(डाकाचे रूपक)
3918.
(डाकाचे रूपक)
देवी देव झाले भोग सरले यावरी । सांगाया दुसरी ऐसी नाही उरली ॥१॥
हरीनाम देवनाम तुम्ही गाऊनिया जागा । पेंठंवणी मागा नका ठेवू लिगाड ॥धृपद॥
शेवटी सुताळी बरवी वाजवावी डांक । ताळा घाली एक सरलियाचे शेवटी ॥२॥
गुंडाळा देव्हारा मान देती मानकरी । तुका म्हणे बरी आजि कोडी उगविली ॥३॥
अर्थ :
आता देवी देव व सर्व प्रकारचे भोग संपलेले आहेत यापेक्षा दुसरे सांगण्यासाठी काहीही उरले नाही. हरीनाम व देवनाम घेत तुम्ही जागे राहा केलेल्या कामाची बिदागी मागा म्हणजे बक्षीस मागा त्याविषयी कोणतेही लचांड पाठीमागे ठेवू नका. शेवटी भक्तिप्रेमाच्या सुताने चांगले वेढे दया व डांक वाजवा व सर्व काही संपल्यानंतर जीव, ब्रम्ह, ऐक्याच्या अनुभवाशी मेळ घाला. तुकाराम महाराज म्हणतात, आता देव्हारा गुंडाळून ठेवावा मानकरी संत आपआपला मान नेत आहेत आणि आज माझ्या देवाने खूप सा-या भक्तांचे कोडे उलगडवले आहे.
