बाळपणी हरि । खेळे मथ
169.
बाळपणी हरि । खेळे मथुरेमाझारी ।
पायी घागरिया सरी । कडदोरा वांकी ।
मुख पाहे माता । सुख न माये चित्ता ।
धन्य मानव संचिता । वोडवले आजि ॥१॥
बाळ चांगले वो । बाळ चांगले वो ।
म्हणता चांगले । वेळ लागे तया बोले ।
जीवापरीस ते वाल्हे । मज आवडते ॥धृ॥
मिळोनिया याती । येती नारी कुमारी बहुती ।
नाही आठव त्या चित्ती । देहभाव कांही ।
विसरल्या घरे । तान्ही पारठी लेकुरे ।
धाक सांडोनिया येरे । तान भूक नाही ॥२॥
एकी असतील घरी । चित्त तयापासी परी ।
वेगी करोनि वोसरी । तेथे जाऊ पाहे ।
लाज सांडियेली वोज । नाही फजितीचे काज ।
सुख सांडोनिया सेज । तेथे धाव घाली ॥३॥
वेधियेल्या बाळा । नर नारी या सकळा ।
बाळा खेळवी अबला । त्याही विसरल्या ।
कुमर कुमारी । नाही भाव हा शरीरी ।
दृष्टी न फिरे माघारी । तया देखता हे ॥४॥
वैरभाव नाही । आप पर कोणी कांही ।
शोक मोह दुःख ठायी । तया निरसली ।
तुका म्हणे सुखी । केली आपणासारिखी ।
स्वामी माझा कवतुकी । बाळवेषे खेळे ॥५॥
