीं ॥६८॥
एक बांधितीं चर्‍हाटें । साली बांधिती वृक्षफांटे ।
देखोनि हांसिजे मर्कटें । बंधन खोटे मजलागी ॥६९॥
जो न बांधवे ब्रह्मपाशीं । तो केंवी बांधवे चर्‍हाटेंसीं ।
बंधनमिसें जातो लंकेसी । रावणासी गांजावया ॥७०॥
आम्हांसी गांजिलें अशोकवनी । रावणा गांजील लंकाभुवनीं ।
परम चिंता इंद्रजिताचे मनी । अपेश जनी मज आले ॥७१॥
इंद्रजिते हनुमंत । बांधोनि आणिला लंकेआंत ।
हे अवघीच मिथ्या मात । जातो अनर्थ करावया ॥७२॥
जे ब्रह्मयाने सांगितले कानी । तेंचि हनुमंते धरोनि मनी ।
प्रवेशला लंकाभुवनीं । इंद्रजित मनी भयभीत ॥७३॥
वानर पालेखाइर । त्याचा इंद्रजितासी धाक थोर ।
आम्ही निधडे निशाचर । क्षणे कपींद्र मारू या ॥७४॥
म्हणोनि बांधिती रज्जुबंधनी । एक बांधिती वाख वळोनी ।
एक बांधिती मुंजी चिरोनी । कपि बांधोनि आणिती ॥७५॥
पूर्वपश्चिमउत्तरेसीं । एक ओढिती दक्षेणेंसीं ।
हनुमाना करिती कासाविसी । कपि मानसी हांसत ॥७६॥

हनुमंताचे पुढीळ कार्याविषयी विचार

राक्षसें केवळ वेडीं । व्यर्थ करिती ओढाओढी ।
लंका करीन कडाफोडी । पाडीन दरडी दुर्गाच्या ॥७७॥
मज नेलिया दुर्गाआंत । महावीरां करीन घात ।
मुख्य गांजीन लंकानाथ । दहनार्थ लंकेसी ॥७८॥
कपि बांधिला महाबळी । म्हणोनि राक्षसी पिटिली टाळी ।
गुढी आणिली रायाजवळी । सभामंडळी लंकेच्या ॥७९॥
वज्रदेही हनुमंत । बुकी हाणी तो पडे मूर्च्छित ।
मुसळघाये उखळे हात । वीर मूर्च्छित कपिघातें ॥८०॥

रावणासमोर नेल्यावर त्याचा क्रोध :

इंद्रजितासी समवेत । हनुमान नेतां लंकेआंत ।
ब्रह्मा स्वमुखें मंत्र जपत । विपरीतार्थ तो ऐका ॥८१॥
गृहा वै प्रतिष्ठा हे सूक्त । ब्रह्मा स्वमुखें गडगर्जत ।
रामराज्य लंकेआंत । हनुमंतप्रवेशे ॥८२॥
रावणे देखोनि वानरा । दांत खाय करकरा ।
जिवे मारिले अखयाकुमरा । यासी करा तिळखंड ॥८३॥
सकळ सैन्य समसगट । शस्त्रे हाणिती कडकडाट ।
लागता शस्त्रे होती पीठ । ह्रदयस्फोट राक्षसा ॥८४॥
एकाचे उखळले हात । वीरी विचकिलें पै दांत ।
धापां दाटले समस्त । पडिले मूर्च्छित एकैक ॥८५॥
हनुमान रामनाम जपत । ससैन्य शस्त्रे हताहत ।
ते देखोनि लंकानाथ । कोपे कृतांत पै जाहला ॥८६॥

रावणाचा खड्गप्रहार निष्फळ :

रावणे खड्गा घातला हात । बळे हाणिता हनुमंत ।
झणाणिला लंकानाथ । शस्त्रे हात लचकला ॥८७॥
धावो हाणिता प्रचंड । दणाणिलें त्याचे ब्रह्मांड ।
सरलें रावणाचे बळबंड । खालतें तोंड तेणे केले ॥८८॥
घावो न मानीच हनुमंत । रावण चिंताग्रस्त ।
हनुमान गदगदा हांसत । व्यर्थ पुरूषार्थ रावणा ॥८९॥

त्यामुळे मारूतीकडून रावणाचा धिक्कार :

