पडिली भुली धांवते सै
176.
पडिली भुली धांवते सैराट । छंद गोविंदाचा चोजविते वाट ।
मागे सांडोनि सकळ बोभाट । वंदी पदांबुजे ठेवुनि ललाट वो ॥१॥
कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी । होते वहिले लपाला आता खांदी ।
कोठे आड आली हे देहबुद्धी । धांवा आळवी करुणा कृपानिधी वो ॥धृ॥
मागे बहुतांचा अंतरला संग । मुळे जयाचिया तेणे केला त्याग ।
पैल पाहाता ते हरपले अंग । खुंटली वाट नाहींसे झाले जग वो ॥२॥
शोके वियोग घडला सकळांचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा ।
केला उच्चार रे घडल्या दोषांचा । झाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥३॥
