स्वये सुखाचे झाले अन
170.
स्वये सुखाचे झाले अनुभव । एक एकीपाशी सांगतील भाव ।
अवघ्या अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथेंचि त्याचा जीव वो ॥१॥
आपआपणाशी करिती नवल । परि वादावाद न संडिती बोल ।
एका मेघःश्यामे जलधर वोल । रसी उताविळ हृदय सखोल वो ॥धृ॥
एक विषय तो सकळांचा हरि । त्याच्या आवडीने आवडी इतरी ।
अंध बहिर हे प्रेत लोका चारी । त्यांची कीर्ति गाइली पुराणांतरी वो ॥२॥
स्तुति पराविया मुखे रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवी आदर ।
परस्परे हे सादरा सादर । योग सज्जनाच्या सुखा नाही पार वो ॥३॥
भक्तिवल्लभ न तुटे चराचरी । आप्त अनाप्त हे ऐशी ठेवी उरी ।
दुरी जवळी संचिता ऐसे धरी । रंगा रंगा ऐसे होणे लागे हरि वो ॥४॥
तुका लाधला हे उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमे वोसंडून ।
पडिले कानी त्या जीवाचे जतन । धरियेले एकाभावे हृदयी चरण वो ॥५॥