राक्षसघायांचा समेळ । ढेकणाऐसी त्याची बुळबुळ ।
तुझा घावो अति निर्बळ । जैसी पेळ कापसाची ॥९०॥
सावध केले लंकानाथा । तुझा मज थोर भ्रम होता ।
घावो हाणोनि आता । केला वृथा पुरूषार्थ ॥९१॥
तुझ्या घायाच्या समेळी । माझी न तुटे रोमावळी ।
श्रीरामासी रणकल्लोळीं । घेसी फळी कैसेनि ॥९२॥
स्वयंवरीं वाहता हरकोदंड । तेव्हा जाले काळे तोंड ।
ते श्रीरामे केले दुखंड । युद्ध प्रचंड केंवी त्यासी ॥९३॥
तुझे शुभ चिन्ह कळलें आता । स्वये जालासी भीक मागता ।
भिकेमाजीही कपटता । श्रीरामकांता चोरिली ॥९४॥
गृहस्थाची जे पत्‍नी । ती भिक्षुकाची निजजननी ।
तू तंव केवळ मातृगमनीं । सीतावरणीं उद्यत ॥९५॥
भिक्षा दे वो म्हणसी माते । शेखी अभिलाषिसी सीते ।
महापापी तू सर्वार्थें । संनिपातें घेतलासी ॥९६॥
बाप होणाराची थोरी । राजत्व सांडोनिया दूरी ।
झोळी घेवोनिया करी । स्वये भिकारी जालासी ॥९७॥
स्वये होतांचि भिकारी । राजत्वपदवी पळे दूरी ।
जळों ते वेदभाष्य तुझी थोरी । परनारी चोरिसी ॥९८॥

रावणाची चिंता :

अवध्यता वानरासी । मारिता न मारवे आम्हांसी ।
विलोकोनि बोलता सभेसीं । रावणासी अति चिंता ॥९९॥
येथे आणितां हनुमंत । आम्हांसी न जोडे पुरूषार्थ ।
हनुमान माझा करील घात । चळी कांपत रावण ॥१००॥
रावणाचे सिंहासन । तयासमान पुच्छासन ।
हनुमान बैसला सावधान । दशानन लक्षोनी ॥१०१॥
दधमुखेंसीं संमुख । वानर बैसला निःशंक ।
रावणा लागली धुकधुक । अधोमुख स्वये जाला ॥१०२॥
इंद्रजिते हनुमंत । धरोनि आणिला लंकेआंत ।
सत्य जाला ब्रह्मवाक्यार्थ । मज अपघात ओढवला ॥१०३॥
रावणाचे चित्ती चिंता ऐसी । कळो सरली हनुमंतासी ।
वानरचेष्टा मांडिल्या त्यासी । लंकेशासी गांजावया ॥१०४॥

नंतर रावणापुढे मारूतीच्या चेष्टा व त्याची अवहेलना :

रावणासंमुख हनुमंत । बैसोनियां वांकुल्या दावित ।
कांखा कुशी खाजवीत । पुच्छ लावीत नाकासी ॥१०५॥
पुच्छ लावितांचि नाकी । केश भरले नासिकीं ।
रावण शिंकेवरी शिंकी । दशमुखीं ओकित ॥१०६॥
दाहीं नाकी शिंके थडथडां । होत शेंबुडाचा सडा ।
सिंहसनीं रोकडा । वानरे गाढां गांजिला ॥१०७॥
पुढे शिंकेचे पडता नेट । बृहती वाजे परपराट ।
वानरचेष्टा अति वरिष्ठ । दशकंठ गांजिला ॥१०८॥

रावण त्यास त्याची माहिती विचारतो :

राजसन्मान राजाभिमान । वानरे उडविला संपूर्ण ।
सिंहासनी दशानन । लज्जायमान बैसला ॥१०९॥
वानर न गणी राक्षसांसी । दृष्टी नाणी प्रधानसी ।
रावणे जाणोनि मानसी । स्वमुखे कपीसी पूसत ॥११०॥

मारुतीचे उत्तर :

