नका कांही उपचार माझ्
175.
नका कांही उपचार माझ्या शरीरा । करू न साहती बहु होतो उबारा ।
मनोजन्य व्यथा वेध झाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा वो ॥१॥
सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा ।
उमटली अंगी वो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा वो ॥धृ॥
नये कळो नेदावी हे दुजियासि मात । घडावा तयासि उत्कंठा एकांत ।
एकाएकी साक्षी येथे आपुले चित्त । कोण्या काळे होइल नेणो भाग्य उदित वो ॥२॥
स्वाद सीण देहभान निद्रा खंडन । पाहिले तटस्थ उन्मळित लोचन ।
अवघे वोसाऊन उरले ते चरण । तुका म्हणे दर्शनापे आले जीवन वो ॥३॥
