गाई गोपाळ यमुनेचे तट
168.
गाई गोपाळ यमुनेचे तटी । येती पाणिया मिळोनि जगजेठी ।
चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी । चला चला म्हणती पाहू दृष्टी वो ॥१॥
ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ देखावया हरी ।
मिस पाणियाचे करितील घरी । बारा सोळा मिळोनि परस्परी वो ॥धृ॥
चिरे चोळिया त्या धुता विसरती । ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती ।
कोणा नाठवे कोण कुळ याती । जाली तटस्थ सकळ नेत्रपाती वो ॥२॥
दंतधावनाचा मुखामाजी हात । वाद्ये वाजती नाइके जनमात ।
करी श्रवण कृष्णवेणुगीत । स्वामी तुकयाचा पुरवील मनोरथ वो ॥३॥