रावण हेळसोनि बोले उत्तर । अरे तू कोण कोणाचे वानर ।
तैसाचि हेळसोनि बोले कपींद्र । ऐके साचार रावणा ॥१११॥
एके म्हणतांचि अरे । सवेंचि दुसरा म्हणे का रे ।
तैसेचि मांडिलें वानरे । निशाचरें हेळसोनी ॥११२॥
मारिले वनकर किंकर । जंबुमाळी प्रधानकुमर ।
पंच सेनानी मारिले शूर । तो मी वानर हनुमंत ॥११३॥
करोनि वृक्षांचा उपाडा । झाडिला इंद्रजिताचा पादाडा ।
अखया कुमर मारिला गाढा । तो मी निधडा हनुमंत ॥११४॥
कोणाचा म्हणसी कैंचा कोण । येथे यावया काय कारण ।
पुशिल्या प्रश्नांचें प्रतिवचन । सावधान अवधारी ॥११५॥
सुबाहु ताटकानिर्दळण । त्रिशिरा मारिला खर दूषण ।
त्या श्रीरामाचा दूत मी जाण । तुझा प्राण घेवो आलो ॥११६॥
कोदंडधारिदीक्षागुरू । सूर्यवंशी श्रीरामचंद्रु ।
त्याचा दूत मी वानरू । तुझा संहारू करू आलो ॥११७॥
राक्षसराजा मी रावण । तुज वधावया कैंची आंगवण ।
तरी माझे बळ असाधारण । नाही प्रमाण मारावया ॥११८॥
लागता बाहूची चपेट । मेरूमांदार होती पीठ ।
तेथे रावण दशमुख कीट । लंकात्रिकूट ते किती ॥११९॥
रावणाऐसे दशकंठी । रणी मर्दीन कोट्यनुकोटी ।
तो मी लंकेची त्रिकूटी । वाममुष्टीं मर्दीन ॥१२०॥
म्हणती तुजसवें वानर । असती पाठिराखे अपार ।
मी एकांगवीर । पुरें दशशिर दंडावया ॥१२१॥
मी तंव एकला एक वानर । श्रीरामकटकींचे किंकर ।
तुझे कोटि कोटि जुंझार । मजसमोर करी उभे ॥१२२॥
मशकें कोटी कोटी जुंझार । मज मारिता दशशिर ।
कोण राखेल निशाचर । सुरासुरा पाहू पा ॥१२३॥
सदाशिव तुज रक्षिता । तुवा चोरिली श्रीरामकांता ।
शिव पेटला तुझ्या घाता । चोरी करिता कोण राखे ॥१२४॥
ब्रह्मा तुज नित्य साहाकारी । त्याचे वंशीं तू दुराचारी ।
चोरीमारी आणि परद्वारी । ब्रह्मा तुजवरी क्षोभला ॥१२५॥
ब्रह्मा शिव आणि शक्र । तुज क्षोभले सुर समग्र ।
मज मारिता दशशिर । कोण समोर राहील ॥१२६॥
मुख्य त्वा चोरिली सीता सती । जटायु मारिला विश्वासघातीं ।
परिव्रतेसीं मागतां रती । प्रजापति क्षोभला ॥१२७॥
मज मारिता दशवक्त्र । कुमर प्रधान सैन्य समग्र ।
रणी मर्दोनि निशाचर । सीता सुंदर मग नेईन ॥१२८॥

त्यामुळे इंद्रजितास कंप :

ऐकोनि हनुमंताची मात । इंद्रजित चळीं कांपत ।
धाके बिभीषणासी सांगत । आला अपघात रावणा ॥१२९॥
हनुमंताचा रणावर्त । भोगोनि इंद्रजित असे भीत ।
न साहवे पुच्छाचा घात । लंकानाथ केंवी वांचे ॥१३०॥
लंके आणोनि हनुमंत । कांही नव्हेचि पुरूषार्थ ।
आजि निमाला लंकानाथ । आला अंत राक्षसा ॥१३१॥

त्याला व बिभीषणाला रावणाविषयी चिंता :

इंद्रजित बिभीषण सचिंत । कैसेनि वांचेल लंकानाथ ।
तंव बोलिला हनुमंत । अति पुरूषार्थ रामाचा ॥१३२॥
रणी मारीन रावण । करोनि सीता सोडवण ।
सीता घेवोनि जाता जाण । आडवा कोण येंऊ शके ॥१३३॥
इतुके करिता न लगे क्षण । परी श्रीरामे वाहिली आण ।
स्वहस्तें मारीन रावण । मिथ्या कोण करू शके ॥१३४॥
मारोनियां दशशिरां । स्वस्थ करावी वसुंधरा ।
सुखी करावे चराचरा । श्रीरामचंद्रा निजनेम ॥१३५॥
सोडावी देवांची बांधवडी । तोडावी नवग्रहांची बेडी ।
उभारावी रामराज्याची गुढी । हे मर्यादा गाढी श्रीरामी ॥१३६॥

रावणाच्या शिरावर मारुतीचा नखाग्रांनी आघात

वानरे करोनि उड्डाण । जीवे मारावा दशानन ।
श्रीरामप्रतिज्ञापाळण । कपि रावण न मारीच ॥१३७॥
रावणाची दाही शिरें । हनुमान खुडिता नखाग्रें ।
मर्यादा केली श्रीरामचंद्रें । म्हणोनि वानरे राखिला ॥१३८॥
श्रीराममर्यादेचें उत्तर । सर्वथा नुल्लंघीच वानर ।
यालागी तो दशशिर । जीवे कपींद्र न मारीच ॥१३९॥
जीवे न मारीच वानर । मरणापरीस हे दुर्धर ।
निर्भत्सला दशशिर । तेंही सादर अवधारा ॥१४०॥

त्याचा मारूती धिक्कार करतो :

जळो ते रावणा तुझी थोरी । जळो तो राजा होय भिकारी ।
जळो ते कर्म करणे चोरी । परनारी पतिव्रता ॥१४१॥
जळों ते तुझे रावणा कुळ । जळो ते रावणा तुझे शीळ ।
जळो ते रावणा तुझे बळ । पापी केवळ परद्वारी ॥१४२॥
धिग्धिग् रावणा तुझा पुरूषार्थ । धिग्धिग् रावणा तुझा कर्तव्यार्थ ।
धिग्धिग् रावणा तुझे व्रत । स्वार्थ परमार्थ नाशिला ॥१४३॥
धिग्धिग् रावणा तुझी राक्षसजाती । धिग्धिग् रावणा तुझी ख्याती ।
धिग्धिग् रावणा तुझी किर्ती । जाली अपकीर्ति तिही लोकी ॥१४४॥
धिग्धिग् रावणा तुझे जन्म । धिग्धिग् रावणा तुझे कर्म ।
धिग्धिग् रावणा तुझा धर्म । निद्य परम तिही लोकी ॥१४५॥
धिग्धिग् रावणा तुझी श्रीमंती । धिग्धिग् रावणा तुझी शक्ती ।
धिग्धिग् तो खड्ग तुझे हाती । लोम मारूतीचें न तुटेचि ॥१४६॥
धिग्धिग् जीवित्व तुझे क्षिती । धिग्धिग् रावणा तुझी शौर्यशक्ती ।
परोक्ष चोरिली सीता सती । बाणभयें भीसी श्रीरामा ॥१४७॥
चोरिली माझ्या स्वामीची नारी । त्या तुझी म्या धरिली चोरी ।
चोर तो तंव प्रत्यक्ष वैरी । सहपरिवारी मारीन ॥१४८॥
देखता सैन्य भट सुभट । तुझे मर्दीन वीसही होंट ।
तुझे छेदावया दशकंठ । आलो मी वाटा रामाचा ॥१४९॥
ऐसे बोलता महाबळी । पिंजारिल्या रोमावळी ।
लांगूल त्राहाटिले भूतळीं । वाढलें निराळीं कपिपुच्छ ॥१५०॥
सवेंचि आठवले हनुमंता । श्रीराम वधील लंकानाथा ।
व्यर्थ का मी क्षोभूं आता । केले शांत निजकोपा ॥१५१॥
एकाजनार्दना शरण । केले लंकेशगर्वहरण ।
जाळील लंकाभुवन । रणकंदन अवधारा ॥१५२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें सुंदरकांडे एकाकारटिकायां
हनुमद्-रावणगर्वहरणं नाम ब्रह्मलिखिते द्वात्रिंशत्तमोऽध्यायः ॥३२॥
॥ ओव्या १५२ ॥ श्लोक ११ ॥ एवं संख्या १६३ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग